सावधान बळीराजा दुष्काळ येतोय….

सावधान बळीराजा दुष्काळ येतोय….

🌱वि४🌿 या व्हाट्सअप्प ग्रुपवरून

सावधान बळीराजा दुष्काळ येतोय….

source:- INTERNET

अक्षय गांवकर
ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग

या वर्षी सरासरी पाऊस कमीच पडला. तरी बरीचशी धरण भरली गेलीत. काही जेमतेम भरली गेलीत. आज महाराष्ट्र दुष्काळाच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रातला बळीराजा दुष्काळग्रस्त असुनही सरकार कडुन कोणतही ठोस पाऊलं उचलल जात नाही आहे. जगाचा पोशिंदा दुष्काळात सापडला तर त्याला मदत करण हे सरकारच काम आहे ते ही होताना दिसत नाही. शेवटी त्या मायबाप शेतकय्रा जवळ कोणताही पर्याय उरत नाही आणि आपल जीवन संपवण्या शिवाय त्यांच्या समोर कोणताच मार्ग राहत नाही.

पण माझ्या कोकणात तस होताना दिसत नाही. कोकणी शेतकरी आत्महत्ये सारख टोकाच पाऊल उचलत नाही. माझ्या कोकणात तस बघीतल तर दुष्काळ पडत नाही. तरीही नैसर्गिक आपत्ती ही इथल्याही शेतकर्यास चुकलेली नाही. देवाच्या कृपेने लाभलेला हिरवागार निसर्ग त्यामुळे पावसाची समस्या भासत नाही. पण कधी-कधी हाच पाऊस शेतकय्राचा कर्दनकाळ बनुन समोर येतो. आत्ताच दोन दिवस अगोदर विजेच्या कडकडासह पाऊस जोरदार पडला. कापणीला आलेल्या भात शेतीच नुकसान करुन गेला. असा अवेळी आलेल्या पावसाला गावाकडे अवकाळी आऊस बोलले जाते. या पावसाने शेतकय्राच पावसाळ्यात केलेल्या ३,४ मीहीन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल. पाऊसामुळे हाता तोंडाला आलेला घास मातीमोल झाला. कापणीला आलेल्या भात शेतीचा दाणा अक्षरशा पावसच्या सरी ने गळुन पडला. याची नुकसान भरपाई सरकार कडुन भेटनार नाही. गरीब शेतकय्राला पिका पासुन आणि कष्टा न पिकवलेल्या धान्या पासुन वंचित रहावे लागेल.
आंबा काजु हे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली जाते. पण वर्षभराची मेहनत केव्हा हातुन निसटते समजतही नाही. जेव्हा आंबा काजु या झाडांन्ना मोहर यायला लागतो त्याचवेळी अवकाळी पाऊस किंवा पिसाळलेला वार आला की झाडावरचा मोहर गळुन पडतो. पुन्हा त्या झाडाला मोहर येण कठीण होवुन जात. असा पाऊस किंवा जोरदार वारा आला की शेतकय्राचा अक्षरशा जिवच घेतो. कारण त्या मागे वर्षानु वर्षे झाडांची जोपसना करुन केलेली मेहनत असते. कधी-कधी कडक उन्हाळ्याच्या महीन्यात संपुर्ण जमनिवर सुकलेल गवत असल्यामुळे. कुठेतरी चुकुन लागलेली आग संपुर्ण बाग बेचिराख करुन टाकते. असे प्रसंग माझ्या कोकणात अनेक वेळा घडताना बघितले. पण झालेल्या नुकसानीचा मोबदला भेटताना कधी बघीतला नाही.. असा अवकाळी पाऊस झाला किंवा शेतीच नुकसान झाल तर कोणताही सरकारी अधिकारी तपासणीसाठी येत नाही. जरी पंचनामा झालात तर योग्य नुकसान भरपाई भेटत नाही. सरकार कडुन दुष्काळ ही जाहीर होत नाही. अशाने माझा शेतकरी मायबाप आलेल्या संकटाला सामोरे जातो. मेहनतीच फळ आज ना उद्या भेटनारच या आशेवर जगतो. पण फासावर लटकत नाही. म्हणुन मला माझ्या कोकणी शेतकय्राचा अभिमान वाटतो.

यामधे मला कुठेही तुलना करायची नाही आहे. पण तरीही आपली काटक वृत्ती, कमी गरजा तसेच समाधानी असल्याने कोकणी शेतकरी आलेल्या संकटांना देवाक काळजी रे म्हणत तोंड देत असतो. आणि आपल जीवन जगत असतो.

source:- INTERNET

अभिजीत गोडसे ,
सातारा

             नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे आता नेहमीच येतो दुष्काळ असे म्हणण्याची आता आपल्या सर्वांनाच सवय झाली आहे. दुष्काळ हा काही नवीन नाही. अगदी प्राचीन काळात ही दुष्काळ पडला होता. गेल्या दशकात अनेक वेळा दुष्काळ पडला. येथून पुढेही पडणार आहे. यावर मात कशी करायची हा खरा आपल्या सर्वांन पुढे प्रश्न आहे. दुष्काळ हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आहे. नैसर्गिक दुष्काळामध्ये पावसाची अनिश्चितता , तापमान वाढ , वातावरणात झालेले बदल इ. घटक येतात. तर मानवनिर्मित दुष्काळामध्ये पाण्याचा अमर्याद उपसा , लोकसंख्या , शेतीसाठी वापरली जाणारी खते इ. घटक येतात. खर तर नैसर्गिक दुष्काळ हा आपल्या हातात नाही . पण मानवनिर्मित दुष्काळ हा आपल्या हातात आहे. यासाठी योग्य त्या सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. भले दुष्काळ कोणताही का असेना. यासाठी सावधान फक्त बळीराजाने होण्याची गरज अजिबात नाही. त्याने एकट्याने काही दुष्काळाचा पतकुर घेतलेला नाही. दुष्काळामध्ये त्याचे सर्वात जास्त नुकसान होत हे खरे. पण   सिमेंटच्या जंगलात राहणारी आणि घरात मोठ्या पडद्यावर दुष्काळाचे दाहक चिञ पाहणारी मंडळी उन्हाळा सहण न झाल्याने देवाघरी गेली आहेत . सावधान अशा मंडळीनी देखील होणे गरजेचे आहे.

             मुळात सावधान होण्याची गरजच का पडते ?  दुष्काळ आला की सरकारच्या नावाने टाहो फोडायचा. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करायची. यंदा तर सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. दुष्काळातील  तालुक्यात मुलांच्या शाळेची फी माफ , लाईट बील माफ , शेतसारा माफ इ. सर्व सुविधा दिल्या गेल्या. पण दुष्काळ हटवण्ची जबाबदारी फक्त सरकारीची आहे का ? सरकारी पातळीवर सरकार मदत करते हा भाग वेगळा. ते त्यांनी केले पाहिजे. पण आपण काय करतो ? किमान नैसर्गिक नाही पण  मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी तरी झटतो का ? पाण्याचा वापर कमी करतो का ? झाडे लावतो का ? हे प्रश्न आपल्या मनाला प्रत्येकाने विचारले पाहिजे. ग्रामीण भाग सोडा. तेथे बळीराजा वर्षेभर निसर्गाच्या सानिध्यांत आहे. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्याची धमख आहे. हे शहरवासी मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी काय काम करतात ? विज मुबलक मिळते , पाणी मुबलक मिळते सर्व सुविधा मिळतात. यामुळे अशांना दुष्काळ कशाबरोबर खातात   हेच मुळात माहिती नाही . छोट्याशा कुंडीत फुलाच झाड लावण्यापलीकडे यांची समज जात नाही. ते ही झाड घराची शोभा वाढवण्यासाठी लावलेले. मेक आहे ते येथे आहे. घरातील माध्यमांच्या पुढे बसून दुष्काळाची चित्रे पाहून दुष्काळ कमी होणार नाही. काही सामाजिक संस्था दुष्काळाला हरवण्यासाठी आणि एकूणच गाव पाणीदार करण्यासाठी ,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी झटत आहे. उदा. पाणी फाउंडेशन. अशा लोकचळवळीत ग्रामीण भाग तर आहेच आहे. पण यात निरघंट्ट शहरी लोकांनी देखील  सामील होऊन दुष्काळाला हटवण्यासाठी मदत केली पाहिजे. यासाठी त्याला गावागावात जाऊन जमेल त्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. दुष्काळ सर्वान साठी आहे. एकट्या बळीराजासाठी नाही.

