पाणी..


शिरीष उमरे, मुंबई

पाणी लागतच जिवंत राहायला !!
माणुस म्हणा.. जनावर म्हणा.. पक्षी म्हणा.. जलचर म्हणा.. वनराई म्हणा... आपल्या पृथ्वी चे वैशिष्ट्य आणि अस्तीत्व म्हणजे पाणी !!

पावसाचे पाणी व भुगर्भातील साठलेले पाणी दोनच स्रोत्र आहेत पाण्याचे उपलब्ध ... विहीरी, तलाव, झरे, नद्या सगळे आटत चाललेत... आता समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. का आली ही वेळ ? मागील ३० वर्षापुर्वी बिनधास्त कुठल्याही ठीकाणचे पाणी पीऊ शकत होतो... आता बॉटलचे पाणी पिण्याची वेळ आली आहे...

ह्या तीन दशकात मानवाने पृथ्वीला इतके ओरबाडले आहे की आता विनाशाकडे वाटचाल सुरु झाली आहे. जंगल नष्ट केलीत, कारखाण्यांमुळे हवा पाणी प्रदुषीत करुन टाकली, पाण्याचा व्यापार करण्यात माणुसकी मारुन टाकली... कुठल्याही खेड्यात जा.. कोल्ड ड्रींक विकत मिळेल पण शुध्द पाणी पाजणारा माणुस मिळणार नाही...

आता ना नियमीत पावसाचे पाणी मिळत आहे ना भुगर्भातील पाणी ... पहीली गरज पिण्यासाठी, मग शेतीसाठी व शेवटी उद्यागासाठी असे करावयाचे सोडुन पैश्यासाठी मुठभर राजकारणी व व्यापारी लोकांनी स्वत:च्या नितीमत्तेला विकुन टाकले. पाण्याचा अपव्यय फॅशन तर पाण्याचा व्यवसाय नफ्याचा धंदा झालाय.

परिस्थिती हाताबाहेर जात असतांना आता सगळेजण खडबडुन जागे झाले आहेत. जंगल पुन:र्वसन, पाणी संवर्धन, नद्यांचे पुन:र्जीवन, पाणी वापर कायद्यात बदल, पाणी बचत हे महत्वाचे मुद्दे होऊन त्यावर काम होणे सुरु झाले आहे...

ही शेवटची संधी !! मुठभर संधीसाधु लोकांविरुध्द सामान्य जनतेची लढत यशस्वी ठरली नाही तर पृथ्वीची विनाश अटळ आहे... पुढची पीढी माफ करणार नाही आपल्याला...
________________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
पावसाळ्यात ढगातून येत पाणी,
सांगा बरं साठवत का त्याला कोणी।

सांगाल का कोणी कोठून येत पाणी,
पिण्यासाठी नळातून येत पाणी,
शेतीसाठी विहिरीतून येत पाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
दुष्काळ असेल तर डोळ्यात येत पाणी,
कारण याच पाण्यासाठी फिरावं लागत अनवाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
प्रत्येक पावसाच्या थेंबाचे व्यवस्थपन करत का कोणी,
नसेल करत तर राडवणारच ना आपल्याला पाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
देवाची करणी अन नारळात पाणी,
पाणीच नसेल तर लोक करतात येड्यावाणी।

सांगाल का कोणी कुठून येत पाणी,
पृथ्वीवरच जीवन जपत हे पाणी,
वेळ आली आता जपायची हे पाणी।

" पाणी हेच जीवन आहे. "
__________________________________

अनिल गोडबोले
सोलापूर

काय लिहावं पाण्या बद्दल... पाणी हा विषय लिहिण्याचा कमी आणि अनुभवण्याचा जास्त आहे..
मस्त पैकी पडणारा पहिला पाऊस आणि भिजणारी ती... तिच्या सोबत पाण्यात मिसळून जाणारा तो..

कँटीन वर बसल्या बसल्या गणू ने ऑर्डर दिली , 'चार कट आणि दोन बिसलेरी'.... एकूण बिल 70 रुपये... पाण्याची बॉटल 25 रुपये .. कट चहा..5 रु (स्थळ सोलापूर बाहेर हायवे वरील ढाबा).. ..पाण्याची किंमत..!

