डिप्रेशन आणि आत्महत्या यांनी ग्रासलेला भारत.

अनिल गोडबोले,सोलापूर

एक IAS असलेले ऑफिसर, गोळी मारून घेऊन आत्महत्या करतात आणि पोलीस असा दावा करत आहेत की त्यांना मागील काही महिन्यांपासून डिप्रेशन नावाचा आजार होता.

जो माणूस IAS होतो, अतिशय मेहनती व आशावादी आहे असं सर्वाना वाटतो. स्टेज वरुन  किंवा प्रशिक्षण कार्यक्रमातून लोकांना प्रेरणा देतो... त्याला डिप्रेशन कसं असू शकते?.
एक मॉडेल जी इन्स्टाग्रामवर फेसबुकवर तिच्या लाइफस्टाइल चे फोटो, विविध पदार्थांचे फोटो टाकायची. ट्रेकिंग, समुद्र किनारे, मॉल यामध्ये जाऊन fb live करायची. फॅशन ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये प्रसिद्ध होती तिला प्रचंड मद्यपान सवय व एकटेपण यातून डिप्रेशन आलं होतं.

एक व्यावसायिक जो बऱ्यापैकी बिझनेस करून कमवत होता. बायको , मुलं व घर गाडी सर्व होत. विशेष म्हणजे नवीन करिअर आणि प्रचंड मेहनतीवर विश्वास होता. तो हल्ली बिझनेसवर वेळेवर जात नसे, घरातच tv पाहत बसलेला असे, बायको आणि मुलांशी बोलत नसे, सतत व्हाट्सप वर बघत असे. याचा फायदा घेऊन दुकानातील महिला कर्मचारी यांनी जबरदस्त गैरव्यवहार केले व जेव्हा त्याने याबाबत चौकशी केली तर उलट बदनामी आणि चारित्र्य वर आरोप केल्या मूळे आत्महत्त्या केली.

या आणि अशा भरपूर कथा आहेत, शेतकरी आत्महत्या पासून ते चित्रपट निर्मात्या च्या आत्महत्या पर्यंत हा प्रवास वाढत जाताना दिसत आहे.

डिप्रेशन(उदासीनता), हा 2020 पर्यंत भारतातील मोठा आजार असेल असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे व यावर्षीचा "हॅपिनेस इंडेक्स" भारताला 113 व्या स्थानावरून 140 व्या स्थानावर घेऊन गेला आहे.

माणसाला आलेली प्रचंड हतबलता किंवा आवाक्याबाहेर असलेलं मिळालं की नंतर त्याला फक्त आपलेपणा आणि प्रेम पाहिजे असत. पण त्याच्याकडे असलेल्या परिस्थिती चा फायदा घेणारे फक्त कामपूरत त्याला वापरू लागतात. व या मानसिकतेत तो जे काही मनात धारणा करून बसतो त्याच प्रतीक म्हणून उदासीनता येते.

कामाचा ताण, परफॉर्मन्स चा ताण, काहीच मनासारखं घडत नाही, पैशाच्या समस्या, पासून काहीही आपल्याला क्षुल्लक वाटणारे कारण सुद्धा उदासीनता घेऊन येतात.

अशावेळी छान जिवलग मित्र बनवावेत, काही दिवस ब्रेक घ्यावा, आपल्या मनातील गोष्टी शेअर करणारा हक्काचा कोपरा तयार ठेवावा. .. तरीही त्रास झालाच तर डॉक्टरांची मदत घ्यावी, काही मानसोपचार व थेरपी यांनी माणसाचे अवास्तव विचार बदलता येऊ शकतात.

आता सगळं संपलं असा विचार न करता, जेव्हा सर्व काही संपल्या सारख वाटत ना तेव्हा तीच वेळ असते नवीन काहीतरी चालू करण्याची.. हे मनाला सांगावं, स्वतःशी संवाद साधावा.

नाहीतर भारतात तरुण पिढी संपून जाईल आणि ध्येयवेडे उभे न राहता नुसतेच "वेडे" उरतील, याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेणे गरजेचे आहे.

