फेसबुक वरील समाजसेवा



प्रविण, मुंबई

महाराष्ट्राला सामाजिक सुधारकांची फार मोठी परंपरा आहे, अगदी संत ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते डॉ दाभोळकर, अण्णा हजारे पर्यंत. या मातीं देशकार्य आणि समाजकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पण त्याच बाजारीकरण मात्र या परंपरेतील नाही. आज फेसबुक वरची समाजसेवा म्हणजे बाजारीकरण आणि कथित सामाजिकबांधिलकीच जाहीर प्रदर्शन झाले आहे. अगदी क्षुल्लक प्रसंगाचे फोटो टाकून कोणावर तरी उपकार केल्याचा आव आणला जातो. काही स्टेटस तर असे भन्नाट असतात का कळताच नाही नेमकं काय म्हणावं  ते "पूरग्रस्तांना मदत केली फीलिंग शोषली रिस्पॉन्सईबाल विथ करण, प्राची अँड 13 अदर्स"
या सोशल मीडिया च्या मायाजालात एक कळलं की फेसबुक कधीच फेस (चेहरा)बुक नव्हतं नाही आणि नसेल
________________________________________


            अभिजीत गोडसे , सातारा

              सामाजिक कार्य हा आपल्याकडे फारसा चर्चेत नसणारा विषय. दरवर्षीचा मॅगसेस पुरस्कार जाहीर झाल्यानंतर थोडीफार आपल्याकडे झालीस तर एक-दोन सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा होत राहते. कारण आपल्याला राजकीय गप्पातून सामाजिक गप्पांनकडे यायला मुळात वेळच नसतो.असो..शाहू, फुले , आंबेडकर , आगरकर , अलिकडचे आमटे , हजारे , कोल्हे इ. सामाजिक कार्य करणारी फळी होती / आहे.. शाश्वत विकासाकडे या सर्वांचे लक्ष होते.. आगरकरांनी तर राजकीय सुधारणा ऐवजी अगोदर सामाजिक सुधारणा झाल्याच पाहिजेत हाच मुद्दा रेटून धरला होता.. कारण या सर्वांनी देशहित आणि समाजहित हेच पाहिले आणि पाहत आहेत.. यांची महती पिढ्यानपिढ्या चालूच राहील.
        भारतामध्ये १९९१ नंतर खर्या अर्थाने दूरसंचार क्रांती उदयास आली.. भारत नवीन क्षेत्रांमध्ये चमकू लागला. आत्ता अलीकडे आलेले फेसबुक या माध्यमाने तर निवडणुका कशा जिंकायच्या हेसुद्धा दाखवून दिले.. या माध्यमाचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटा देखील आहे. संपूर्ण जग या माध्यमाने व्यापले. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत या फेसबुकने प्रत्येकाला जोडले, देशात परदेशात मुखवटा नसणारी माणसं यांचे आचार-विचार चांगल्या वाईट घटना फेसबुकने पादक्रांत केल्या. आणि खऱ्या अर्थानं याच्यामुळे हा फेसबुकचा चव्हाटा चांगलाच फुलला. अलीकडच्या सात-आठ वर्षांमध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशा भावनेने प्रेरित झालेली नवयुवक या फेसबुकच्या वाटेवरून समाजसेवा करू लागले.. कारण कमी कालावधीमध्ये कमी कामांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे हा फेसबुक चव्हाटा.. अलीकडच्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना बाबा आमटे कोण आहेत हे देखील माहीत नसेल पण ते फेसबूक वर फार मोठे सामाजिक कार्यकर्ते असतात.. अर्थात स्वयंघोषित देखील.. हे सामाजिक कार्यकर्ते फेसबुक वरील लाईक आणि कमेंट या आभासी माध्यमातून आपण किती थोर सामाजिक कार्यकर्ते आहोत याची त्यांना जाणीव होत राहते.. मागील महिन्यात पूरग्रस्तांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी खूपच तळमळीने फेसबुक चव्हाट्यावर मदत केली आहे असो.
       आपल्याकडे समाधानी माणूस कोणाला म्हणावे तर आपली एक ठराविक व्याख्या असते. ज्याच्या कडे गाडी, स्वतःचं घर, चार पैसे  आहेत.म्हणजे तो समाधानी पण त्याच्यापलिकडेही जग आहे हे त्याला आयुष्य संपलं तरी सुद्धा कळत नाही किंवा त्याच्या गावी ही नसते.. तसेच फेसबूक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम त्याच्यापलिकडेही जग आहे. हे अशा माध्यमातील चव्हाट्या मध्ये खेळणाऱ्या आणि त्यातल्या त्यात चव्हाट्यात राहून सामाजिक कार्य कर्त्यांना हे कळायला हवे. नाहीतर या फेसबुकच्या रंगीबेरंगी दुनियेत स्वतःचा बेरंग झालेला कळणार देखील नाही. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर आपण  वेळ किती घालवला..हे सर्व वर्ष मोजून   त्याचा स्वतःला आणि  समाजाला काही उपयोग देखील होणार नाही.
________________________________________


 अनिल गोडबोले
सोलापूर

समाज सेवा करणे हा आनंदाचा किंवा व्यवसायाचा भाग असू शकतो. आज व्यवसायिक समाज कार्यकर्ते समाजकार्याचे शिक्षण घेऊन काम करत आहेत.