"हॅलो म्युनिसिपल ऑफिस.. मी ;;;;; बोलतोय.. आमच्या कडे भारत नगर शेजारी पाईप लाईन फुटली आहे.. पाणी वाया चालले आहे... किती वेळा सांगितलं तरी सुधारणा होत नाही कशी."
पलीकडून फक्त, "पाठवतो कोणाला तर.. गप बस म्हाताऱ्या"...  रस्त्यावर साठलेल्या पाण्यात छोटी मुलं उड्या मारत होती... रामराव मात्र गरोदर सुनेला ... रिक्षा पर्यंत घेऊन कस जायचं... याचा विचात करत होते..

"ओत बे पाणी अजून... लैच हार्ड पॅक झाला हाय... ह बघ टोटल टेंडर साडे तीन कोटीच हाय.... त्यातले 20 लाख माझी फी आणि वरचे 30 लाख बाकीच्यांचे... बाकीचे अडीच मधी ते टाकी आणि पाईप लाईन भागवा."  "एवढे ... रावसाहेब सिमेंट, वाळू, कामगार महाग झालं जीएसटी मूळ काही सुटत नाही... मागचे पण 1 कोट राहिलेत... बघा जरा गरीबकड."
"आ..  होत न्हाय एवढ्यात??... ते महेता लागलाय माग... करू का सही तिकडं...उग मराठी माणूस कॉन्ट्रॅक्ट घेतलाय म्हणून मदत करायला तर काय इचारुच करू नको आमचा."
भागवतो साहेब...

मुंबई चे साहेब मिटिंग ला येणार म्हणून ग्राम पंचायत मध्ये गडबड चालू होती... तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आलं... "सायबला पानी रं..!" सरपंच दात कोरत म्हणाले, "अन्वर कडन जार मागीवलाय... " (मिटिंग जलयुक्त शिवार अभियान पाहणी आणि पेयजल विकास मंत्रालय अधिकारी)

5 दिवसा आड पाणी पासून 10 दिवस कमी दाबाने पुरवठा.... या रोजच्या वार्ता...

एवढ कशाला आता, कोणाला तरी बघून "काळजाक पाणी पाणी" देखील होत नाही...

पाणी, जल, एच टू ओ... जीवन पृथ्वीवर 71% आहे...  आपण उगाचच चिंता करतो....

मध्येच एक बातमी "केपटाऊन मध्ये पाण्याचे रेशनिंग"...

नळ तोट्या पाईप आणि व्हॉल्व तर बदलण्याची गरज पडे पर्यंत दुरुस्त करायचे नाहीत असा एक नियमच आहे भौतिक शास्त्रांत..

तिसरं महायुद्ध पाण्यामुळे होणार म्हणे... "चुल्लूभर पानी मे डूब मर..." अस म्हणताना चूळ भरायला तरी पाणी मिळेल??

तिकडे रेडिओ वर एक गाणं लागलं होतं."आज ब्ल्यू है पानी पानी..।"

पाणी वाचवा वगैरे काम ते पाणी फाउंडेशन करतय ना... सरकारी यंत्रणा आहे की... ,माझा काय संबंध... मला कम्पणीत नोकरी पाहिजे पुण्याला... बस.. बाकी काय खर खर नको डोक्याला माझ्या...

तर पाणी... मला तर हे अनुभव आहेत... आता थांबतो... 7 दिवसांनी पाणी आलं आहे... उद्या अंघोळ पासून पिण्या पर्यंत पुन्हा 7 दिवस भागवायचे आहेत..
"लाव रे तो कुलर..."
__________________________________
     
पवन खरात, अंबाजोगाई.