           दुष्काळाचा संबंध हा  थेट आर्थिक घटकांशी आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर दिसून येईल. आज मराठवाडा , विर्दभ , उत्तर महाराष्ट्र आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र अशा ठिकाणी किती लोकांचे हाल होतायत ते जाणकारांनी तेथे जाऊन पहावे. दुष्काळ आला की पाणी टंचाई वाढते,  उभे असलेली पिके नष्ट होतात. आणि येथेच आर्थिक प्रश्न उभा राहतो. याच्यात सर्वात जास्त हाल होतात ते महिलांचे पाणी आणण्यासाठी दोन - तिन किलोमीटर पायपीट करून जावे लागते . गावात टँकर आला की माता - भगिनी यांची उडालेली झुंबड आणि अशातून पुन्हा होणारी भांडणे , चिडचिड ,  पाणी आणण्यासाठी लांब जावे लागल्यामुळे लहान मुलांची बुडणारी शाळा. असे असंख्य प्रश्न आहेत. जे की दुष्काळामुळे उभे राहिलेत . यासाठी आता फक्त बळीराजाला सावधान करण्यात काही अर्थ नाही . सावधान तर सबंध माणव जातीने झाले पाहिजे .

source:- INTERNET

वाल्मीक फड ,
नाशिक

दुष्काळाचा सवॉत जास्त फटका हा बळीराजाला प्रथम बसतो म्हणून हे शिषॅक एकदम योग्य बसते.बघा दुष्काळ येतो तो काही ठराविक घटकांसाठी येत नाही,तो येताना अनेक समस्या घेऊन येत असतो.परंतु सगळ्यात जास्त फटका हा शेतकर्याला बसतो.कारण की, दुष्काळ आला की,जे शेतकरी बियाणे जमिनीत टाकतात त्याची उगवण होते आणी काही दिवसात ते पिक पुणॅपणे जळून जाते आणी केलेला खचॅ आणी सगळीच मेहनत वाया जाते पयॉयाने आथीॅक नुकसान होते.दुष्काळ म्हटलं की,शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर तसेच शेतीसाठी लागणारे अौषधे खते यांच्या कंपन्या ,दुकाने अशा अनेक घटकांवर त्याचा फार मोठा परीणाम होतो.म्हणून माझे तर असे मत आहे की,बळीराजाला सावध करण्यापेक्षा सरकारला सावध केलं पाहीजे.फ्री वायफाय हे असे बिनकामाचे ऊद्योग करण्यापेक्षा प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी कालवे काढावे,नद्या,जोडाव्या. ह्या गोष्टींवर जर खचॅ केला पाहीजे मला माहीत आहे कारण मी स्वता एक शेतकरी आहे.बळीराजाची जर खरोखरच जर काळजी वाटत असेल तर हे काम करायला पाहीजे.ज्या भागात पाऊस जास्त पडतो त्या भागातुन जे कायम दुष्कळी प्रदेश आहेत त्यांना कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहीजे.३०० वषॉपुवीॅ शिवाजी राजांनी गडावर पिण्याच्या वषॅभर सोय केली होती तर आता कोणती गोष्ट अशक्य आहे.म्हणून सांगतो बळीराजाला पाण्याची सोय आणी त्याच्या मालाला योग्य ऊत्पादन खचाॅच्या दिडपट भाव मिळाला तर त्यालाही आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येइल,चांगली दिवाळी साजरी करता येइल.बळीराजा आपल्याला सावरायला कोणी येणार नाही म्हणून सांगतो आपले जीवाचे लाडके बैल सजॉ राजाला खाटकास विकू नको त्याच्या चार्यापाण्याची सोय आत्ताच लाऊन ठेव कारण जवळजवळ ८ते९महीने तुला सांभाळायचे आहेत.सरकारच्या भरवशावर राहू नको कारण तु कजॅमाफी पाहीलीय ना?कशातच काही नाही आणी म्हणे कजॅमाफी केली.म्हणून हे बळीराजा सावध हो आणी आपलं कुटूंब आणी आपल्या पशुधनाला सांभा ळ     सावध हो भाऊ सावध हो.
source:- INTERNET

सौदागर काळे,
पंढरपूर.

बळीराजा.......तुला कुठून सावधान करावं.तुझं नाव ज्याने कायम तू बळी जात रहावे म्हणून बळीराजा ठेवलं त्याच्यापासून करायचं की ज्याने 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' हे वाक्य पुस्तकात अभिमानाने की जबरदस्तीने घुसवले त्याच्यापासून.खरंतर तुला बळीराजा म्हणतानाच लाज वाटली पाहिजे आम्हांला,एवढी वास्तविक बेकार अवस्था आहे सध्या.यंदा पाऊस खूप कमी झाला.तू मराठवाडा, विदर्भाचा असेल तर तेथील परिस्थिती खूपच वाईट. तुझ्या आयुष्यात दुष्काळ येत नाही तर तुझ्या जन्माबरोबर चिकटवला आहे,या व्यवस्थेने.पाण्याच्या दुष्काळासाठी तुला आम्ही सावधान करणं म्हणजे मास्तराची शाळा घेतल्यासारखी.म्हणून त्या नादात पडत नाही.

तुला सावधान करावंसं वाटतं आहे काही बाबींसाठी. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तुझ्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यापासून,सरकारच्या मोठया पॅकेजच्या घोषणांपासून, तुझे भांडवल करणाऱ्या प्रसारमाध्यमांकडून,गावच्या तलाठ्यापासून,शेतकरी चळवळी मॅनेज करणाऱ्या नेत्यांकडून,तुला छोटीशी मदत देतानासुद्धा सेल्फी काढणाऱ्यापासून, सोशल मीडियातून तुझ्यासाठी प्रमाणाच्या बाहेर भावुक होणाऱ्यासाठी,तुझ्या आत्महत्येचा बाजार मांडणाऱ्या राजकारण्यापासून,तू जगाचा पोशिंदा आहे हे मिरवणाऱ्याकडून,तुझ्यासाठी प्रत्येक वर्षी परिसंवाद आयोजित करणाऱ्यापासून,फिल्म बनवणाऱ्यापासून, प्रत्येक योजनेचा लाभार्थी करताना तुझ्या अंगावरचे कातडेही न सोडणाऱ्याकडून आणि जे फक्त आभासी डोस पाजत राहतात अशा माझ्यासारख्याकडून. बाकी काय पाऊस पुढच्या वर्षीही पडेल...पण पाण्याच्या नियोजनशून्यतेचा दुष्काळ पडतच राहील.कारण त्यातच अनेक वित्त- हितसंबंधी लाभार्थी दडलेले आहेत.नेमेची दुष्काळात अशा लोकांचा तुझ्या आयुष्यात खूप सुकाळ झाला आहे.यांना रोखण्यासाठी यंदाच्या दुष्काळात जरा सावधान हो.....

source:- INTERNET

अनिकेत कांबळे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

बळीराजा म्हंटल की साहजिकच आठवतो तो म्हणजे दानशूर बळी राजा ज्याला वामन बटू ने पाताळात गाडलं, परवाची गोष्ट आमच्या गावामध्ये बलिप्रतिपदा निम्मित बळी महोत्सव पार पडला...पण देशाला आजच्या बळीराजाची जाण अजूनतरी पडली नाही..
     पण खऱ्या अर्थाने गेल्या 60-70 वर्षात जेवढ्या आत्महत्या पाहिल्या नाहीत तेवढया या 4 वर्षात पाहिल्या...आमचं राहणं तर शाहूंच्या कोल्हापुरातील. आम्हाला दुष्काळाची झळ काय समजणार, पण एका कवी ची दुष्काळी कविता वाचली मन सुन्न झालं...