____________________________

अंजली प्रवीण, रत्नागिरी.
हा विषय समजून घेण्यासाठी थोडं टप्याटप्यात मांडणी करू. 

पहिला टप्पा : डिप्रेशन म्हणजे नेमक काय?

डिप्रेशन मराठी मध्ये “नैराश्य किंवा उदासीनता ” असे म्हणतात. जेव्हा सतत उदास वाटते. निराश वाटू लागते. जेवणाची इच्छा होत नाही किवा भूक लागत नाही. वजन कमी कमी होत जाणे. अधिक थकवा जाणवतो किंवा शक्ती हीन वाटू लागते.  शांत व पुरेशी झोप न लागणे. किवा काही जणांना अधिक झोप लागते. कोणतेही काम करू वाटत नाही. किवा काहीच करण्याची इच्छा होत नाही. कोणताही निर्णय घेता येत नाही. चिडचिडेपणा वाटणे. अपराधीपणा वाटणे. आपण निरर्थक आहोत किवा काहीच कामाचे नाही किवा मी काही करूच शकत नाही. असे वाटत राहणे.  आपलं कधीच चांगल होणार नाही. कोणीही आपल्याला मदत करणारं नाही किवा मी कोणाकडे मदत मागू शकेन असे कोणी नाही. सतत नकारात्मक विचार करत राहणे. आत्महत्येचे विचार मनात येणे तसेच तसे प्रयत्न देखील करणे. अशी लक्षणे ज्यांच्या मध्ये दोन आठवड्या पेक्षा अधिक काळ दिसत असेल तर ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते.

दुसरा टप्पा : डिप्रेशनची कारणे कोणती?

आयुष्यातील दुर्देवी दुखद प्रसंग किवा दुर्घटनेनंतर काही दिवस उदास किवा निराश वाटू लागते.  जीवघेणी स्पर्धा, आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध, त्यामुळे आलेला दुरावा, स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नींचे न पटणे, घटस्फोट, मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार, बाळंतपणात होणारे संप्रेरकातील बदल अशी बरीच कारणे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या आजाराची असू शकतात.   काहीजणांना  त्याप्रसंगातून बाहेर पडता येत नाही. व सतत त्याच प्रसंगाचा विचार करत राहिल्याने नकारात्मक विचार येऊ लागतात. तेव्हा डिप्रेशनची लक्षणे दिसू लागतात. किवा काहीवेळा विनाकारण हि डिप्रेशन येत असते.  कोणत्याही घटनेमुळे आलेला तणाव जर जास्त काळ टिकला तर कॉरटीसोल नावाचे रासायनिक द्रव्य दीर्घकाळासाठी तयार होते. मेंदूतील हिपोकंपस आक्रसतो. यामुळे शरीर व मेंदूत झपाट्याने बदल दिसून येतात.

तिसरा टप्पा : डिप्रेशन आणि आत्महत्या यांचा एकमेकाशी असलेला संबंध

आत्महत्या करू वाटणे हेच डिप्रेशन मधील एक लक्षण आहे. आत्महत्या करणाऱ्या किंवा करू वाटणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये  “५ एच आय ए ए” द्रव्याची कमतरता आढळून येते.  सततचे नैराश्य किवा उदासीनता यावर  काहीच उपाय न केल्यास नकारात्मक विचार हे “आत्महत्या” करू वाटणे या टोकाच्या निर्णयाकडे जाऊन पोहचतात.