पाणी हे जीवन आहे,
यावर बोलतील सर्वजण छान।
बचत करा पाणी म्हणलं की,
बंद होतील सर्वांचे कान ।

संपून जाईल पृथ्वीवरील पाणी,
ओस पडतील सारे गाव ।
पैशात सुद्धा तोलायचा नाही,
पाण्याच्या कॅप्सूलचा भाव ।

उन्हाची झळ लागली की,
आठवेल हिरवागार झाड ।
जेव्हा कोरड पडेल घशाला,
दिसेल फक्त कोरडा आड ।

जर पाणी वाचवलं उदयासाठी,
तर सृष्टी सुद्धा ही टिकेल ।
तूच जबाबदार या सर्व विनाशाला,
हाव निसर्गावरील कधी रे सुटेल ।

माझी पिढी पाहून गेली,
नदी नाला सागर तलाव ।
येणाऱ्या पिढीला खरेच
आठवेल का रे H2O हे नाव ।

पाणी वाया घालवू नका,
मिळतय म्हणून फुकट ।
पाण्यावाचून तुझं माणसा,
होईल जगणं हे बिकट ।

पाणी वाचवा,जपून वापरा ।
आहे पाणी हे अनमोल ।
खरंच आहे मित्रांनो,
जल है तो कल है ।
_________________________________

 किरण पवार
औरंगाबाद,

                 आणायचं कोठून ? पाणी.... हाच महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या मराठवाड्यातील काही भागात तरी. लातूरकडच्या काही गावांची परीस्थिती तर मुत्यंत बिकट आहे. लोक रातरात दोन-तीन वाजेपर्यंत पाण्यासाठी जागे राहतायेत. दुष्काळ पडलायं पण फरक आजवरही कोणालाच पडला नाही. मराठवाडा पहिल्यापासूनच तसा महाराष्ट्राच्या राजकारणात तितकासा महत्त्वाचा गणलाच गेला नाही. बऱ्याच भ्रष्टावादी नेत्यांमुळे असेल, असो. पश्र्चिम महाराष्ट्र सुखात आहे. त्याला जोवर झळा बसत नाहीत तोवर कोणीही विदर्भ वा मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात कोणी लक्ष देणा नाही. दिखावा आजतागायत चालूच आहे. पाण्याचा मुद्दा झाडांशी येतोचं. पण फक्त लावले किती ? हाच प्रश्न विचारला जातो. जगवले किती याचं काहीच माप नाही. रस्त्यांच्या कामात मोठीमोठी वृक्षतोड होते आणि बदल्यात दुभाजकात ठराविक झाडचं लावली जातात‌. आज त्याने बहुतांशी झाडांची प्रजातीही नष्ट होत आहे. त्याचा इनडारेक्ट परिणाम आरोग्यावर होतोयं. पण आम्हाला हे जाणून घेणं नकोयं. पाण्याचा प्रत्येक श्वासासी संबंध आहे. मग तो तितका महत्त्वाचा न घेता सरळ बऱ्याचदा मस्करितही डावलला जातो. आज पाण्याअभावी वृत्तपत्रात रोज किमान एक बळी गेल्याची बातमी असते. पण आम्हाला अजूनही गांभीर्य नाहीच. असं चालू राहिलं तर एक दिवस तडफडून पाण्याविना माशासारखं मरावं लागेल; एवढं मात्र नक्की.
__________________________________