"बापाला कापसाच्या कर्जाचं एवढं बोझ झाल..
की जाताना नाकात दोन बोळ कापूस घेऊन गेला..फक्त"
 
 बळीराजा आता तू कुणाच्या  आधारावर राहू नकोस एवढीच विनंती आहे ,कारण इथं तुझ्या फाटक्या पायाची आणि जमिनीची कागदपत्र फायलीत गुंडाळून थंडीत शेकायला ठेवल्यात, तुझ्या पावसाचा दोरा आता तुलाच सापडणा झालाय तू कुठं तुझी जमीन शिवणार येड्या,
"ये सरकार वो सरकार दलाल भडवो की सरकार.."
अस तू मोर्चात म्हंटलास पण तुझी आशेची स्वप्न पाण्याचं फवारणी करून तुला तुझा हक्क हिरावून घेतला...
     माहीत आहे तुझ्याकडे आता पाण्याचा दुष्काळ आहे,पण तू ज्या माणसांनी तुझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यांनाच परत निवडून नको देऊ,जो तुझ्यासोबत अजूनही खंबीर पणे साथ आहे त्यालाच साथ दे,नाहीतर सावधान तुला आयुष्य पुन्हा गुंडाळून ठेवावं लागेल कुठल्यातरी फांदीला बैला संगटच....
       तुला ज्यांनी आशेची गाजरं दाखवणाऱ्या भडव्या राजकारणात आता तू पडू नको तू स्वतःचा उद्धार स्वतः कर,इथं तुला जगाचा पोशिंदा पण तुझ्या व्यथा फक्त कागदावरच राहिल्या बघ,
आता तू तुझाच कागद घे आणि तुझी आशा लिहून कुठेतरी झाडाच्या फांदीवर नको ठेऊ कारण तू जातो र पण माग राहणाऱ्या माणसांनी कुणाकडे बघून जगायचं सांग बर..तू स्वतःच भविष्य स्वतः गिरीव आणि दाखवून दे जगाला अजूनही लाथ मारिन तिथं पाणी काढीन...अशी तुझी ताकद...


source:- INTERNET
शीतल शिंदे ,  
दहिवडी जि. सातारा

सावधान ...
बळीराजा ...सावधान ..
शेतकरी बांधवांनो !  दुष्काळ येतोय सावधान !

दुष्काळ काय आपल्या पाचवीलाच पूजलाय .पण काय करणार निसर्गाच्या पुढे कोणाचे काय चालणार ? त्याच्या पेक्षा कोणीही मोठा नाही .पण जे आपल्या हातात आहे ते तर आपण करू शकतो ना ? मानव निर्मित दुष्काळ आपण टळू शकतो .झाडे लावणे , पाण्याचा अति वापर टाळणे , पाणी अडवून जीरवणे , शेततळे , बांध अडविने जंगल तोड रोखणे ,  इत्यादी गोष्टी करून आपण पाणी जतन करू शकतो .
ज्या प्रकारच्या प्रदेशात राहत असाल त्या प्रदेशाणूसार फळबागा , झाडे , उष्ण बिना पाण्याच्या  वातावरणात येणारी झाडे व फळे असे थोड़े थोड़े विभागून पिके घ्या .जेणेकरून काहीतरी हाती लागेल .एकाच प्रकारचे पिके घेतल्याने कधी कधी  फार मोठे नुकसान होवू शकते .म्हणून विचार पूर्वक शेती करा .
नफा झाल्यास सर्व खर्च करू नका .बुडीत भांडवल बाजूला काढून ठेवा .भविष्याचा विचार करून मगच खर्चाचे पाऊल उचला .कर्ज काढून लग्न हुंडा देत बसू नका .शासनाने विवाह मेळावे आयोजन केलेले असते त्याचा फायदा घ्या .शासकीय योजनांचा लाभ घ्या .वेळीच बचत ठेवा .शेतीला जोड व्यवसाय करा .

दुष्काळ पडला तर न डगमगता धीराने सामोरे जावा !
दुष्काळावर शांतपणाने मात करा !
जीव देई पर्यंत एवढे कमजोर होवू नका !
आज दुष्काळ आहे उद्या सुकाळ येईल !
तूमच्या जाण्याने कोणाचे काहीही जाणार नाही ! जाईल ते फक्त तूमच्या कुटुंबाचा आधार !
अनाथ होतील ती तुमचे मुले!  पोरकी होतील तुमची घरची मंडळी !
व्रुद्ध आई वडील पहा !
तूमच्या दावणीला बांधलेले सर्जा राजा पहा !
खचून जावू नका !
आत्महत्या करू नका !
लाख मोलाचा जीव आहे तुमचा ! त्याची किंम्मत नाही करता येणार!
मर्दा सारखे जागा ! जागलात तर
करोड रूपए कमावाल!
पण जीव मात्र घालवू नका !
दुष्काळात आप्तेष्टांची मदत घ्या !वेळ पडली तर तात्पुरते स्थलांतर करा !
पण जीव मात्र देवू नका !

वि४ दिवाळी अंक

दिवाळी - भाग ३ (तिसरा)



सानप बालाजी,बीड.
       आता साजरी होणारी दिवाळी आणि माझ्या लहानपणी साजरी होणारी दिवाळी यामध्ये खूप साम्य आढळून येते. माझ्या लहानपणीची दिवळी कमित कमी 10 दिवस चालायची, आणि आता दिवाळीच्या दिवशीसुद्धा दिवाळी आहे अस वाटत नाही हा बदल अंगावर पडणाऱ्या जबाबदर्यांचा आहे की आणखी कशाचा  हे मात्र मला आणखी कळले नाही.
       लहानपणी घरच्यांना प्रेमाने सांगून, विनवणी करून, रुसून फुगून, तस न ऐकल्यास भांडणे करून फटाके वाजवण्याची जी मजा होती ती आज जबाबदारीच्या ओझ्याखाली हरवत चालली आहे का...?
       लहानपणी प्रत्येक मित्राच्या घरी एक दिवस फराळासाठी फिक्स ठरलेला असायचा आता मात्र तू  "काय करतो...? जॉब कसा चालू आहे...?" या मित्राच्या घरच्यांच्या प्रश्नाच्या भीतीने तिकडे जानही हळू हळू टाळलं जात.
       आता लहान मुलांकडे पाहूनच जी काही दिवाळीची मजा मिळेल ती मिळो आणि आपले लहानपणीचे दिवस आठवून दुःखही होणार हे नक्की...!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~   