चौथा टप्पा : डिप्रेशन - आत्महत्या आणि भारत



WHO यांनी नेशनल केअर ऑफ मेडिकल हेल्थ द्वारे केलेल्या संशोधनात  भारत हा सर्वाधिक डिप्रेशनग्रस्त असलेला देश आहे असे निदर्शनास आले. वर्ष २०१४ मध्ये भारतात एक लाख लोकसंख्येतून १ टक्के लोक नैराश्यग्रस्त असायचे पण  २०१८ मध्ये १०.९ टक्के इतकी आकडेवारी वाढली आहे. वर्ष २०१५ च्या नेशनल क्राईम ब्युरो रेकोर्ड मध्ये वय  १५ ते २९ मधील  चाळीस मिनिटाला एक आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. वर्षाला साधारणत ८ लाख आत्महत्या होतात. हि धक्कादायक आकडेवारी समोर आली. पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया मधून राखी दांडोना यांनी १९९० ते २०१६ वर्षातील स्त्री पुरुष आत्महत्या विषयावर संशोधन केले. यामधून असे दिसून आले कि,  १९९० मध्ये आत्महत्या केलेल्या स्त्रियांची आकडेवारी २५.३ % ते २०१६ मध्ये ३६.६ % तर १९९० मध्ये आत्महत्या केलेल्या पुरुषांची आकडेवारी १८.७  % ते २०१६ मध्ये २४.३  % इतक्या प्रमाणात वाढली आहे. या झालेल्या आत्महत्येची कारणामध्ये नैराश्य हे प्रमुख कारण संशोधनात दिसून आले. “The Lancet Public Health” या मेडिकल जनरल मधून या संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले.  भारतामध्ये मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी एकूण ५००० मानसोपचार तज्ञ तसेच  त्याहूनही कमी २००० क्लिनिकल सायकोलॉजीस्ट आहेत. पण यांच्याकडे उपचारासाठी जाणारे संख्या हि खूप कमी आहे.



पाचवा टप्पा : डिप्रेशन- आत्महत्या आणि आपण



आपल्या हातात असणाऱ्या मोबईलमध्ये शेकडो फोन नंबर असतात. हजारो फ्रेंड्स फेसबुक ट्वीटर सोशल मिडियावर असतात. समारंभात अनेक नातेवाईकांची गर्दी होते.  ऑफिस – शाळा – कॉलेज  जाताना येताना हजारोंची गर्दी आजूबाजूला असते. पण इतक्या गर्दीतही एक व्यक्ती अशी सापडत नाही कि जिला आपण आपल्या मनातील गोष्ट सांगू शकू... आपण व्यक्त होऊ शकू.. आपल्याला समजून घेऊ शकेल...हे गर्दीतील एकटेपण डिप्रेशन आणि आत्महत्येचे एक महत्वाचे कारण आहे. डिप्रेशन आणि आत्महत्या यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या आणि कारणे सर्वसाधारण सर्वांनाच माहिती असतात. यावरील उपाय योग्य समुपदेशन आणि औषधे वेळेवर घेणे गरजेचे असते. पण त्याच बरोबर महत्वाचे आहे “आपण” “आपलं बोलण- ऐकण- भावना व्यक्त होण- समजून घेण- योग्य वेळ देण.” जितकं स्वतःने स्वतः ला सावरण्याची गरज असते तितकीच कुणीतरी समजून घेणारा मायेचा स्पर्श- बोल हि गरजेचे असतात.