काहीजण इतर सर्व व्यवसाय सोडून समाज कार्यामध्ये भरपूर जण येत आहेत... कारण काय ... तर तयार होणारी समाजातील प्रतिमा आणि  आणि वारेमाप प्रसिद्धी..

समाज सेवा करण्यासाठी निस्वार्थ राहून कार्य करता येईल पण भुकेल्या पोटाने कोणच समाजकार्य करू शकत नाही.. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व आता होणे नाही.

तर मुद्धा आहे फेसबुक वरील फोटोचा तो टाकावा किंवा न टाकावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..

काम करण्याला पैसे मिळतात ही बाब जरी खरी असली तरी.. पैसे मिळण्यासाठी प्रसिद्धी करावी लागते..

पूरग्रस्त मदत करताना आपण पाहिले की सर्वांनी केलेली मदत आपल्याला कळाली..
आता याच्या आड काही लोक... खोटे फोटो किंवा थोड्या कामाची मोठी प्रसिद्धी मिळवून मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात..

काहीजण खोट्या हृदयद्रावक कथा मांडत असतात हे केल्या मूळे खर काम करणारे मागे पडतात, हे देखील खरे आहे..

पण तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम असणारच.. पण खरे आणि खोटे समाज सेवक ओळखल्या शिवाय आपण विश्वास ठेवू नये.

बाकी समाज सेवा करण्यासाठी फेसबुकची गरज नाही, हे सत्य आहे.

एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक : शिक्षक


दत्तात्रय तळवडेकर सिधुदुर्ग

       शिक्षक म्हटलं की आपणास    वाटत की सगळा समाज घडविण्याचा ठेका घेतलेला व्यक्ती पण आपण हे विसरून जातो की पालक या नात्याने आपलीही तेवढीच जबाबदारी आहे ती सुसंस्कृत समाज घडविण्याची .असो पण शिक्षक आणि शैक्षणिक धोरण असा विषय हवा होता कारण सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर शिक्षकांसोबत शैक्षणिक धोरण ही महत्वाचे आहे पण आज कालच्या राजकर्त्यांनी शिक्षणाचा बाजार केलाय असे खेदाने म्हणावे वाटते  आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय मराठी शाळेतील विध्यार्थी संख्या त्या शाळेतील शिक्षकांपेक्षाही कमी झाली आहे.  आणि त्याव्यतिरिक्त  आपल्या शिक्षकांवर दिलेले अतिरिक्त कामाचा ताण म्हणजे जनगणना, आहार देने हिशोब ठेवणे , निवडणुकीची कामे देने वैगेरे . त्यामुळे शिक्षक आपले मुख्य काम सोडून बाकीच्या कामाकडे लक्ष देऊ लागलेत आणि त्यात मुलांच्या परीक्षाही बंद झाल्यात . मग अश्या अवस्थेत समाज घडेल कसा? आणि तो घडला नाही तर त्यास जबाबदार कोण ? शिक्षक की सरकार ?

–----------------------------------

रुपाली आगलावे,
सांगोला

 शिक्षक म्हणून समाजात वावरताना खरंच एक वेगळीच प्रचीती येते ती म्हणजे नेहमी जबाबदारीची जाणीव होत राहते की, आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना एक शिक्षक म्हणून खूप विचार पूर्वक करावी लागते.
      शिक्षकाला सुसंस्कृत समाज घडवायचा एक मूलभूत घटक मानला जातो आणि ते तितकंच खरं आहे... मान्य आहे की समाजातील इतर मंडळींवर पण ती जबाबदारी आहे पण एका शिक्षकाची जबादारी ही जरा जास्त असते मुलाच्या जडणघडणी मध्ये. पण प्रत्येक वेळी एखाद्या मुलाने काही चुकीचं केलं तर त्यावेळी फक्त शिक्षकाला जबाबदार धरण चुकीचं आहे... कोणताच शिक्षक कोणत्याही मुलाला चुकीचं किंवा वाईट मार्गावर जाण्यासाठी कधीच सांगत नसतो... त्यामुळे आशा वेळेस शिक्षकाला वेठीस धरण चुकीचच...
      शाळेत आलेला विध्यार्थी शिक्षकाकडे एका अपेक्षित नजरेने बघत असतो.. आणि ती अपेक्षा पूर्ण करणं ही एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे... एका मातीच्या गोळ्याला कसा आकार द्यायचा हे त्या शिक्षकावर अवलंबून असत... आणि म्हणूनच एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं.
--------------------------------------------