  तेजस महापुरे,  कराड.   
            दिवाळी म्हणजे खूप धमाल,मस्ती,रोषणाई, फराळ,भाऊबीजेला ला मोठ्या बहिणीला दिलेली कॅडबरी आणखी बरेच काही...माझा सर्वात आवडता सण आहे ही दिवाळी, जेव्हा डिसेंबर महिन्याच्या शेवटी पप्पा कॅलेंडर आणायचे तेव्हा मी पहिल्यांदा दिवाळी कोणत्या तारखेला आहे हे पाहायचो, मला ते खूप आवडत असे, आजही मी ते दरवर्षी नवीन कॅलेंडर आल्यावर करतोच...  आणि जशी जशी दिवाळी जवळ येईल तसा तसा माझा उत्साह वाढत असे, प्रथम सत्र परीक्षा संपली रे संपली की मित्रांसोबत किल्ला तयार करायला सुरुवात करत असे, आमचा 4 ते 5 मित्रांचा ग्रुप प्रत्येकाच्या घराजवळ किल्ला बनवण्यासाठी येत असू, खरच जेव्हा तो किल्ला बनवून पूर्ण होईल त्यावेळी आमचा आनंद गगनात मावत नसे...                                      किल्ला झाला की मग कपडे खरेदी,आकाशकंदील आणणे व छोटे आकाशकंदील घरी बनवणे तसेच फराळासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारपेठेत जाऊन आणणे हे मला फार आवडायचं, पहिल्या पहाटे उठून उटणे लावून गरम पाण्याने केलेली आंघोळ नंतर घराबाहेर लावलेल्या पणत्या सर्वच काही अफलातून...                   दिवाळी मध्ये मित्रांकडे फराळाला जायचे हे ठरलेलंच असायचं आज याच्या घरी तर उद्या माझ्या घरी, मी तर कॉलनी मधल्या प्रत्येक घरात जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत असे त्यात मला मोठा पराक्रम वाटे...                        4 थी पर्यंत मी फटाक्यांना घाबरत असे, बाहेर फटाके वाजू लागले की मी शक्यतो बाहेर पडत नसे, नंतर हळू हळू मित्रांच्या मदतीने फटाके वाजवायला शिकलो, परंतु जस जस वायू प्रदूषणाबद्दल समजू लागल तस मी फटाके वाजवणं सोडून दिलं, 8 वी नंतर मी आजपर्यंत कधीही फटाके वाजवले नाहीत...         खरच प्रत्येक वर्षीच्या दिवाळीच्या आठवणी या फार छान आहेत, या सणामुळे जस स्वतः आनंदी होतो तसेच दुसऱ्यालाही आनंद आपण देऊ शकतो, असच आनंदी होऊया आणि दुसर्यांनाही आनंद वाटत राहूया, वि4 ग्रुप मधील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडून येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिमाली भाटकर,रत्नागिरी.
         दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण उत्सव. संपूर्ण आसमंतात फराळाचा सुगंध दरवळत असतो. फटाक्यांच्या आवाजाने आणि रोषणाईने निसर्ग कसा दुमदुमून जातो. घरोघरी रांगोळ्या सजल्या असतात. आकाश कंदील जणू काही आकाशातल्या चांदण्या सोबत स्पर्धेत सहभागी होतात. अशीच दिवाळी साजरी होत असते सगळीकडे अगदी तुमच्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा.
    पण कधी विचार केलात की की ऋणानुबंध असलेली नाती संपतात आणि उरतो एकाकी प्रवास तिथे दिवाळी कशी काय साजरी होत असेल. आयुष्यात पहिल्यांदाच गौप्यस्फोट होऊन अनाथ पणाच लेबल लावलं गेलं तिथे साजरी केली जाते आपल्या सारखी दिवाळी.
          फुटपाथ वर बसून रांगोळ्या विकणारे, पणत्या मेणबत्त्या बनवणारी अपंग मुलं यांची दिवाळी ही दरवर्षी काहीतरी नवीन बदल घडवून आणणारी असते की काहीतरी नवकल्पाना घेऊन येणारी असते नाही माहिती ना?
        खरंच खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला मनात दिवाळीच्या निमित्ताने. शहरीकरण झाले लोक गावं सोडून शहरात येऊ लागले सणासुदीला गावी येता येता शहरातलेच होऊन गेले घरटे चुकल्या पाखरासारखे.  आणि जीर्ण शरीर वाटेकडे डोळे लावून बसलेली दिसते एखादया गावात एखाद्या चातकासारखी.
       हेच का आपले सण आज प्रत्येक जण मेसेज करतोय "आई बाबा ना असा किती बोनस मिळायचा की ते आमच्या चेहऱ्यावर हसू ठेवायचे."  पण यातले किती जण त्याच आईबाबांना सोडून दूर परदेशी कदाचित कामानिमित्त बाहेर असतील मग ते एक हास्य पुन्हां उमळण्यासाठी त्यांच्या बॉस जवळ एक सुट्टी मिळू नये शोकांतिकाच आहे ना? कारण प्रत्येक जण हेच कारण देतो बॉस सुट्टी देत नाही. मला वाटत यांचे बॉस परग्रहवासी असावे काय बरोबर ना.
          आपण दिवाळीत इतका फराळ बनवतो की शेवटी त्याला रस्त्यावर गाई गुरे यांची वाट पाहत तिष्ठत राहावं लागतं हीच का आपली दिवाळी. आणि हो हेच एखाद्या अनाथ आश्रम किंवा गरिबांना दिले तर काहीतरी पुण्य लाभेल या उद्देशाने तरी दान केले तर व्यर्थ नक्कीच नाही जाणार पण आपली विचार करण्याची कुवत फक्त रस्त्यापर्यंत च.
          फटाके इतके वाजवतो आपण की अख्या वर्षभराच प्रदूषण एकाच दिवशी कारण दिवाळी एकदाच येते वर्षांतून लहान बाळ शेजाऱ्यांकडे, बीपी पेशंट शेजारी आम्हाला काय फटाके फोडणार हौस आहे.
         मग शेजारी हॉस्पिटल आहे ही गोष्ट फारच दूर राहिली.
         आहे ना विचार करण्यासारखी दिवाळी खरंच चांगला विचार करा दिवाळी सणांची मांदियाळी पण ती सर्वांचे सोबत प्रेमाने साजरी करूया, प्रदूषण रोखण्यासाठी चार फटाक्यांच्या सोबत एक झाड नक्की लावूया.
           आपले मित्र परिवार नेहमीच येतात सणासुदीला एकदिवस ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे ज्यांना सण एकाकी वाटत त्या अनाथांना भेट देवून एक गोड नात निर्माण करूया.
        वृद्धाश्रमात देखील कुणीतरी वाट पाहत बसत नातवंडांची मग भेटायला जायला काय हरकत एक संध्याकाळ आजी आजोबा ना. या दिव्यांच्या सणात हजारो दिवे पेटवा पण त्यात एक दिवा असा असावा जो आपल्या सोबत इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवले.
         कारण आजही बरीच गावे फक्त दिव्यांच्या प्रकाशात जगतात कारण तिथं वीज पोहोचली नाही.
         दिवाळीत खूप जण किल्ले करतात पण ज्या शिवरायांनी ही परंपरा दिली त्यांच्या आठवणी याच दिवाळी सुटीत आपण रंगरंगोटी करून खराब करतो. जे जपता येत नाही त्यांची प्रतिकृती बांधून काय उपयोग तुम्हीच सांगा?
         मनाशी विचार करा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू निघो आपले आयुष्य.
     दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 राजश्री ठाकूर ,  मुंबई .
          खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट , आटपाट नगर होत , तिथली प्रजा सुखी , राजा समाधानी , वर्षभर सणवार , धामधूम . सणवार जाऊन काही दिवस उरले तर माणसे रोजच जगणं जगायची . व्रत वैकल्ये , जागरण गोंधळ यांचा रतीब होताच .
   एकूणच सुखासीन आयुष्य होते . हळूहळू दिवस पालटले , आटपाट नगरावर परचक्र आले , तशी या आधीही आक्रमणे होतीच पण माणसांनी धार्मिक असण बंद केलं नव्हतं . पण हे परचक्र मात्र वेगळं होत , रोजच्या जगण्यात हस्तक्षेप करणार होत .
   परचक्राने नगरजनांना तंत्रज्ञान , गती , शिक्षण यांची झलक दाखविली . त्यांच्या प्रथा मोडीत काढण्याचा , फूट पाडण्याचा प्रयत्न केला .. आणि अहो आश्चर्यम् सख्खे भाऊ म्हणणारे पक्के वैरी म्हणून ठाकले . नगरातल्या शहाण्या तरुणांनी हे ओळखले , बुद्धी गहाण ठेवून फक्त धर्माधिष्ठित वागण्याने नगराची हि स्थिती झाली आहे असे त्यांनी ओळखले आणि शिक्षणावर भर दिला . पुन्हा दिवस पालटले परचक्र गेले . आटपाट नगर आता दोन गटात मोडले गेले , प्रथा परंपरा पाळणारे व न पाळणारे , दोन्ही बाजू आपल्या मतावर ठाम होत्या . त्यातून एक नवीन कट्टर समुदाय तयार झाला .
   परस्पर मताचा आदर , वागणुकीतील स्वातंत्र्य या गोष्टी विस्मरणात गेल्या . मनाने कमकुवत झालेली माणस , माझं तेच खर म्हणण्यासाठी विकोपाला जाऊ लागली .
  पुन्हा एक पुढची पिढी आली , या पिढीला कळत होत इतिहासातील सगळंच उत्तम नाही आणि विज्ञानाची सगळीच कोडी अजुन उलगडली नाहीत . मग त्यांनी काय केलं ? विज्ञान-तंत्रज्ञान आणि इतिहास परंपरा यांची सांगड घालायला सुरुवात केली . कधी जमलं कधी बिनसलं . मग झाला गोंधळ ..
  काय चुकले ते ध्यानी येईना . नवीन मार्ग शोधता येईना आणि जुने सोडून देता येईना अशा वेळी त्यांनी एकच केले परिस्थितीला दोष द्यायला सुरुवात केले .. आधीचे सण कसे छान , आधीची माणसं कशी गोजिरवाणी , जमीन कशी सुपीक अन् अन्न कसं कसदार .. दिवाळीची अश्शी मजा असायची.. पण आता सगळं बदललं ...उसासा १ ..मग उसासा २ .... असे खूप उसासे , बदल नाही , फक्त कार्बन डायऑक्साइड मध्ये वाढ .
  मग हे प्रमाण वाढत गेलं दर वेळी दिवाळीच्या आठवडा पंधरवडा आधीपासून माणसं हळहळायला सुरू करायची मग जमेल तस दिवाळी साजरी करून पुन्हा थोडी हळहळ व्यक्त केली की कंदील पणत्या आणि हळहळ माळ्यावर पुढच्या वर्षासाठी .
  आता आटपाट नगर उसासे टाकत होते अशी कशी पोर हि माझी , यांना दोन घटका मौज करता यावी म्हणून सण आहेत याचा विसरच पडला आहे , त्यांनी आधी तर त्याला धार्मिकता चिकटवून टाकली आणि मग व्यवसायाच पॅकेजिंग . आपली कर्तव्ये पार पाडावी , उद्योगी असावे आणि त्यातून आपल्या ऐपतीने सवडीने सण साजरे करावे एवढी साधी गोष्ट यांच्या मठ्ठ डोक्यात का शिरत नाही बरे ? ऋणं कृत्वा घृतं पिबेत , हे कुठवर ? "
 त्याला वाटत होत सांगावस , ' मनाचा आवाज ऐका .. कालपेक्षा आज चांगला आहे तुमचा ते बघा ना एकदा .. किती आयुष्ये घालवाल चणचण म्हणजेच आनंद हे मानण्यात ? आणि खरच एवढ वाटत की काल चांगला होता ठाम विश्वास आहे आनंद त्यातच आहे तर वागा की तसे कुणी अडवल आहे ? पण तुम्ही नाही करणार ते . आणि मी आज आनंदी आहे , मला हे जग हे तंत्रज्ञान आवडत असं सांगण्यात तर तुम्हाला कमीपणा वाटतो . पण आज काल साठी हळळणारे तुम्ही उद्या या आज साठी खंतावून असाल . जगायचं विज्ञान युगात , फायदे घ्यायचे पण मान्य करायचं नाही . जीव अजूनही मातीत आहे म्हणजे आपण संवेदनशील आहोत  असा गोड समज करून घ्यायचा . संवेदनशीलता परिवर्तनक्षम असेल तरच खरी असते .
   नाही वाटत ना नका करू सण साजरे . आणि वाटतयं ना तर करा . बदल स्वीकारा . भांडवल करू नका . "