____________________________

किरण पवार,औरंगाबाद,

                हा विषय सध्या खरचं हाताळण्यायोग्य आहे. कारण सध्या आपला देश एका महत्वाच्या बदलाच्या टप्यावर आज येऊन पोहोचला आहे. मागे याविषयी सहसा तरूण विद्यार्थी आत्महत्येवर मी थोडासा सर्वे करण्याचा प्रयत्न केला होता. कौटुंबिक त्रासांनी भारतात जास्त बळी विद्यार्थी दशेतले जातात हे त्यावेळी समजलं होतं. मुद्दा कौटुंबिक किंवा इतर कोणताही असो नैराश्य जेव्हा जखडतं तेव्हा माणूस आत्महत्येच्या जाळ्यात साहजिकपणे ओढला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी स्टेज येते आणि वाटतं की, माझ्या असण्या-नसण्याने कोणाला काही फरक पडणार नाहीये. तेव्हा नैराश्येने ओढलेला गर्ता गळफास बनून जातो. पण मुळात सध्या डिप्रेशन येण्याची मुळ कारणे काय आहेत? हे आम्ही शोधत नाही. आजवर जेवढ्या आत्महत्या झाल्या फार फार तर त्यांच्या चार दिवस चर्चा आणि मानसोपचारतज्ञांचे व्याख्यान एवढचं झालयं. मुळात विद्यार्थी वयात येताना आई-वडील आज त्याला व्यक्त व्हायला फार कमी प्रमाणात शिकवतात. घरातलं सततचं भांडणातलं वातावरण असो,पालकांच मुलांसोबतचं कमी झालेलं संभाषन असो, मुलांच्या आवडीचं आणि जमेलं ते शिक्षण न घेऊ देणं, मुलांमधली दिवसेंदिवस होतं चाललेली सहनशिलता, सामंजस्यपणाचा वाढता अभाव आणि न जाणो अजून छोट्या काही बाबी आहेत ज्या मुलांना हळूहळू नैराश्याच्या(नाऊमेदीच्या) गर्तेत घेऊन जातात. प्रत्येक माणूस खास हसतो आणि त्याच देशासाठीचं छोट छोट योगदान देशाला गती प्रदान करतं असतं. आपल्याकडे मानसिक आजाराला आजही आजार म्हणून पाहिलं जातं नाही यामुळेही कितीतरीजण ग्रासलेले आहेत. आज हा विषय ठेवलाच आहे तर एक गोष्ट सांगतो, मी मागे काही गोष्टींचा आढावा घेऊन एक 5 ते सात मिनीटांचे पंधरा एपिसोड्स बनवले होते ज्यात मी आत्महत्येची कारणे आणि त्यावरचे उपाय सुचवले होते. मी अजूनतरी त्यांना प्रकाशित केलं नाहीये पण लवकरचं मी ते करेन आणि त्याचा इतरांना नक्कीच फायदा होईल अशी माझी आशा आहे. बाकी एवढ्यावरचं थांबतो. धन्यवाद!

____________________________

नरेंद्र हिरालाल पाटील.विमान नगर, पुणे.
       या विषयावर ना... मला असं माझा अनुभव सांगावासा वाटतो. माझं कसंय ना, की मी अध्यात्मवादी आहे  आणि त्यात भारतीय संस्कृती बद्दल आदर. गम्मत अशी होते की मलाही कधी कधी एकट वाटण, असं... निराशा आल्यासारखं वाटणं होतंच. स्वाभािक आहे, प्रत्येक मनुष्याला, या स्पर्धेमध्ये या गोष्टींना सामोर जावंच लागतं. पण मग अशा वेळी मी माझ्या देवसोबत बोलू शकतो. कारण कासाय ना.. की शेवटी आपल्याकडे अस जवळच किव्वा तसं कुणी तरी असेलच अस नाही ना! मग संतांची शिकवणं कामात येते. मोह माया कमी झाली की अनावश्यक ताण कमी होतो. बरं वेदांत बघितला तर विषयच संपला. असो हे प्रत्येकाला जमलंच पाहिजे असं नाही.
          पण हे झालं माझ, आता माझ्या भोवती ची गोष्ट सांगतो, मी आहे tattoo artist, सर्व भोगवादी आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे पाईक मंडळी माझ्या अवती भोवती मी भरपूर प्रमाणात मी बघतो. यांचं अस असतं की भरपूर गोष्टी मनात दाबून ठेवलेल्या, भौतिक जगातील लोकांवरील विश्वास उडालेला, बरं ज्याच्यामुळे ही स्पर्धा निर्माण झाली त्याला काय सांगावं ? मग cool दिसण्याच्या नादात सिगारेट पासून प्रवास सुरू होऊन पार drugs पर्यंत गोष्ट पोहोचते. आणि मग भरपूर मानसिक आजार त्यांना सुद्धा coolness चा touch. आता सांगा हा प्रवास संपेल कुठे? आणि माझ्या सारख्या असंख्य मध्यम वर्गीय तरुणांसाठी हीच मंडळी एक high profile म्हणून आदर्श. मग संगल्यांचाच प्रवास जातो या पाश्चात्य संस्कृती कडे. आहे की नाही वाईट हे? मग वाढणार की नाही नैराश्याच प्रमाण?
     हे झालं श्रीमंतांच असं म्हणाल तर आपल्या कडे सुद्धा आपलं तत्वज्ञान फक्त cool  नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो मग पोरगं, तरूण मुलं, मानसं या नैराश्याच्या वर्यमध्ये स्वतःच्या भारी तत्वज्ञानाचा आधार नसल्यामुळे कोलमडून पडतात. कारण राव इंग्लिश बोलायचय, इंग्लिश मत आपलंसं करायचंय तर आपलं कोण अंगीकार करणार? 
    मला तरी हे थोड गणित भरकटल्या सारखं वाटतं. आपण अपला पाया विसरलो तर त्याचे परिणाम दिसतीलच. मग भयंकर स्पर्धा, तुलना, आणि मग त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर दिसतीलच आणि एक दिवस सर्व भस्म होऊन जाईल.
       || विश्व स्वधर्म सूर्य पाहो ||
( नोंद: येथे धर्म म्हणजे, तत्वज्ञान व जीवनपद्धती हा अर्थ घ्यावा ही विनंती. )