   किरण पवार
   औरंगाबाद,
 
             "शिक्षक" या शब्दाला अर्थ आणि भारतीय संस्कृतीत स्थान आपण तितकचं दर्जात देत आलो आहोत आजवर. कारण शिक्षक नाही म्हणजे सरळसरळ दिशाहीन भरकटणं, आणि हे भरकटणं कधीही न संपणार लवकरात लवकर साहजिकच अंताकडे जाणारं असतं. पण सध्या महाराष्ट्रात तरी किमान या शिक्षकावर अन्याय होताणाच दिसतोय. काही ठिकाणी एकीकडे शिक्षक बिनपगारी मुलांना शिकवून स्वत:च पोट भागवण्याकरता भाजी विकत आहेत तर कुणी अंड्याचा व्यवसाय करत आहे. खरतर शिक्षकभरती आणि रखडलेली प्रक्रिया एकदाची आत्ताकुठे मार्गी येऊ पाहतेय पण त्यातही सरकारची संथ गती चालूच असल्याचं निदर्शनास येतय.
            काही शिक्षकांना परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागलं तर काही शिक्षकांनी नव्या प्रयोगांना राबवून समाजापुढे नवे आदर्श निर्माण केल्याच आज पहायला मिळतयं. एका ठिकाणी शिक्षकांनी नक्षलवाद्यांना दररोजच्या विश्वास संपादनातून सध्याच्या राहणीमानात आणून ठेवल. ही मोठी गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल. आजवर ज्या शिक्षकांनी स्वावलंबनाचे विद्यार्थ्यांना केवळ धडेच दिले त्यांनीदेखील यावेळी स्वत: स्वावलंबनत्वाचे तीव्र धोरण हाती घेतल्याच पहायला मिळालं. पण एकूणच सारासार विचार करता शिक्षकांवर जी काही सध्याची वाईट परिस्थिती ओढावली आहे त्याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे, हे मात्र निश्चित. बाकी शिक्षकांबद्दल मनात आदर व प्रेम कायम राहिल; एवढं नक्की.
धन्यवाद!

गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..

 गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..


अनिल गोडबोले, सोलापूर

सगळेच उत्सव आपल्याला प्रिय असतात परंतु गणेशोत्सव मात्र अत्यंत मनापासून वेगळा उत्सव वाट
तो कारण, हा उत्सव नसून मराठी माणसाची जगण्याची रीत आहे असे मला वाटते

मला आठवतो तो कोकणातला गणेशोत्सव, घरातील गणपती, दीड दिवस ते 11 दिवस वातावरण निर्माण व्हायचं ना... ते पुढच्या वर्षी पर्यंत जगण्याला बळ द्यायचं.

लहान पणी जेवढा आनंद होत असे तेवढा आनंद आता देखील होत असतो. तुम्ही कोणीही असा पण वातावरण मात्र तुम्हाला मरगळ झटकायला मदत करते.

आता गावी गणपतीला जाणे होते. खर तर सर्वाना भेटायला मिळणार या आनंदाने जावे लागते.
सगळे मुंबईकर गावाकडे येतात.. भजन आरती चालू असतात.

गावाकडे गणपती आणल्या पासून विसर्जन करेपर्यंत जे वातावरण असते ते काही निराळेच असते.

गावाकडे एखादी म्हातारी विचारते, " झीला, बरो आसय मा. नोकरी काम बरा चालला ना. चांगला होयत रे बाबा तुझा. आवशी बापाशी चा नाव काढशीत  , सगळा चांगला होतला." हे ऐकून मनाला उमेद येते.

भजन आणि आरती करण्यासाठी घरोघरी रात्री उत्साहाने फिरतात मुलं.

नवी उर्मी येते आणि मंत्र मुग्ध करून जाते. तुम्ही कोणीही असा, आस्तिक, नास्तिक, विचित्र, चमत्कारिक, प्राकृतिक... तुम्हाला गणेशोत्सव अवडणारच... कारण बालपण तिथे फिरत असते ना.

आज जरा बदलत आहे सगळं.
वातावरण, प्रदूषण, नको असलेल्या चाली रीती या मात्र बदलत नाहीत.
थोडं कालानुरूप बदललो तर अजून मजा येईल...