दिवाळीच्या आधीच सांगितलं हे आटपाट नगराने .. किती लोक ऐकतात ( पाळण नव्हे फक्त ऐकावं विचार करावा एवढच वाटतयं नगराला ) .

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अपेक्षा मानाजी,मुंबई.
      चाळीतली दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते खरंच महाभग्यवान.सुदैवानं माझ बालपण शिवडीच्या बी. डी. डी चाळीत गेलं.तिथल्या दिवाळीचा थाट काही औरच होता.
दिवाळीची पूर्वतयारी दहा दिवस आधीपासून सुरू व्हायची. पंधरा दिवस आधीपासूनच बाबांकडे नव्या कपड्यांसाठी चकाटा लावला जायचा.त्यानंतर आईची फराळाची तयारी आणि शेजारून येणारा घमघमाट.आमच्याकडे कंदील घरीच बनवला जायचा,एकत्र कुटुंबामध्ये सणाची मजा काही औरच असते.बाबा व काका मिळून कंदील बनवायचे,त्यासाठीच्या कांड्या जमा करणे,कागदाला गोंद लावून देणे ही जबाबदारी माझ्यावर असायची मी ही ती फार जिकरिने पार पाडायची.
दिवाळीच्या दिवशी बोचऱ्या थंडीत भल्या पहाटे उठायला तसं जीवावरच यायचं.उटण्याचा गंध साऱ्या घरभर दरवळायचा.आई व काकी आम्हा सर्वांना ऊटणं लावून द्यायच्या.मग त्या नरकासुराचा टाचेखाली चिरडताना जणू आपणच त्याचा वध करतोय असं माझ्या भाबड्या बालमनाला वाटायचं.आम्ही सर्वजण एकत्र फराळावर ताव मारायचो.त्यातही बाबांनी बनविलेले कळीचे लाडू मला खास आवडायचे.तुपातले ते मऊ लाडू अगदी तोंडाच बोळक झालेल्या माणसानेही आवडीने खावेत असे असायचे.त्या लाडवाची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते.बाबांना फटाके उडवायचा मोठा शौक होता.नानातऱ्हेच्या फटाक्यांचा खचचं घरात पडायचा.बाबा फटाके ‌फोडायला पुढे असायचे आणि मी त्यांच्यामागे दुडूदुडू लावायची.
दिवाळीत आमची चाळ चमचमत्या पोषाखातल्या वधूसारखी दिसायची. निरनिरळया आकाराचे कंदील आणि टीमटीमते ईवलेशे दिवे दारांची शोभा वाढवायचे,त्यातही एखाद्या बड्या माणसाच्या दारावर  काचेचे रंगीत पाण्याचे दिवे लागायचे,तेव्हा अशा दीव्यांचं फार अप्रूप वाटायचं.
आम्ही चाळीत मजल्यावरच फटाके फोडायचे त्यांच्या आवाजाने घरातली भांडी कॅब्रे डान्स करायची.सर्व चाळ एकत्र दिवाळी साजरी करायची,दिवाळी सारख्या  सणाने आमच्या चाळीचा एकोपा जपला होता.आज इतक्या वर्षांनी खूप काही बदललं घरात इनमिन दोन माणसं तरीही आई हट्टाने दिवाळी पूर्वीसारखी साजरी करते. नुसतं दिवाळी आधिसारखी राहिली नाही बोलून चालणार नाही. दिवाळीच दिवाळीपण आणि तिच्यातला गोडवा जपणं आपल्या पिढीच्या हातात आहे आणि ह्याची सुरुवात स्वतः पासून होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीता देशमुख,वसमत
                 या  शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम सुरू झालेला असतो. घरात धनधान्याची सुबत्ता असते. कृषीप्रधान देशातील  बारा बलुतेदार आणि वासुदेव,गोंधळी,मसणजोगी,यासारखी अनेक लोकं शेतकऱ्यावर अवलंबून असत. या लोकांचा अप्रत्यक्ष यांच्यावर हक्कच असायचा तो!  जेवढही पिकेल त्यात या लोकांचा वाटा शेतकरी काढून ठेवत असत. आणि घरधनीन पण मोठ्या मनाने हे दान करत असे. म्हणून या काळात येणारा दिवाळसण फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर  सर्वासाठी आनंदाचा अन् उत्साहाचा असे. म्हणून पूर्वीच्या काळी वीज नसल्याने दिवाळीच्या काळात एखादा किलो तेल दिव्याला जाळणेही त्यांच्यासाठी आनंदाची बाब असायची. दिवाळीमुळे अशी शेतकऱ्यांची,त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची मने आणि घरे उजळून निघत. तो मनाचा आणि घराचाही  दीपोत्सव असायचा. पण आज जगाचा पोशिंदाच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे  स्वतःचे पोट भरण्यास असमर्थ ठरत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेत बरोबर पिकत नाही,पिकले तर विकत नाही,विकले तर त्याला योग्य भाव मिळत नाही. इकडे यांत्रिकीकरणामुळे आणि  जागतिकीकरणाच्या धोरणामुळे बलुतेदारांवर आणि छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशावेळी आज  एकीकडे दिवाळी म्हणजे नुसता चंगळवाद असतो. पैशाची नुसती लयलूट सुरू असते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतलेले कर्जच फिटत नाही,इतर गरीबांच्या घरात एका फोडणीसाठी तेल मिळणे दुरापास्त असते,तिथे दिव्यांची  रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी यांचा ते विचार तरी करू शकत असतील का?
                अशावेळी मला माझ्या घरातील दिवाळी नजरेसमोर येण्याआधी असे चिंताग्रस्त चेहरे दिसतात आणि वाटते,मी  भरमसाठ खर्च करून दिवाळी साजरी करत असेन तर त्यातला  फार मोठा नाही पण "चिऊचा घास वंचितासाठी" नक्कीच काढू शकतो. असा अनेकांचा एकेक   चिऊचा घास मिळून अनेकांची पोट भरू शकतात. तरच मला वाटते,मला माझी दिवाळी साजरी करण्याचा अधिकार आहे. कारण "सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या  देशावर प्रेम आहेअसे आपण फक्त वाणीनेच न म्हणता कृतीतूनही ते प्रेम दिसले पाहिजे.
            दरवर्षीप्रमाणेच यंदाही माझी दिवाळी मी आधी वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवूनच मग साजरी करणार आहे. यावर्षी वेगळी मोहीम आम्ही राबवत आहोत. दिवाळीनिमित्त आपण खरेदी मोठ्या प्रमाणात करतो. तिथे काहीही घासघीस न करता ते सांगेल त्या भावात खरेदी करतो. घासघीस करून फायदाही नसतो. पण शेतकऱ्याच्या मजबुरीचा गैरफायदा आपण घेतो. आणि तिथे घासघिस करतो. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन भावही बऱ्याचदा मिळत नाही. त्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती व्हावी,या हेतूने सुरुवात म्हणून शेतकऱ्याजवळचीच झेंडूची  फुले घ्यायची,बाजारात कोणताही भाव असो, मी ५०/ रु कि. प्रमाणे आणि कमीत कमी ५कि घ्यायचेच अशी एक चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे *संवाद* मार्फत यंदा  "शांतिवन आर्वी,जि बीड" येथे स्वतःकडून व मित्रमैत्रिणीकडून  धान्य,पैसे आणि दिवाळीचे साहित्य नेऊन देत आहोत. मला वाटते,आपण दिवाळी हा सण खूप मोठा मानतो. मग तो सगळ्यानाच आनंददायी ठरावा,म्हणून ही माझी व माझ्या कुटुंबाची व ठरलेल्या मित्रमैत्रिणीची दिवाळी भविष्यातही अशीच चालू राहील. आणि कृषिप्रधान देशातील दिवाळी अशीच सर्वांचीच  दातृत्वाची राहो. माझे घर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघताना वंचिताच्या घरालाही माझ्याच एका पणतीने उजळून टाकावं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैशाली खरात गोरे , सोलापूर .
        दिवाळी हा सण आपल्या कुटुंबातच नाही तर सर्व समाजात  साजरा होतो. सर्व सनात हा सण मोठा मानला जातो.ह्या सणा दिवशी घरात सगळे एकत्र यायचे आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू  होत असत आपापले अनुभव सांगायचे ,ते दिवसच खूप छान होते,सगळे जण आनंदात असायचे.नव नवीन ड्रेस घेणे फटाके उडवणे हे सगळ नवीन राहायचं त्यामुळें खूप ऊसुक्ता असायची दिवाळी चालू होयच्या आधी अस वाटायचं की कधी एकदा सुट्टी लागती आणि कधी किल्ले बनवायला चालू करतोय , ज्यादिवशी सुट्टी लागायची त्या दिवशी पेपर च गांभीर्य ही एवढं नसायचं पण  सुट्टी लागायची याचा खूप आनंद असायचा एकदा की सुट्टी लागली की मग चालू होयच नवीन कपडे घ्याचे फटकड्या आणायच्या आणि किल्ला बनवायचा. किल्ला बनवताना माती दगड विटा गोळा करून  आणायचो किल्ला बनवायचा म्हणल की ४,5  दिवस लागायचे किल्यावर मावळे ठेवायचे आणि सगळ्यात वरती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवायचो , कील्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचं नाव मोहरी  टाकून  काढायचो आणि किल्ला बनवल्याचा एवढा आनंदा  हॉयचा की सगल्याना सांगत फिरायचो आणि गल्लीतील सगळ्यांचे किल्ले बघायचो खूप मजा यायची त्या वेळेस दिवाळीचं फराळ साठी आई ला कामात मदत करायची नवीन नवीन कपडे घालायचे फटाकड्या उडवायच्या , फटाके उडवताना अमचात आणि चुलत  काका मधे शर्यत लागायची एक मेकानच्या घरावर रॉकेट सोडायची खूप मजा यायची त्या वेळेस सगळ्यांचं घरी फराळाला जायचे आणि त्यांना पण आपल्या घरी बोलवायचं भावाला आंघोळ घालताना आमचे रोज नंबर असायचे आणि त्याचा कडून गिफ्ट घेयची आतुर असायची पण आता लहपणीच्या दिवली एवढी मजा नाही येत नाही कारण आता आपली जागा आपल्या पुतण्यानी व भाच्यानी  घेतली आहे आणि म्हणुच मजेची ज्जिमेदरीच निघून गेलीय अस वाटत कधी कधी अस वाट की आपण अजुन एकदा लहान व्हावं  आणि ते दिवस यावे . यावरून मला एक म्हण आठवते लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दिवाळी - भाग २ (दुसरा)