__________________________

वाल्मीक फड, महाजनपूर
सध्या तरी अनेक लोक हे अनेक कारणाने डिप्रेशन मध्ये जात आहेत.काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलवत नाहीयेत,काहिंच्या नोकरीच्या समस्या,तसेच एखादा व्यवसायिक त्याचे व्यवसायात नुकसान होणे आणि शेतकर्याचा माल तयार झाला बराच खर्च करुन तयार केलेले पिक आणी त्या पिकाचे अचानक भाव पडणे आणी ऊत्पादन खर्चही न निघणे तसेच अवकाळी पावसाने नुकसान होणे अशा अनेक गोष्टीमुळे माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो.
मी स्वतः अनुभवलेली घटना सांगतो माझा एक परीचय असलेली व्यक्ती कायम माझ्याशी संवाद साधणारी व्यक्ती,एक दिवस मला म्हणाली "आज माझा शेवटचा दिवस आहे भाऊ"मला वाटलं कामाला जातोय इकडं तिकडं असेल कामाचा शेवटचा दिवस मी बोललो चल चहा घेऊ आम्ही चहा पिलो बाकी चहा पिऊन झाल्यावर तो म्हणाला हा तुमचा शेवटचा चहा मी घेत आहे .मी तर चपापलो राव!मग त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली.बायकोला नको त्या अवस्थेत बघीतलेला इसम होता तो !तो बोलला मी घरच्या माणसांना सांगितलं पण मला आईवडीलांनी व भावाने खुप मारले माझे कोणी ऐकत नाही म्हणून मी आत्महत्या करणार आहे.
हे ऐकल्यावर मी त्याला जवळ घेतले आणी पाठीवरुन हात फिरवत सांगितले तु घाबरु नकोस चल तुझ्या घरी जाऊ .बराच वेळ संवाद साधल्यावर त्यांना माझे बोलणे पटले आणी आईवडीलांनी याची बाजू घेतली आणी शेवटी थोडासा सज्जड दम देऊन समोरील व्यक्तीला सांगितले असा विचार पुन्हा नाही बायका अनेक करता येतील पण हा नरदेह पुन्हा मिळणार नाही .त्याला ते पटले आणी तो शांत झाला.
म्हणून मला वाटतंय भारतातील माझ्या बांधवांनी ह्या गोष्टि सर्व सोडून देऊन ,न पटणार्या गोष्टि तत्काळ सोडून द्यावा आणी आत्महत्येसारखा विचार मनात आणू नये हीच विणवणी आणी तिही"लागोनिया पाया"

___________________________

प्राची सुलक्षणा अनिल,अहमदनगर

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
का रे भुललासी वरलिया रंगा..
खरं तर या पिढीला स्वतःला जे हवंय तेच बघायची सवय लागलीये असं म्हणायला हरकत नाही आणि मग असं झालं नाही तर डिप्रेशन.. हा डिप्रेशन शब्द गेल्या 20 - 25 वर्षांत अगदी शेंबड्या पोराच्या तोंडातही सहज यायला लागलाय आणि क्षुल्लक कारणांवरूनही या पिढीला डिप्रेशन यायला लागलंय हे आजचं जळजळीत वास्तव आहे..