तर सर्वाना जगण्याचे बळ देणारा गणेशोत्सव सर्वांच्या घरात साजरा होवो, ही सदिच्छा
*---------------------------------------------*

संगीता देशमुख,वसमत

         हिंदूंच्या अनेक सण उत्सवापैकी गणेशोत्सव हा एक महत्वाचा आणि चैतन्यदायी सण असतो.यात  विशेष बाब म्हणजे सेलेब्रिटी  हा उत्सव सर्वधर्मसमभावाने साजरा करतात.  महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणूनही गणेशाचा उल्लेख होतो. श्रध्दा आणि अंधश्रद्धा यापलीकडे जाऊन निर्गुण निर्विकार अशा एका प्रतिकाचे हे पूजन वाटते.  यात गणेशाची निर्मिती,त्यामागची मिथके हे सर्व जर पाहिले तर हे पूजन निरर्थक वाटते. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात एका विशिष्ट हेतूने भारतीयांना एकत्र आणण्याचा जो उद्देश होता तो महत्वाचा आहे. आज भारताला स्वातंत्र्य असले तरी काळानुसार आजही ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भारतीयांना एकत्र येणे आणि संविधानात्मक कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आज अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करू शकतो. परंतु आजची तरुण पिढी ही मात्र दिशाहिन आहे. या उत्सवाला आलेला भडकपणा,सवंगपणा जास्त प्रभावी झालेला आहे. त्यातून शांतता व सुरक्षिता व्यवस्थापन यावर पडणारा ताण,कर्णकर्कश आवाजातून होणारे प्रदूषण व आबालवृध्दांवर होणारे दुष्परिणाम,जनतेकडून होणारी  वर्गणीतून लूट,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांतून होणारे जलप्रदूषण,हे सर्व पहाता आजचा गणेशोत्सव हा आनंददायी वाटत नसून तो तापदायक वाटायला लागला आहे. आजच्या तरुणांनी थोडे औचित्यपूर्ण व विवेकाने साजरा करायचे ठरवले तर हा उत्सव नक्कीच आनंददायी वाटेल.
*---------------------------------------------*

दत्तात्रय तळवडेकर,सिंधुदुर्ग

 आमच्या कोकणात गणपती उत्सव जोरात साजरा केला जातो.  पण हा उत्सव  आला की मला भीती ही तेवढीच वाटते कारण हा उत्सव खरा सुरू झाला तो लोकांना एकत्र आणायला पण यावेळी मात्र भजनी मंडळातील ग्रुप बाजी जोरदार दिसते आणि वाडीतील हेवेदावे सुद्धा  यातही सात्विक भावना न राहता यात सुरू होत ते राजकारण.
        आपण या उत्सवासाठी खूप पैसे खर्च करतो पण मला वाटत एक गाव एक गणपती ही चांगली संकल्पना आहे ती जर अमलात आली तर या उत्सवा साठी होणार खर्च सुद्धा गावातील गरीब  व होतकरू याना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केला तर दरवर्षी जरी 1 कुटुंब उभं राहिलं तरी या उत्सवात आणखी आनंदाची भर पडेल . काही  चुकलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा .
*---------------------------------------------*