श्यामकांत डगवार,यवतमाळ.
          लहानपणी दिवाळीची खुप खुप मजा असायची. दिवाळीची चाहूल ही दसऱ्यापासुनच लागायची कारण दिवाळीला जसे फटाके फोडण्याचा आनंद घेता येत होता तसाच आनंद दसऱ्याला रावण दहणाच्या वेळी होणाऱ्या फटाक्याच्यां आतीषबाजीचा आनंद त्यावेळेस मिळत असल्याने ही चाहूल दसऱ्यापासूनच लागायची आमच्या लहानपणी सिंधी कॅम्प परिसर म्हणजे किरकोळ फटाक्याचं बाजाराचं ठिकाण. आम्ही रोज या परिसरात जाऊन फटाके फोडणाऱ्या व्यक्तिच्यां अवती भवती असायचो. आणी त्यांनी फोडलेल्या फटाक्यांचा आवाजाचा मनमुराद आनंद लुटायचो. कारण आर्थिक परिस्थिती जेमतेम असायची इच्छा असुन देखील बघण्याचा आनंद घेण्यापलिकडे मात्र काहीच करू शकत नव्हतो. जशी फटाक्याच्यां आवाजाची मजा तशीच आकाशदिव्यांच्या प्रकाशाची मजा यायची सायंकाळी सहा वाजले की अनेकांकडे रंगिबेरंगी आकाशदिवे  लागायचे. अनेकजण घरीच आकाशदिवे बनवायचे तो आकाशदिव्यांचा मंद प्रकाश मनाला प्रफुल्लित करून जायचा. सोबतच गड किल्ले बनवण्याची जणू स्पर्धाच लागायाची घरोघरी मुले माती आणि विटा किवां छोटे दगड यांच्या माध्यमातुन किल्ले सजवायचे . खुप आनंद मिळायच हे करतानां . दिवाळी म्हटली पक्वानांची रेलचेल. घरो घरी फराळाची मिष्ठाणं असायची. पण   शेजारी जेव्हा फराळाला बाेलवण्याकरिता एकमेकांशी स्पर्धा करीत तेव्हा फराळाला बाेलावण्याचा व शेजारी फराळाला जाण्याचा तो आनंद अवर्णीयच. नरकचतुर्दशीची पहाटे गुलाबी थंडीत उठायचं आणि आईच्या हातची उटंण लाऊन आंघोळ करायची हा अनुभव खुपच आनंद देणारा असायचा.
अशी दिवाळी आता चाळीस वर्षानंतर अनुभवाल्या मिळत नाही यांची खूप  खंत वाटंते .कारण पुर्वी सारखे एकमेकात मिसळून दिवाळी साजरी करण्याचे दिवस केव्हाच लोप पावले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महेश देशपांडे,ढोकी, जिल्हा धाराशिव.

दिवाळी सण हा भारतीयांची संपूर्ण जगाला दिलेली एक अनोखी देणगी आहे,
चीन, रशिया, अमेरिका या देशांमध्ये सुद्धा दिवाळी सारख्या सणाचे आयोजन केले जाते.
पण त्याला कुठलीही पार्श्वभूमी आहे असं मला ज्ञात नाही. लोक फक्त एकत्र येण्यासाठी साजरे करतात...

भारतामध्ये दिवाळीला इतर कोणत्याही सनांपेक्षा अनन्यसाधारण महत्व आहे.
अगदी साधा विचार केला तर, कोणत्या दिवसात आपण हा सण साजरा करतो, तर हिवाळ्यात... याच दिवसात का ? तर आपल्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे जो बदल होतो, आज तो बदल कसा स्वीकारावा यासाठी...
सामाजिक पार्श्वभूमी पाहिली तर खूप मोठा बदल घडतो... याच कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडे ही साधन नाहीत अगदी त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं आणि त्यामुळे आपल्याला समाजात आर्थिक दृष्टीने अगदी गरीब असणाऱ्या लोकांना काय हवं काय नको हे समजत... आणि त्यामुळे आज अनेक संस्था यासाठी खुप मोलाचं योगदान देतात... त्यांना खरंच सलाम..

दिवाळी सणाला साहित्याची खूप मोठी पार्श्वभूमी आहे...
मला वाटत आता ही संख्या कमी झाली असेल पण इतर कुठल्याही     कर्यक्रमाला नाही इतकी, दिवाळी मासिक छापली जात होती... खूप, म्हणजे खूप..
आता हळूहळू याचा वाचक वर्गही वाढतो आहे...मी स्वतः अनेक दिवाळी अंक वाचतो माझ्याकडे तसा संग्रह आहे... खूप खूप समृद्ध झाल्यासारखं वाटत..

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे,
*दिवाळी पहाट*. मी संगीत ही साधना मानतो, ईश्वराच्या जवळ जाण्याची..!
आणि दिवाळी पहाट च्या निमित्ताने किंवा दिवाळीतील इतर दिवशी सुद्धा अगदी भरगच्च कर्यक्रम असतात.. मन प्रसन्न होत, हा माझा अनुभव आहे.. तो तुम्ही सुद्धा अनुभवावा..

लहानपणीच्या खूप आठवणी आहेत त्या फक्त आठवल्या जरी तरी अगदी लहान मुलासारखं आनंदून जायला होत..😊

दिवाळीच्या धार्मिक पार्श्वभूमीवर खूप काही बोलल जात की, अमुक दिवशी अस झालं म्हणून अस करायचं  वैगेरे..
या सर्वांपेक्षा आपल्या मनाला पटतील अशा गोष्टी करणं मला जास्तीच योग्य वाटत...