शाळेत भरमसाठ स्पर्धा वाढल्याने मी स्वतः सारखा होण्याऐवजी दुसऱ्या कुणासारखा होऊ बघतोय आणि यात अपयश आलं की मी डिप्रेशनमध्ये जातोय.. वर्गात चार मुलांसमोर एखाद्या मुलीला रागावलं की तिचा अपमान होतोय आणि ती डिप्रेशनमध्ये जातेय..
कॉलेजात एखाद्या पोरीने माझं प्रपोजल सगळ्या कॅम्पससमोर झिडकारलं तर मला डिप्रेशन येतंय आणि मी सरळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय.. पण याआधी इतकी वर्ष माझ्या आईबाबांनी माझ्यावर घेतलेली मेहनत मी क्षणात विसरून जातो अन कॉलेजच्या माळ्यावरून उडी मारतोय..
ऑफिसात मागून आलेल्या एखाद्या हुशार सहकाऱ्याचं प्रमोशन होतं आणि मला डिप्रेशन येतं.. मीटिंगमध्ये बॉस ओरडला की मी अपमानित होतो..
खरं तर माणूस संकुचित विचार करायला लागलाय आणि म्हणूनच हे डिप्रेशनचं सो कॉल्ड फ्याड आपल्या डोक्यात बसलंय.. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला आपल्यातला दोष दाखवतेय किंवा आपल्याला नकार देतेय तेव्हा आपण कुठं कमी पडतोय हे पाहण्यापेक्षा आपण डोक्यात राग घालून घेतो आणि स्वतःच्या दुःखाचं कारण बनतो..

कुणा दुसऱ्यामळे आपण दुःखी व्हावं किंवा कुणा दुसऱ्यामुळे आपण खुश व्हावं इतकेही आपण कुणाचे गुलाम बनू नये आणि असं जर असेल तर याहून दुःखद गोष्ट कुठलीही नाही..

शेवटी काय तर, आपल्या आनंदाची आणि दुःखाची चावी आपल्याकडे असेल तर डिप्रेशन आणि आत्महत्येसारख्या समस्याच उरणार नाहीत..

आणि होय, जगात समस्या नाही असा माणूस नाही तसंच उत्तर नाही अशी कुठलीही समस्या नाही.. हे सुंदर आयुष्य एकदाच मिळालंय आणि ते मनसोक्त जगून घ्यावं.. मरताना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नसावा की अरेरे जग राहाटी सांभाळताना आयुष्य जगायचं तर राहूनच गेलं..
"मला सांगा..
सुख म्हणजे नक्की काय असतं..
काय पुण्य असतं की ते..
घरबसल्या मिळतं.."

तर हे पुण्य दुसरं तिसरं काहीही नसून आपली खुशहाल मनोवृत्ती असते..
________________________

यशवंती ....मोहोळ
   हल्ली सकाळ चा चहा आणि पेपर हे समीकरण नकोस झालय .का ? ? ? अहो पेपर हातात घेतला की दोन चार तरी आत्महत्या च्या घटना वाचयला मिळतात आणि अश्या बातम्या वाचल्या की काही सुचत नाही ...
डिप्रेशन मुळे आत्महत्या हे समीकरण च झालय ...कळत च नाही की लोकांना नेमक कशाचं डिप्रेशन येत ते ...अगदी कोवळ्या वयातील मुलं सुध्दा एकमेकाला सांगतात की मला ना सध्या खुप डिप्रेशन आलय ....लोकांनी ना नको तितक्या स्वतःच्या गरजा वाढवून घेतल्या आहेत , आणि त्या पूर्ण नाही झाल्या की वाटत समाप्त झाल सगळ ..हल्ली कोणी एकमेकांना नीट बोलत नाहीत , भावना व्यक्त करत नाहीत , आणि अश्या व्यक्त न केलेल्या गोष्टीचा ताण येतो अन मग ते नाही सहन झाल की आत्महत्या करतात लोक ...
जीवन खुप सुंदर आहे ..चांगल जगता आल पाहिजे , नेहमी आपल्या मित्र मैत्रीण , नातेवाईक  यांच्या सम्पर्कात राहिले पाहिजे ..आपली आवड जपली पाहिजे .आनंदी राहील पाहिजे .
सत्यमेव जयते च्या एका भागात सांगितल होत की रोड आक्सिडेंट  नंतर सगळ्यात जास्त म्रुत्यू हे आत्महत्या मुळे होतात ..
एकच सांगते आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात , मार्ग असतात , सापडतात आपण फक्त थोडा वेळ दिला पाहिजे ..
क्युंकी ....जिंदगी गुलज़ार हैं ...थोड़ी हैं ...मगर लाजवाब हैं ! ! ! !