वाल्मीक फड 
निफाड नाशिक

खुप सांगुनही जनतेला पाण्याबद्दल गंभीरता जाणवत नाही.पाण्याबद्दलची दखल वेळेतच नाही घेतली गेली नाही तर फार मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत.पाण्याचे मुळ म्हणजे झाड आहे त्यामुळे झाडे लाऊन भागनार नाही तर त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे आहे.
मला तर वाटतंय की,आपण आपल्या घरासमोर आपल्या शेतात आपल्या कुटूंबात जेवढी सदस्य आहेत त्या प्रमाणात,संख्येत आपण वृक्ष लागवड केली तर भरपूर झाडेही लागतील आणी झाडांचे संगोपनही होईल.पण हे करीत असताना आपण आपल्या मुलाबाळांची जशी काळजी घेतो त्या प्रमाणेच झाडांचे संगोपन केले तर सारा देश हिरवागार होईल आणि मुळ पाण्याची समस्या दुर होण्यास फार मदत होईल.
आज गावाकडे मि बघतोय जे लोक आज रानात शिवारात वास्तव्य करुन आहेत त्यांचे फार हाल झालेले आहेत,डोक्यावर हंडे घेऊन माता बघीनी खुप दुरवर जावे लागत आहे.त्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे.जनवरांना चार्याचे जुगाड करावे की,पाण्याचे हा प्रश्न आज ग्रामीण भागातील शेतकर्याँना पडलेला आहे.
यावर जालीम उपाय म्हणजे जेवढे वृक्ष लागवड करता येईल तितकी अधिक वेगाने करावी लागेल.तसेच बंधारे,धरणे यांचा गाळ काढून पाण्याची क्षमता वाढवून जेवढे पाणी जमीनीत मुरवता येईल तेवढे पाणी जमीनीत मुरवावे लागेल.
शहरातील लोकांनीही आपले पाणी वापरताना काळजी घेतली पाहीजे.आपल्या रहात्या घराजवळ जागा ऊपलब्ध असेल तर वृक्ष लागवड केली पाहीजे.अतिरिक्त पाण्याचा अपव्यय टाळला पाहीजे.
पाणी हेच जीवन आहे हे आत्ता तरी आपणा सर्वांना कळावे हिच परमेश्वराला प्रार्थना करतो.🙏🏻🙏🏻🙏🏻
__________________________________

मुकुंद शिंदे.

 नाव च ऐकलं की एक बिनरंगाच,बिनचवीच एक द्रव्य समोर येईल.
कुणाच्या डोळ्या समोर समुद्राचं निळशार पाणी,तर कुणाच्या समोर झऱ्यातून झुळझुळणार पाणी.
पण आज काल चित्र बदलत चालय,आणि आता उन्हाळ्यात तर फक्त पाणी म्हणलं की समोर येत ते कोरड्या पडलेल्या विहरी,कोरड्या नद्या आणि रिकामी भांडी,म्हणजेच दुष्काळ।
चित्र कुटच कुठे पण बदलय नक्कीच,आणि त्याला आपणच कारणीभूत आहोत.
आता म्हणलं जातंय की पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल पण यातील "होईल" हे क्रियापद बदलून "होतय" अस म्हणायला पाहिजे आता कारण आपण सद्या पाकिस्तान मध्ये जाणार पाणी अडवण्याचं विचार करतोय तर 'चीन आपल्या देशामध्ये येणार पाणी अडवण्याच्या' तर आपल्या राज्या मध्ये ही वाद चालू च आहेत 'कर्नाटक-महाराष्ट्र' अशे अनेक वाद चालू झालेत.
10 वर्षा पाठीमागे जर कुणी बिसलेरी मधून पाणी पिण्याचा विचार केला असता तर नक्कीच हसलो असतो,पण काळाने ती ही वेळ बदलली."हे जर असच चालू राहील तर
आपण कमावलेला पैसा पुढची पिढी,तो सर्व पैसा पाण्यात(पाण्यासाठी) घातल्या शिवाय राहणार नाही".
_________________________________

यशवंती होनमाने.

पाणी रे पाणी तेरा रंग कैसा .....
      पाणी म्हटल की आपल्या डोळ्यासमोर काय येत .........तर .....भरपूर पाणी , मुबलक पाणी , कुठेही पाण्यासाठी वणवण नाही .कुठेही अगदी सहज उपलब्ध होणारे .....पण आत्ता अशी परिस्थिती आहे का ? ? ? ?
पूर्वी मी सातारा जिल्ह्यात जॉब करत होते तिथे कधीही पाण्याची अडचण जाणवली नाही .पण मुळातच मी सोलापूर भागातील असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरायचे याची शिकवण .पण सध्या मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात जॉब करते .बापरे ...खुप अडचण आहे इकडे पाण्याची .मला तर कधी कधी वाटत की पळून जाव .खुप ऊन , पाणी अगदी मोजकेच , पाण्यासाठी ची दूर दूर ची भटकंती ...खुप त्रास आहेत इकडे .आपण जर पाणी जपून नाही वापरलं तर महाराष्ट्राचा वाळवंट होईल .
     म्हणून सांगते पाणी जपून वापरा ..जल हैं तो कल हैं ! ! ! ! !
_________________________________