बहुतेक सर्व गोष्टींना स्पर्श केला आहे असं वाटत...😊

या सर्वच्या सर्व गोष्टींमागे जी प्रेरणा आहे ती मला वाटत की माणसाचं आयुष्य सर्वार्थानं समृद्ध व्हावं अशीच आहे..!
मग तो समाजातला कोणताही व्यक्ती असो...!

आणि आपणही तसच वागण्याचा प्रयत्न करावा असा मला वाटत..

इतर गोष्टींचा आंनद घेत असताना, सर्व घटकांना जास्तीत जास्त सामावून घेता येईल हा विचार हवा अस माळ वाटत....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रामेश्वर जाधव, नांदेड.

         दिवाळीचा सण म्हटला की, लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर येतात व दिपावली सणावरती लिहायचे म्हटले तर त्याच लिहावाव्या वाटतात.

        दिवाळी जस जशी एक एक दिवस जवळ येते तशीच मामाच्या गावी जायची ओढ वाटते आणि दिवाळी दोन दिवस राहीली म्हटल की आई जवळ विचार पुस चालु की मामा कधी येणार ...

         मामा न्यायला आले की घाई होयायची की कधी तरी घरी जातो घरी गेल्या नंतर मावशीच्या मुलांबरोबर मस्त फटाखे फोडायचे ते पण वेगवेगळ्या प्रयोगांनी ...

         दिवाळीची आंघोळ म्हटली की थंडगार सुगंधी ऊटणे अंगाला लावताच झोंबणारे मग आम्हा भावंडा मध्ये तुझी बारी माझी बारी  अस म्हणत त्यामध्ये मामा पण सहभागी असायचे मग काय कुणालाही ऊटणे लावणे चालु झाले की बाकीचे मस्त दुरून मज्जा घ्यायचे शेवटी आपणाला पण अंघोळीला समोर जायचे याची पण मनाला वचक लागायची हा उपक्रम दिवाळीच्या शेवटच्या दिवशी पर्यंत चालायचा...

            या दिवाळीच्या सणा निमित्याने सर्वजन एकत्र आलेले रहायचे व एकमेकांविषयी वर्षभर झालेल्या गोष्टींची ऊजळणी होयायची...

          आता पण दिवाळी आली की,  लहान पनीच्या  दिवाळी एवढी मज्जा नाही वाटत कारण अस असाव की आता आपली जागा आपल्या भाचे व पुतन्यांनी घेतली व आपण मामा च्या जागी आलेले आहोत म्हणुन की काय ही मज्जा जिम्मेदारी दर्शवते...

                   धन्यवाद.
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर,सांगली.
.
"दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा" असा उल्लेख असणारा दिवाळीचा सण. याचा खरा अनुभव घेतला तो लहानपणीच. त्यावेळी खरंच भारी वाटायचं. दिवाळीच्या साधारण 8-10 दिवस आधीपासूनच किल्ला बनवायच्या तयारीला लागायचं. किल्ल्याला मनासारखा आकार येईपर्यंत 4-5 दिवस कसे निघून जायचे तेही समजायचं नाही. आकार तयार झाल्यावर पुढचे 4 दिवस सजावटीसाठी जायचे. मातीत खेळताना मस्तच वाटायचं. अक्षरशः जेवायचंही भान राहायचं नाही. दिवाळीदिवशी पहाटे लवकर उठण्यात एक वेगळीच उत्सुकता असायची. कारण जो लवकर आवरून तयार होईल त्याला फटाके फोडायला जास्त वेळ मिळायचा. त्यामुळं ऐन थंडीतसुद्धा पहाटे उठायची चढाओढ असायची.
.
नंतर शाळेत असतानाच घरच्या परिस्थितीमुळं शेतीकडं लक्ष द्यायला लागलं. आमची कृष्णाकाठची शेती म्हणजे ऊसाचं पीक हमखास असतंच. आणि ऊसाचा हंगाम ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू होतो. त्यामुळं ऊसतोड मजुरांचा संपर्क दिवाळीच्या दिवसांमध्ये हमखास येतोच. एकीकडे आपण दिवाळी साजरी करत असतो अन त्याच वेळी दुसरीकडे पोटासाठी धडपडणारे ऊसतोड मजूर आपला अर्धा-अधिक संसार सोबत घेऊन गावाबाहेरच्या एखाद्या रिकाम्या माळरानावर आपला हंगामी संसार उभारत असतात. जशी आपली दिवाळी असते तशीच त्यांचीही दिवाळी असते. पण दिवाळीपेक्षा त्यांना चिंता असते ती त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची. त्यामुळेच त्यांना चिंता सतावत असते कधी अवकाळी पडणाऱ्या पावसाची तर कधी ऊसदरासाठी पेटणाऱ्या आंदोलनाची. कारण या सगळ्याचा जसा शेतकऱ्याला फटका बसतो तसाच तो त्यांनाही बसत असतो. आणि इतकं असूनही ते त्यांच्यापरीनं सण साजरा करतात.
.
'वर आभाळ खाली धरती' अशा स्थितीत आणि कामाच्या व्यापातसुद्धा ज्या पद्धतीनं, ज्या उत्साहानं ते दिवाळीसारख्या सणाचं स्वागत करतात, त्यासाठीचा फराळ वेळात वेळ काढून बनवतात. समोर असणाऱ्या परिस्थितीवर मात करून आपली पारंपरिकता आणि संस्कृती जपताना त्यांना बघितलं की नक्कीच समाधान वाटतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मयूर पाटील,मोर्शी जिल्हा अमरावती.

दीपावली मनाई सुहानी
दीपावली मनाये सुहानी

ज्या दीपावली ला साई बाबांनी ज्या हाताने बिना तेलाचे दिवे लावले होते तसेच आपण आज खरच या विषयावर चर्चा करत आहात याचा मला अभीमान वाटतो. दिवाळी हा सण आहे उत्सवाचा ! माझे खूप खूप अनुभव आहेत दिवाळी बाबतीतचे... काही छान आणि वाईट !! 

मी लेखक नाही... या ग्रुप चा वाचक आहे. खूप काही या ग्रुप मधून शिकलो पण लिहायचा प्रयत्न कधी केला नाही. मला माहित आहे की मी नवोदित लेखक आहे म्हणून मला सर्व माफ करतील. आज जे काही मी शिकलो या ग्रुप मधून त्या नुसार मी प्रयत्न करेल लिहायचा या नंतर नेहमी ! 🙏🏼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 शीतल शिंदे, दहिवडी जि सातारा.

🤹‍♀🤹‍♂ दिवाळी आली रे दिवाळी आली ! हे हे ,
दिवाळी जवळ आली की आईच्या  मागे सारखी कटकट आई मला कपडे घे .मला असला फ्रॉक घे हे ते घे .सारखी आईच्याआगे कटकट आणी सतत प्रश्न विच्यारायचे काय काय बनवायचे,  आणायचे आपल्याला .
पण कसे भागवायचे हे त्यांच्या मानत त्यावेळी प्रश्न असतील .हे आता कळतेय .

खरेच दिवाळी सण म्हणजे सुखाचे दिवाळ काढणारा सण असतो .खरेतर हा सण सर्वांसाठीच आनंद आणी उस्ताह आणणारा असा सण .मात्र लहान मुलांसाठी त्यांच्या आयुष्य भरासाठिच्या आठवणी असतात .त्यांना काहीही माहीत नसते खर्च किती होतो खूप सुट्टी आणी आनंद असतो एवढे मात्र माहीत .

पण कमीतकमी या निमित्ताने तरी सर्व स्तरातील लोकांना गोड धोड  खायला आणी नवीन कपडे घेण्याची संधी - सवड मिळते मग भले कर्ज का काढायचे होईना .वर्षातून किमान चार दिवस तरी आनंदाणे दिवस घालवतात .

श्रीमंतांची काय रोजचीच दिवाळी असते .
दिवाळीला बरोबर शेती मालाचा दर कमी होतो . लाखो शेतकरी आपला माल कसाबसा मिळेल त्या भावाने विकून दिवाळीची  खरेदी करतात .
खरेतर सरकारने प्रत्येक गरजू लोकांना दिवाळी सणासाठी बोनस दिला पाहिजे .आणी त्यासाठीच लागणाऱ्या खाद्य वस्तूंची किंम्मत थोड्या दिवसांसाठी तरी  कमी करणे गरजेचे आहे .किंवा या सणासाठी दारिद्र्य रेषेतील लोकांना रेशन वरती जास्त साहित्य पुरवले जावे.