___________________________

श्रीनाथ कासे, सोलापूर

प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, कॉलेज जीवन संपल्यानंतर आणि करीयर च्या सुरुवातीला एक असा वेळ येतो. ज्यावेळी तो एकटा पडतो. अशी वेळ त्याच्यावर येते जिथे त्याला तणाव (डिप्रेशन) यायला सुरुवात होते. तो आजूबाजूला आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. जिवलग मित्र मैत्रिणींना बोलण्याचा प्रयत्न करतो पण सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. ते आता फक्त कामापुरते बोलतात. मग त्याला कळून चुकते की मी या जगात एकटाच आहे, मलाच माझ्या जीवनाचा शिल्पकार व्हावे लागेल. यात जो कष्ट करतो, तो जिंकतो आणि हो, सगळे जींकतीलच अस नाही. तेव्हा तो परत हाक देतो पण त्याच्याकडे बघायला कोणालाच वेळ नसतो. जो कुटुंब तो चालवतोय, त्यांचंही फकत आर्थिक गोष्टीवर लक्ष असेल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट या जगात काहीच नसेल.
स्वाभिमानी माणूस हरण्यामधे त्याची (आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक) परिस्तिथी कारणीभूत असेल तर त्याला हरणे असे म्हणू नये आणि माणूस जींकण्यामधे हीच परिस्थिती कारणीभूत असेल तर मी त्याला अत्यंत दयनीय माणूस म्हणेन.
कर्णाची परिस्थिती हीच होती तो राजपुत्र होता पण त्याला आयुषयभरासाठी सुतपुत्र असल्याची वागणूक दिली गेली. भर सभेत त्याचा अपमान करण्यात आला. एकलव्य ही यापासून सुटला नाही. त्यालाही गुरुदक्षिणा द्यावी लागली. सभेत अपमान, तिरस्काराची वागणूक जर मिळत असेल तर तुम्ही इतिहास बदलणार आहात एवढे नक्की.....
भारत देश समजायला आयुष्य पुरणार नाही. कारण आपल्या देशाची इतिहास, भूगोल एवढे मोठे, विस्तीर्ण आहे.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय, देवालाही देवपण येत नाही त्यामुळे तणाव असणे गरजेचे आहे. तणावामुळे खरा माणूस समोर येतो. जोपर्यंत आपल्याला तणाव येत नाही तोपर्यंत आपण सुधारणार नाही, एवढे मात्र नक्की... त्यामुळे शक्य होईल तेवढे तणाव सहन करा आणि तणाव सहन करण्याची शक्ती वाढवा. आपल्याला कोणी जवळ घेत नसेल किंवा इतर लोकांचे आपल्या बरोबर पटत नसेल तर ही कविता नक्की वाचा.
मला ग. दी.मा ची ही कविता फार आवडते.
एक तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ धृ. ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ १ ॥

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जो तो तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ २ ॥

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक ॥ ३ ॥
 ग. दि. माडगुळकर
जेव्हा आपल्या मनामध्ये तणाव किंवा आत्महत्येचा, इतर बाबीचा विचार येईल तेव्हा तेव्हा ही कविता आपल्याला साथ देईल.