पी.प्रशांतकुमार सावेडी,अहमदनगर

.. मला वाटत ..वरच्या विषयाच्या पुढे एक प्रश्न चिन्ह हवं होतं..
...आजही घरगुती गणेशोत्सव म्हणजे प्रचंड आनंद आहे.. आता आमच्याकडचच पहा ना.. देव देव न करणारा मी पण मुलीला हौसेनं शाडू माती आणून देणार.. तिच्या चित्रकलेचा,शिल्पकलेचा श्री गणेशाच तीने गणेश मूर्ती बनवून केलाय.. ह्यावर्षी असा गणपती बनवायचा हे ठरवणार (फक्त ठरवायचा पण शेवटी तो वेगळाच होतो) ... त्याचे रंग त्यासाठी सजावट ती धावपळ.. सगळी मजा
... त्यात आपण देशावरचे त्यामुळे चुकत माकत मोदक करायचे..
सगळी मजा... मजाच मजा
पण हा झाला एक भाग आता त्याचा दुसरा पैलू म्हणजे सार्वजनिक उत्सव..
दुर्दैवाने आपल्याकडे सर्व धर्मियांचे सार्वजनिक उत्सव हे सार्वजनिक उच्छाद झाले आहेत..
DJ डॉल्बी आणि ढोल-ताशांचा दणदणाट..
त्यातही पूर्वी कातडी ढोल होते ते जाऊन कर्कश वाजणारे प्लास्टिक सदृश्य मटेरियल चे ढोल असतात.. त्या गोंगाटाने डोकं उठणाऱ्या आवाजात ज्याला सौंदर्य दिसत तो काय त्याला पिंडात ब्रह्मांड दिसेल..
'मद्य' आणि 'वाद्य' ह्या दोन 'द्य' चा उन्मात नसेल तर सर्वच कार्यक्रम सहज सुन्दर लोकांना त्रास न देणारे होवून वेळेवर संपतात ..... पण सद्य परिस्थितीत असे बोलणे हे निंद्य मानले जाते.
एकेकाळी समाजप्रबोधन आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असे गणपतीत पण आता निव्वळ भावी राजकारणासाठी एक मंच बस एव्हडच आहे..
... मला मित्र म्हणाला..असा विचार कसा करतो चांगलं काम करणारी पण सार्वजनिक मंडळ आहेतच ना..
हो असतील ना पण एक तर ते आमच्या जवळ नाही आणि त्यांची संख्या इतकी इतकी तुटपुंजी आहे की उपयोगही नाही..
आमचा एक मित्र पोलीस आहे तो म्हणतो गणेशचतुर्थी जवळ आली की पोटातच गोळा येतो..कधी विसर्जन होतं असं होत .. 10-12 दिवस कुठेही झोपा,काहीही खा अंघोळ प्रतिर्विधी ते विचारूच नका :(
... आजूबाजूला अस चित्र दिसत ना तेव्हा आनंदाचा उत्सव अस म्हणताना जीभ चाचरते..
... एका tv वाहिनीवर ऐकलं भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे.. मला वाटत आपण अतिरेक प्रिय समाज आहेत आपल्याला कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करायला प्रचंड आवडत आणि मग अराजकतेकडे वाटचाल होते... जस की 15 ऑगस्ट ला तरुणांचे जथ्थे ट्रिपल सीट बसून त्यातले काही अतिउत्साही चालू गाडीवर उभे राहत कर्कश हॉर्न वाजवत सिग्नल वगैरे मोडत वेगाने जाताना दिसतात .. सिग्नलवर गाडी थांबलेली आणि पोरगी विचारते 'पप्पा ते कोण', म्हणावंसं वाटत ते दिखाऊ आणि आपण खरे देशप्रेमी. पण अस न म्हणता तिला म्हणतो अरे लहान आहेत त्यांना समजत नाही अजून
.
तेव्हा हे बुद्धीच्या देवा गणराया आम्हा सर्वांना समज दे.. चांगलं नागरिक होण्याची बुद्धी दे ...
*----------------------------------------------*

टीव्ही न्युज चॅनलवर लगाम गरजेचा?


वाल्मिक फड, महाजनपूर नाशिक .

खरोखर लगाम हा फार गरजेचा झाला आहे.कारण जेव्हा कधी बातम्या ऐकाव्या म्हणलं की,यांच्या चॕनलवर कायम वाद निर्माण होतील अशाच बातम्या चालू असतात.आणी हे पहा सामान्य माणसाला काय करायचे हो हे ऐकून की ह्या हिरोईनला मुलगा झाला मुलगी झाली,हि पळून गेली,ती परत आली सांगा काय करायचय सामान्य माणसाला आहे का काही गरज ह्या बातम्यांची?
अहो मला तर असं ऐकायला मिळालं की,हे चॕनेलवाले ज्याच्याकडून पैसा मिळाला त्याच्या बाजूने परत परत बातम्या देऊन सामान्य लोकांना टिवी नकोसा करतात.आत्तापर्यंत ज्या ज्या शेतकर्याच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून हे पैसे घेतल्याशिवाय मुलाखती घेत नाही.सरपंच असताना अशा एका चॕनेलवाल्याला फोन केला म्हटलो पंचवीस वर्षापूर्वीची गावकर्यांची व्यथा मांडावी सरकारसमोर परंतु गावात येण्याच्या बदल्यात आम्हाला विस हजार खर्च लागणार असल्याने आम्ही त्या गोष्टिकडे पाठ फिरविली.शेवटी पेपरला दिले आम्ही पण त्याचा एवढा काही परिणाम झाला नाही.
सांगायचे तात्पर्य इतकेच कि,हे न्युज देतात ना प्रामाणिकपणे द्या ज्यांच्यावर अन्याय होतोय ते सत्य जनतेला कळू द्या.नुसती कर्जमाफीची बातमी तुम्ही दाखवता पण प्रत्यक्षात गावांत येऊन गरीब शेतकर्याँना विचारा की झालीय का तुम्हाला कर्जमाफी.नुसता एखाद्या मंञ्याने शब्द काढला कर्जमाफीचा की तुम्ही दिवसभर जनतेला वेड्यात काढता आणी शहरातील जनतेला ते खरं वाटतं,सरकारला खरोखर कर्जमाफी करायची होती तर जे २०१७ जून मध्ये थकबाकीदार झाले त्यांना करायला हवी होती कारण हे सगळे शेतकरी नियमीत कर्जफेड करत होते.ह्या बाबतीत कधी न्युज चॕनेलवाले कधी मंञ्यांना प्रश्न विचारता का?नाही विचारत कारण गरीब शेतकरी त्यांना काही देऊ शकत नाही.सरळ असलेली बातमी ऊलटसुलट सांगून जातीय तेढ मोठ्या प्रमाणात हे न्युज चॕनेल करतात आणी म्हणूनच अशा गोष्टि थांबविण्याकरीता सर्वच टिवी न्युज चॕनलवर लगाम गरजेचा आहे असं मला वाटतं.जय हिंद.
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