स्वप्नील चव्हाण, बुलढाणा
 
     विषय आला की पहिले ते भारुड आठवत....."पाणी हरवलं ,कोणी ते चोरलं.. आणि शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं"...
  एकदम कमी शब्दात परिस्थिती सांगून जातं हे भारुड......मुद्दा हा नाही की पाणी वाचवता येणार नाही ,मुद्दा हा आहे की पाणी कोण वाचवणार......कारण कदाचितच असा कोणी असेल ज्याला हे माहीत नाही की आपल्याला पाण्याची कमी भविष्यात जाणवेल आणि आताही बऱ्यापैकी जाणवत आहेच......पण तरीही आम्ही पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न करणार नाही....आम्ही झाडे लावणार नाही.....त्याच्यासाठी सरकार आहे ना.!!
       मला नाही वाटत आज कोणी फोटो न काढता झाड लावत असेल म्हणून..... कारण आपल्याकडे दाखवणारे जास्त आहेत करणारे कमी...... म्हणून एक सरळ साधा दृष्टिकोन हाच राहील की जर पाणी वाचवायचं असेल तर सुरुवात  स्वतःपासून करावी.....छोट्या-छोट्या गोष्टी असतात अगदी अंगोळीपासून तर गाडी धुण्यापर्यंत....जिथे पाणी वाचवता येऊ शकत...जनजागृती गरजेची आहेच पण त्याला कृतीची साथ कशी देता येईल यावर जास्त भर दिला तर भविष्यात येणाऱ्या अडचणीना मत देता येईल......
      " पाणी अडवा,पाणी जिरवा"  प्रकल्प कागदापेक्षा प्रत्यक्षात उतरले तर पाणी वाचेल......"रेनवॉटर हार्वेस्टिंग" पुस्तकात सगळे शिकलात पण किती जणांच्या घरात आहे ,हा विचार करा.....तुम्ही झाडं कापून घर बांधता, पण झाड लावताना तुम्हाला नकोस वाटत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.......
    शेतकरी आत्महत्या करून पण त्यांच्या वेदना तुम्हाला कळत नसतील तर खरंच विचार करा.....
    पाणी लागतंच ....सगळ्यांना..... मग सगळ्यांनी मिळून वाचवूयात.....विचार गृप च्या माध्यमातून लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करा....लोकांची मानसिकता बदलू द्या....आजचा विचार उद्याची मोहीम बनऊयात....आणि पाणी वाचवूयात.......

      पाण्याशिवाय आयुष्य नाही.....म्हणून आयुष्य वाचवूयात......
__________________________________