पण माझी  खरी दिवाळी असेल ती म्हणजे ज्या दिवशी या देशातील आतंकवाद्यांविरोधात सरकार कठोर पाउले उचलेल आणी  आतंकवाद 🤕 नाहीसा  करेल सरकार .......  !

तेव्हा माझी खरी दिवाळी असेल जेव्हा माझे सीमेवरचे जवान बंधु रात्रं दिवस पहारा देतात ते जवान बंधु  शांतीमय वातावरणात दिवाळी साजरी करतील !

माझी खरी दिवाळी असेल,  जेव्हा माझ्या सर्व पोलीस बंधु ,  सुरक्षा विभागातील सर्व कर्मचारी बंधु सुखाने त्यांच्या कुटुंबात दिवाळी साजरी करतील !
कारण ते पहारा देतात तेव्हा आपण सुखाने आनंदाने हा दिवाळी सण साजरा करतोय .

माझी खरी दिवाळी ती असेल जेव्हा  न्यायदाते डोळे उघडे ठेवून आणी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निष्पक्षपणे न्यायदानाचे काम करतील आणी गुन्हेगारांना सजा देवून निरपराधी लोकांना दिलासा देतील ! ती माझी खरी दिवाळी आसेल !

येयील का एक दिवस अशी दिवाळी माझ्यासाथी ?

सांगा ना ? येयील का ? 😞

कधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*"माझ्या कोकणातील गावाकडची दिवाळी"....*

अक्षय गांवकर,
गाव. पारपोली,
ता. सावंतवाडी,
जि. सिधुदुर्ग.


भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी

भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरी होते. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. पण माझ्या कोकणात अजुनही साधी अन् सरळ पद्धतीने पण मनापासुन दिवाळी साजरी केली जाते. मला आठवते ती लहानपणाची गावची दिवाळी जी आजही कमी अधीक तशीच साजरी होते.

दिवाळी म्हणजे शाळेला सुट्टी चांगली आठ दहा दिवस सुट्टी मिळायची. लहानपणी ही मोठी चंगळच असे. परिक्षा व्हायची , रीजल्ट लागायचा अन् मग सुट्टी पडायची. मग आमच नियोजन चालु व्हायच. दिवाळीत मोठ आकर्षण जर कशाच असेल तर ते आकाशकंदिल बनवायच. चुलत भाऊ तसेच वाडीतील दोस्त मंडळी जमुन एखादा मोठा कंदिल बनवायचा अन् तो बरोबर रस्त्यावर दोन्ही बाजुंनी बांधुन टांगायचा. त्याच बरोबर बांबूच्या बारीक काठ्यांची चांदणी बनवायची, त्याला सभोवती रंगीबेरंगी कागद (फोली) लावुन त्यात बल्प सोडायचा अन् घरासमोर लावायचा. संध्याकाळी घरा बाहेर आईची रांगोळी काढुन झाली की पणत्या लावायला मी अग्रेसर असायचो.

घरी म्हणाल तर दिवाळी जवळ आली की आईची फोहे कुटुन(बनवुन) आणण्यासाठी धावपळ असायची. कोकणात दिवाळीपुर्वी बर्‍यापैकी भातकापणी संपलेली असते. या नव्या भाताचे पोहे बनऊन आणुन त्याचा उपार देवाला दाखवायची प्रथा आहे. म्हणुन मग आई भात भिजत घालायची त्यानंतर ते सुकवुन एका पिशवीत भरुन बाबांच्यास्वादिन करायची. जवळपास कुठे गिरण नसल्याने सरळ तालुकाच गाठावा लागायचा. सावंतवाडीत साटेलकरांच्या गिरणीवर ही गर्दी असायची. बाबा सकाळी ५.३० वाजता पारपोली गावातुन जाणारी पहीली गाडी पकडुन सावंतवाडीत पोहचायचे आणि फोहे कुटुन आणायचे. इथुनच खरी दिवाळी चालु व्हायची...

त्यानंतर खरी मजा जर कशात असेल तर नरकासुर बनवण्यात. आजही सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात नरकासुर स्पर्धा होतात. जरी व्यवसायीक नसली तरी तशी स्पर्धा आमच्यातही असायची प्रत्येक वाडी वाडी वर नरकासुर बनवले जायचे. त्यासाठी जुन शर्ट पॅन्ट तसच मातीच मडक अशी जमवाजमव सुरू व्हायची. बाकी त्या कपड्यांत गवत भरून मडक रंगऊन नरकासुर रात्री आठ वाजता तयार असायचा. आज काल रंगीत मुखवटे भेटतात. पण तो जो रंगऊन नरकासुर बनवायचो त्याची सर म्हणा किंवा ती मजा आज नाही. मग रात्री जेऊन खाऊन झाल्यावर नरकासुराला रात्रभर गावात फिरवायचो. कोणाचा नरकासुर चांगला झालाय यात चढाओढ असायची. तसेच कोणीही कोणाचा नरकासुर पळऊन न्हायचे म्हणुन रात्रभर जागरण असायच ते वेगळच. मग सकाळी सहा वाजता गावाबाहेर पुलावर नेऊन नरकासुर जाळायचो.

नरकासुर जाळुन आल्यावर मस्त गरम पाण्याने आंगोळ व्हायची आणि मग तुळशीसमोर कारीट फोडण्याने आमची दिवाळी सुरु व्हायची. कारीट फोडुन गोविंदा गोविंदा अशी आरोळी द्यायची अन् त्या फोडलेल्या कारेटातली एक बी तोंडात टाकायची. तोंड कडु जार होऊन जायच पण त्याला पर्याय नसायचा. त्यानंतर सकाळी घरच्या नविन भाताचे फोहे ते पण गोडे आणि तिखट असे बनवले जायचे त्या सोबत उकडलेली रताळी हा मेनु ठरलेला अगदि आजही.

लक्ष्मिपुजना दिवशी भाताच्या राशींची पूजा झाली की मी माझ्या ताई सोबत आमच्या गुरांच्या गोठ्यात शेणाचा छोटा गोठा बनवून त्याला फुलांनी सजवायचो. जोताच्या रेड्यांन सोबत इतरही छोट्या मोठ्या गुरांच्या शिंगाना पीठाने किवा कधीकधी रंगाने रंगवायचो आईने बनवलेली पोळी त्यांना खावु घालुन घरी परतायचो .दुपारी काळ्या वाटण्याचे सांभार आणि पोळ्यांचे जेवण व्हायचे.

भाऊबीज दिवशी अगदी साध्यासुध्या प्रकारात भाऊबीज व्हायची, फार मोठ्या भेटवस्तू नसायच्या. घरात उपयोगाला येतील अशी स्टीलची भांडी डब्बा अशीच काही तरी भेटवस्तु अन् ओवाळणी असायची. तीही आई बाबांनी दिलेल्या पैशातुन.

अशी ही दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यत असायची. ती लगबग वेगळीच तुळशीच्या लग्ना अगोदर अंगण बनवणे हे मोठ काम असायच. अंगण म्हणजे कोकणातील घरांची खरी शोभा. पावसाळ्यात अंगण खराब होत ते खणुन पुन्हा नविन बनवायच. शेणाने सारवुन तयार करायच. त्यानंतर मग तुळस रंगविण्याचे आवडीचे काम होत असे. तुळशी मध्ये टाकायला लागणारे चिंचा, आवळे आम्ही खुप लांब जंगलातुन जावुन आणायचो. तुलसी विवाहादिवशी संध्याकाळी तुळस सजवून तुळशीचे लग्न लावायचे नंतर लग्न लावुन झाल्यावर चिरमुले वाटले जायचे पहीले चिरमुले तुळशी समोर ठेवल्यावर टोपातील चिरमुले मुठभर पकडुन वर उडवले जायचे आणि आम्ही ते तोंड उघड ठेवुन खाण्याचा प्रयन्त करायचो. सर्व पोर चिरमुले आपापल्या पिशवीत जमवायचे त्यानंतर त्या चिरमुल्यांचे कोणी भेळ बनवायचा तर कोणी चहा सोबत खायचा. अशा पद्धतीने धमाल मस्तीत दिवाळी सणाची सांगता व्हायची.

सुट्टी संपायची शाळा सुरू व्हायची. त्यानंतर मग वेध लागायचे गावच्या जत्रेचे. कोकणात वार्षिक होणारे जत्राेत्सव म्हणजे मोठी पर्वणी. दशावतार नाटक अन् बाकी सगळी धमाल. या विषयावर पुन्हा कधीतरी.
तर सगळ्यांना माझ्याकडुन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा . .

*शुभ दीपावली...*

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************