प्रेस स्वातंत्र ह्या घटकावर १८० देशाच्या जागतिक यादीत आपला देश १४० व्या क्रमांकावर !!
१००+ भारतीय न्युज चॅनल पैकी बहुतांश बड्या कार्पोरेट हाऊसच्या मालकीचे !!
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या रिर्पोर्टनुसार भारतिय मिडीया जगात सगळ्यात जास्त भ्रष्ट !!

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, संविधानाचा रक्षक, लोकांचा आवाज वैगेरे आता अंधश्रध्दा झाल्या आहेत.

हा एक धंदा झालाय... भ्रष्टाचाराला बढावा देणारा, भ्रष्टाचाऱ्यांना लपवणारा, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणारा आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रसिध्दी देऊन त्यांचा उदो उदो करणारा !

हा संघटीत गुन्हेगारी चा अड्डा झालाय ज्यात ब्लॅकमेलींग, खंडणी वसुली, पेड न्युज, मनी लाँड्रींग, आर्थिक घोटाळे, टीआरपी साठी फेक न्युज, नोकरवर्गांचे लैंगिक शोषण सारखे गंभीर गुन्हे सर्रास होत आहेत.

 ह्याला पाठींबा आहे राजकारण्यांचा, धार्मिक संघटनांचा, सरकारचा व मालक कार्पोरेटचा....

जे खरेखुरे पत्रकार होते त्यांचा आर्थिक व मानसिक छळ आणि हत्या करुन एका पध्दतीचे दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले आहे.
बाकी उरलेले कणाहीन, चरित्रहीन, लाळघोटे, पाय चाटणारे कुत्रे व लचका तोडण्यास टपलेले गिधाडे आहेत.

अश्या वेळी आपण नागरिक म्हणुन काय करु शकतो ?
आंदोलनातुन अश्या न्युज चॅनलसाठी कठोर नियम तयार करण्यास व अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडु शकतो. बकवास टीवी चॅनल पाहणे बंद करु शकतो. खोट्या बातम्या फॉरवर्ड करणे बंद करु शकतो.
 माहितीच्या हक्कावर व सत्य बातमी साठी काम करणाऱ्या विसल ब्लोअर पत्रकारांच्या मागे ठामपणे उभे राहु शकतो. ह्या गंडागर्दीला आता विरोध नाही केला तर अनर्थ होऊ शकतो... जागे व्हा...सध्या संसदेत माहीतीच्या अधिकाराच्या कायद्यात जो बदल केल्या जातोय त्याला विरोध करा... ह्यावेळेसही शांत राहाल तर पुढची पीढी माफ करणार नाही तुम्हाला...
_____________________________________________

शिवकुमार म.पत्रे
कर्वे नगर,पुणे
                    प्रसार माध्यमाचे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण केले जाते त्यातील एक महत्वाचा गट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया होय,आणि आपल्या चर्चेच्या विषयातील न्यूज चॅनेल हा एक त्यातील छोटासा परंतु अत्यंत महत्वपूर्ण घटक होय म्हणून या विषयावर चिंतन मंथन करणे काळाची तसेच या देशाची तथा त्या अर्थाने सामाजिक गरज बनली आहे .

 २०१ सदस्य असलेल्या या अत्यंत छोट्यास्यां ग्रुप वर या प्रदीर्घ विषयावर विचार होतोय यापेक्षा अजून श्रेष्ठ गोष्ट कुठली नसेल,आणि या समुहाचा मी एक घटक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.खर तर या विषयावर प्रेतेकाने सामाजिक माध्यमांवर वेक्त होणे गरजेचे आहे त्याचा प्रभाव मोठ्याप्रमाणावर पडेल व टीव्ही न्यूज चॅनेलवर बंधने येतील ज्या मुळे आपला खरा मोटो ,अंजेडा उद्देश पूर्ण होईल. आता खऱ्या अर्थाने याची गरज का आहे यावर चर्चा करूया ,सध्या सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेली भारतीय खेळाडू हिमा दास जिने स्वर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आणि झाले काय आपल्या न्यूज चॅनेलवर तिचा जसा उल्लेख असावा तसा उल्लेख कुठल्याच न्यूज चॅनेलवर दिसत नव्हता पण सामाजिक माधामनवर जेव्हा तीच्या नावाने हॅच टॅग मारून बऱ्याच जणांनी न्यूज चॅनेलेवल्याना धारेवर धरले तेव्हा कुठे तिची ब्रेकिंग न्यूज बनली आणि तिचा संघर्षमय प्रवास यशोगाथा संबंध जगाच्या पुढे आली.