मनिष लता अशोक 
सातारा

पाणी हा शब्द तसा दोन अक्षरांचा पण किती ना मोठेपण त्यात आहे. पाणी म्हंटले की आपले जीवनमान त्यावर अवलंबून आहे. पाणी हे अनमोल आहे त्याचे मोजमाप करणे हे अशक्य... पण सध्य परिस्थितीत पाणी आणि पाणी एवढेच चालू आहे. पाणी हे काय?केवढे? कसे?कुठे? हे सर्व प्रश्नचिन्ह सध्या आपल्या समोर आहेत. त्यावर काय करावे काय करू नये हे जाणून घ्यायला हवे. सध्या मी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुक्यात पाणी पुरवठा करणाऱ्या संसाधनांचा अभ्यास करत असताना मला आलेले अनुभव आपल्या समोर मांडत आहे. येथील काही भागात पाझर तलाव, सिंचन तलाव, शेत तळे, बंधारे(लघुबंधारे, मोठेबंधारे) यांची असणारी सध्य परिस्तिथी आणि लोकांना त्याबद्दल असणारी आस्था ह्याचे प्रमाण फारच तारतम्य असे होते. काही गावालगत पाणी पुरवठा करणाऱ्या स्तोत्रांचा पुरेपूर वापर तेथील गावकरी करतात. पण एक गोष्ट मात्र ते लक्षात घेत नाही की कमीत कमी आणि पुरेसा वापर कसा करावा की बाकी लोकांना त्याचा फायदा कसा घेत येईल ही समज कमी प्रमाणात आहे. एका गावात काही शेतकरी वर्गाशी चर्चा करताना असे आढळून आले की जानेवारी ते जून (थोडक्यात पावसाळा सुरूवाती परेंत) त्यांस घरटी ५ ते ७ लोकांसाठी ५०० ते ६०० लिटर पाणी(पिण्यासाठी, वापरासाठी, धूण-भांडी)लागते. एरवी १०० ते २००लिटर पाणी पुरेसे असते. हे झाले पाणी वापरबद्दल पण जेव्हा संवर्धनाबद्दल विचारणा केली असता कोणासही काही माहीत न्हवते किंवा काय बोलावयास तयार न्हवते. शेतीमधील होणारी मातीची धूप, खतासाठी किंवा अडचणी मध्ये येणारी झाडे पाला, गवत जाळणे याने होणारी मातीची धूप याबद्दल त्यामध्ये नैराश्य दिसून आले.. गावातील सर्व एकजुटीने येऊन काम करण्यास व पाणी संवर्धनासाठी काही ठराव हाती घेण्यास माघार घेत असताना आढळले. स्वतः पुरता पाण्याचा प्रश्न किंवा गावपूरता सुटला म्हणजे खुप गॉड अस आहे. पण हेच पाणी आपण भविष्यात कसे जास्त प्रमाणात वापरता येईल किंवा त्यासाठी काय करता येईल या संदर्भात प्रबोधन करणे गरजेचे आहे. लोकांना पाण्या संदर्भात गांभीर्य असणे हे गरजेचे आहे, असे मला लोकांच्या सहवासातुन जाणून आले. हे सांगण्याचे कारण एवढेच की पाण्यासाठी वण-वण करणारे माझे माय-बाप व लहान लेकरे यांनी एकत्र येऊन पाणी संवर्धनासाठी एकत्र यावे.. व पाण्याचा अट्टहास करता पाणी हवे तेथे श्रमदान असा करावा....

ह्या सोबत एक फोटो पाठवत आहे पिण्याच्या पाण्यासाठी लहान लेकरांचा अट्टाहास....

लिहिण्याचा पर्यंत केला आहे. कसे वाटले आणि लेखनात काय बदल अपेक्षित आहे सांगावे...
_________________________________

    निखिल खोडे, पनवेल.

              पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे याची जाणीव आता आपल्या सर्वांना व्हायला लागली आहे.  जितक्या काटकसरीने आपण ते वापरू तितके पाणी जास्त दिवस पुरणार आहे. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे पण ते वापरत असताना जरा थोडे जपून अथवा काटकसरीने वापरले तर त्यात फक्त आपलेच नाही तर इतरांचे सुद्धा भले होईल. पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब कसा साठवला येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. काही पाणी बचतीचे मार्ग:
१) घरातील फरश्या, गच्ची, जिने धुण्याच्या फंदात पडू नका. ओल्या पोछाने जरी पुसले तर त्या स्वच्छ राहतात.
२) पाण्याचा कोणी चुकीचा वापर करत असेल तर त्याला योग्य प्रकारे समजावून सांगा.
३) घरा वरील पाण्याच्या टाक्या नळ बंद न केल्यामुळे विनाकारण वाहत राहतात त्या वाहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४) कालचे भरलेले व उरलेले पाणी शिळे झाले म्हणुन फेकून देऊ नका. पाणी एका दिवसात शिळे होत नाही.
५) बोअर च्या सभोवताल किंव्हा नजीक सात ते आठ फूट खोल खड्डा खणा. या थरात मोठे दगड, बारीक खडी, विटांचे तुकडे, जाडी रेती टाकून हा थर भरून टाका व घरावरील पावसाचे पाणी या खड्ड्यांजवळ सोडून द्या. हा खड्डा ते पाणी शोषून घेईल व पाणी पाझरत पाझरत जमिनीच्या भूर्गभाशी जाऊन शुद्ध होईल. त्यामुळे जमिनीत पाण्याचा साठा वाढेल.
__________________________________

 शुभम आशा कैलास
तालुका, जिल्हा सातारा.