____________________________

वैशाली सावित्री गोरख,पंढरपूर

आपण लहान असतो त्यावेळेस वाटते कधी एकदा मोठे होईन ,वेगवेगळी स्वप्न उराशी बाळगतो .पण ज्या वेळेस खऱ्या आयुष्यात पाय ठेवतो त्यावेळी पाय डगमगता .प्रत्येक गोष्टीचा तणाव येतो नि आपल्याला लहान पणा पासून डिप्रेशन कस हँडल करावं हे कधी सांगितलेलं नसतं .घरामध्ये भांडण झाले तरी मोठया माणसाचं एकच वाक्य असत मीच जीव देतो आत्ता, मीच घर सोडतो ,तोंड दाखवत नाही माझं .नि ह्या सगळ्या मूळे आपल्याला ही वाटत की डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचा एकच उपाय आहे आत्महत्या .
आज आपल्या सामाज्यात कोणीच डिप्रेशन फ्री नाही इव्हन मी हे लिहतेय म्हणजे मी डिप्रेशन फ्री असेल असं नाही
पण जीवनात आपण काही तरी शिकण्यासाठी आलो आहे नि ह्यामध्ये आपण येणाऱ्या समस्यांचा सामना कसा करतोय ह्यावर सगळं अवलंबून आहे.
माणूस सध्या खूप एकटा पडला आहे ,तो कोणाजवळ व्यक्त होऊ शकत नाही नि कोणाकडे व्यक्त जरी झाला तरी तो समाधानी नसतो कारण समोर असणारा व्यक्ती त्याला जो हवाय तो नसतो ,मग तो प्रेम करायला लागतो त्यात ही ब्रेकअप झाला की मग डिप्रेशन मग आत्महत्या पण मला वाटतं आपल्या आयुष्यातील कोणतीच गोष्ट शाश्वत नाही , मग अशी आपल्या जीवनात येणारी नि जाणारी ही खूप असतात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या ,त्यातून जा .फक्त एकाच गोष्टीचा अनुभव घेऊन जीवन संपवलत तर त्याला काही अर्थ राहणार नाही .कितीही डिप्रेशन आलं तरी हसतमुखाने त्याच स्वागत करा नि मी हे कधी अनुभवलं नाही मला ह्याला अनुभवायचं आहे ,मला ह्याचा सामना करायचा आहे असं म्हणून त्याचा सामना करा ,त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे अनुभव ऐका,वाचन करा ,नवीन नवीन आवडी जोपासा .

____________________________

गणेश नारायणराव फाळके.

मध्यंतरी कोणता तरी पिक्चर बघून धडाधड कॉलेजची पोरं आत्महत्या करू लागली..शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करु लागले.. पोरं पोरी एकतर्फी दोनतर्फी,अनेकतर्फी प्रेमातुन,टेंशन घिऊन आत्महत्या करू लागली.. सासरच्या जाचानं सुना औषधं पिऊन मरु लागल्या..
पोरं सांभाळत नै म्हणून म्हातारा म्हातारी मरु लागले..कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या टेंशननं *आत्महत्या* हा सोयीस्कर(?)मार्ग अवलंबायला लागलं..

इथं सगळ्यांना टेंशन हैच की.. बिगर टेंशनचं कुणीच नै.. आपल्या मरण्यानं..आत्महत्या करण्यानं फक्त घरच्यांना जोराचा मानसिक त्रास आन् लोकांना चर्चा करायला विषय मिळत असतोय..

आपण माणसं हौत राव..जरा आजूबाजूला पाह्यलं की लक्षात येईल..आपल्यापेक्षा जास्त टेंशन असणारी मंडळी परीस्थितीशी दोन हात करताहेत..

जेव्हा टोकाचं टेंशन येईल तेव्हा त्यावर सोल्युशन बघायचं असतं.. आत्महत्या हा पळपुटेपणाचा मार्ग धरायचा नै.. आपल्या मित्रांशी..अगदी जवळच्या मंडळीशी मनमोकळ्यापणानं आपल्या टेंशनवरचा उपाय विचारावा..आणि त्यानुसार चालावं..ज्यांनी हा मार्ग अवलंबला आणि त्यातून बचावले.. त्यांना आयुष्याचं मोल विचारा..आयुष्य मौल्यवान है.. सुंदर है.. ते आणखी सुंदर बनवण्याकडं कल पायजे..

निसर्गातल्या इतर सजीवांना आपल्यापेक्षा जास्त टेंशन आहे.. म्हणून ते असा अविचार करत नैत.. आपल्याला माणूस असूनही हे समजत नै.. हिच तर मेख है जी...
____________________________
नोट : (सर्व प्रतिमा या इंटरनेट वर घेतलेल्या आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************