 जर २६/११  चा हल्ला आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत असेल तर आपल्याल्याला एक गोष्ट नक्की आठवत असेल ,
ज्यावेळी पॅरा कामांडोज त्या हॉटेलच्या बिल्डिंगवर उतरत होते तेव्हा आपल्या सो कॉलड न्यूज चॅनेलवर त्यांचा लाईव्ह रिपोर्ट दाखवला जात होता त्यामुळे ते सावध झाले .ज्यामुळे भारतीय जवान व अनेक नागरिक मारल्या गेले.
अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये न्यूज चॅनेलवर  वेगवेगळी बंधने लादली आहेत , अमेरिकेत न्यूज चॅनेलवर  कुठली बातमी दाखवायची जी बातमी दाखवली जातीय तिचा कन्टेन्ट कसा असला पाहिजे ,
असे बरेच सुंदर व अत्यंत महत्वाचे नियम आहेत.एखादी बातमी जर सामाजिक तेढ निर्माण करणारी असेल तर ती दाखवली पाहिजे का जर दाखवली जातीय तर ती कश्यापद्धतीने दाखवावी असे बरेच विषय या मध्ये आहेत.

 प्रसार माध्यमे ही समाज मनाचा आरसा असतात आणि जर याच अरश्यामध्ये दाखवला जाणारा चेहरा हा खोटारडा असेल तर पाहणाऱ्या प्रेतेकलाच ते समजेल असे नाही.
निमूट पने डोळे झाकुन न्यूज चॅनेलवर जे काही दाखवलं जातंय ते त्रिकाल बाधित सत्य आहे अश्या मानसिकतेत असलेल्या सामाजिक भारत देशा मध्ये खऱ्या अर्थाने न्यूज चॅनेलवर बंधने असणे अत्यंत आवश्यक आहे.
मागच्या काही  वर्षांमध्ये प्रत्येक बातमीला एखाद्या विशिष्ठ जात,धर्म किंवा सांप्रदाय तथा विशिष्ट समुदयाशी जोडणे आणि आपल्या न्यूज चॅनेलचा टी आर पी वाढवणे एवढ्यापुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित झाले आहेत हे प्रकर्षाने जाणवतंय. सर्रास पणे प्रत्येक विषयाला धार्मिक ,सांप्रदायिक रूप देऊन नुसत्या वायफळ गप्पा भरवणे
 इतक्या पुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित नाहीयेत .

समाज मनातील वेगवेगळ्या समस्या,अडचणी व प्रश्न आपल्या न्यूज चॅनेल च्या माध्यमातून समोर आणून त्यावर कार्य करण्यासाठी प्रशासनास व सरकारला भाग पाडणे ,वंचित पीडित व शोषित समुदायाचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देणे हा आपला खरा धर्म,कर्तव्य दायित्व तथा जबाबदारी आहे हे न्यूज चॅनेल चे तथाकथित भामटे मालक व सुटबुटात वावरणारे खोटरड्या अफवा व बातम्या सांगणारे खऱ्या अर्थाने गुन्हेगारीस पाठीशी घालून भ्रष्टाचारास बढावा  देणारे सुशिक्षित भ्रष्ट कर्मचारी विसरून गेले आहेत म्हणून त्यांना याची वेळोवेळी जाणीव करून देण्यासाठी कायद्याच्या
बेड्या घालून लगाम घालणे गरजेचे नव्हे तर महत्वाचे आहे.
____________________________________________

सौदागर काळे,पंढरपूर.

आपल्याला जशाच्या तश्या गोष्टी स्वीकारण्यास मजा नसते.काहीही करून तेल-मीठ लावलेल्या गोष्टी बघायला,ऐकायला आवडतात.मग त्यात भर टाकून पुढे पाठवल्याशिवाय आपला आत्मा तृप्त होत नाही. प्रसंग,वेळ कोणतीही असो.तशी आपल्याला सवय झाली किंवा करवून घेतली आहे.याला जुना साथीचा रोग म्हटलं तर चुकीचे वाटणार नाही.