हा असा विषय आहे की त्यावर लिहिलं जाईल तेवढं कमीच वाटणार, कारण प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी, त्याच अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. आता माणसाबद्दल बोलू, कोणताही व्यक्ती 3 आठवडे काही न खाता जगू शकतो पण पाण्याशिवाय तो 2 ते 3 दिवस जगू शकत नाही. एका लेखामध्ये वाचलं होतं की आपण पाण्याशिवाय 100 तास जगू शकतो ते पण जर तापमान नॉर्मल असेल तरच. हा आता महात्मा गांधींनी 21 दिवसांचा सत्याग्रह केला, होता पण सध्या विषय आहे पाण्याचा. पाणी हे प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. सध्या मी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामधील गावानं मध्ये पाण्यावर अभ्यास करायला आलोय. आपल्याला माहीतच आहे यवतमाळ हा विदर्भातील जिल्ह्यातील एक जिल्हा आहे. इथे वर्ष 2 वर्षांपूर्वी पाण्याचे टँकर पुरवावे लागले होते पण सध्या तशी परिस्थिती पाहायला नाही दिसत. पाणी फौंडेशन मुळे तसेच जेवढ्या काही NGO असतील त्यांनी यवतमाळ कडे आकर्षित झाले पाणलोट विकासाच्या कामांसाठी. तसेच CAIM प्रोजेक्ट द्वारे जी काही कामे पाणलोट विकासाच्या लक्षेत्रामध्ये झाली त्यामुळे ही येथील भूजल पाण्याची पातळी वाढायला मदत झाली. CAIM हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकार ने 2013 च्या आसपास सुरू केला होता. विदर्भातील शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या यांसाठी हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. या पाणलोट विकासाच्या कामांमध्ये धान फौंडेशन चाही काही प्रमाणात वाटा आहे. तसेच नवचेताना NGO ने हज भरपूर चांगल्या प्रमाणात वाटरशेड अंतर्गत कामे झाली. लोकांमध्ये झालेल्या संवादावरून अस जाणवलं की जलयुक्त शिवार या योजनेत फक्त खर्च खूप मोठ्या प्रमाणावर झाला त्यातून प्रत्यक्ष शेतकऱयांना फायदा खूप कमी प्रमाणात झाला. शेतकऱयांच्या तुलनेत सरकारी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना खुप फायदा झाला असे लोकांसोबत चर्चा केल्यानंतर जाणवलं. पण काही योजना खूप च चांगल्या पद्धतीने झालय असाही जाणवलं. उदा., मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ झालेली लोक व मला भेटली. पण मी धान फौंडेशन या संस्थेमार्फत इथं आल्या असल्यामुळे मला बरीचशी कामे ही धान फौंडेशन ने केलेली च पाहायला मिळाली. मी पाणी फौंडेशन च्या ही फील्ड वर जाऊन भेटी दिल्या. मी कामे पहिली आणि प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर झालेली कामे पुढील प्रमाणे:
1) शेततळे
2)डाहलीचे बांध
3)सिटीसी
4)शोष खड्डा
5) मातीचा लहान बांध
6) सिमेंट नाला बांध
यापेक्षा ही जास्त नाव आहेत पण सध्या एवढीच आठवताहेत. वरती दिलेल्या कामांचा उद्देश एकाच आहे की भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासली नाही पाहिजे. पाणी फौंडेशन च्या द्वारे एक पाण्यासाठी चळवळ उभी राहिली आहे. भविष्यामध्ये या गोष्टींची मोठी नोंद घेतली जाईल. जल है तो कल है अस म्हणतात ना ते खर्च आहे. एवढं बोलून थांबतो. लेखामध्ये काही सुधारणा असतील नक्की सुचवा आणि काही समीक्षा करायची असेल तर मला वैयक्तिक मेसेज करा,
वाचल्याबद्दल धन्यवाद.
__________________________________
टिप-(सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************