खाजगी चॅनेल सुरू होण्यापूर्वीचा काळ आणि सुरू झाल्यानंतरचा काळ आपण जरा एकांतात बसून आठवून पहा.मग कळेल नेमकं लगाम कुणाला लावणं गरजेचे आहे?

मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम. आपल्याला खाणं चवीचं लागतं तिथं न्यूज कशा अपवाद राहतील!तशा न्यूज पुरवण्याचे काम खाजगी चॅनेल करत असतात.आपल्याला अशा न्यूज बघायला आवडतात.ते दाखवत राहतात.आता हा पण थोडासा भूतकाळ झाला.आताच्या अवस्थेत न्यूज आपल्यावर लादल्या जात आहेत.आपल्या चवीचा ,मागणीचा विचार न करता."जनता मालक असते" फक्त मतदानादिवशी.आता त्या मतदान प्रक्रियेवरही संशय आहे.म्हणजे मालकाला गंडवले जात आहे.पध्दतशीरपणे.हा वेगळा मुद्दा असला तरी सध्या जनता मालक ना नोकर.भिकारी झाली आहे!जे झोळीत पडेल ते लाचार बनून स्वीकारायचे.अन अशावेळी आपण एकमेकांना विचारत आहोत....लगाम उगरायचा का? त्यासाठी अगोदर मालक बनायला हवं ना...मालक होणं  जमत नसेल तर...आपल्या सरकारच्या न्यूज वाहिन्या बघत चला...तिथेही मनासारख्या न्यूज नाही आल्या तर टीव्ही बंद करून टाका.जास्त डोकं आउट झालं तर विकून-फोडून टाका.पण लगाम आपल्या हातात राहिला नाही.हे सत्य स्वीकारा.

दुसरं म्हणजे पत्रकारांनाही पोट आहे.ते आपल्याने भरणं होत नाही.मग उपाशी राहण्यापेक्षा त्यांनी चाकरी केली तर काय वाईट !
______________________________________________

संगीता देशमुख,वसमत.

         फारपूर्वीचा काळ नाही परंतु आपल्याच पिढीने पाहिलेला तो काळ! आपण किशोरवयीन होतो. तेव्हा फक्त दिल्ली दूरदर्शन आणि सह्याद्री दूरदर्शन अशा दोनच वाहिन्या होत्या. त्यातही आपल्याला चॉइस नव्हता. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवरच्या बातम्या पहायला मिळायच्या. आजच्या न्यूजचॅनलच्या बातम्या पहाताना मला त्या दिवसाची आवर्जून आणि सातत्याने आठवण होते. किती संयतपणे,धीराने बातम्यांचे निवेदन होते! निवेदक कोणत्याही बातमीचा "इव्हेंट" न करता त्याचा फक्त वृतांत  आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ते करायचे. ती बातमी राजकीय वादळाची असो अथवा नैसर्गिक वादळाची,त्याचे फक्त वृतांतकथन व्हायचे. तज्ञांच्या चर्चा मसलती शांतपणे व्हायच्या. मग आपण प्रेक्षक त्यावर आपली भूमिका बनवायचे.  आज मात्र बातम्यांच्या वाहिन्यांचा सुळसुळाट झाला. स्पर्धा वाढली. आपला टीआरपी वाढून घेण्यासाठी बातम्यांचे निवेदक(?) मात्र अत्यंत कर्कशपणाने,अतिअविर्भावात साभिनय व्यक्त होताना दिसतात.  बातम्या निवेदन करताहेत की ते आपल्यावर लादताहेत,हेच क्षणभर आपण विसरतो. प्रेक्षकांनी भूमिका बनविण्यापूर्वीच ते स्वतःला जे योग्य वाटेल तसेच  ठासून मांडतात. पर्यायाने यातून प्रेक्षकांची दिशाभूलच होते. वादविवादमध्ये तर हे निवेदक इतके मध्ये मध्ये हस्तक्षेप करतात की,वक्त्याचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याऐवजी त्यांचाच आवाज जास्त होतो. त्याचप्रमाणे यातही त्यांचीच मनमानी चालते. ज्या बाबींवर फोकस व्हायला हव्या त्या बातम्या दूरच रहातात. अनेकदा ज्या बाबींची गुप्तता पाळायला हवी असते,ती गुप्तता राखली जात नाही. त्यामुळे खरच या वृत्तवाहिन्यांवर कोणाचा लगाम असायलाच हवा. नाहीतर हे लोक  यांच्या आततायीपणामुळे येणाऱ्या पिढ्यांची दिशाभूल करू शकतात. किंवा शत्रूराष्ट्राला आयते कुरण मिळवून देऊ शकतात.
______________________________________________
टीप-( सर्व छायचित्रे गुगल इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************