लिव्ह इन रेलशनशीप - एक सांस्कृतिक बदल


शिरीष उमरे, यवतमाळ

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे थोडक्यात सहजीवन ! दोन मानव  एकदुसऱ्या सोबत राहुन आनंदी जीवन जगु इच्छीतात इतकी सरळसोपी व्याख्या !! 

पण आपली कुटुंबव्यवस्था सामाजिक जाचक बंधनामुळे व कायद्याच्या कीचकट नियमांमुळे जगण्याचे मुलमंत्र विसरत चालली आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था केंव्हाच  मोडकळीस आली आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकामुळे लग्न ही सहजीवनाच्या संकल्पनेची गत आता ताक ही फुकुन प्यावे अशी झाली आहे. 

लिव्ह इन रिलेशनशिप ही कल्पना पाश्चिमात्य विकसित देशातुन भारतात आली. आता त्याला कायदेशीर मान्यता सुध्दा आहे. 

 युवा लोकांमध्ये ही कल्पना जास्त प्रसिध्द झाली. शिक्षण घेतांना आपल्या आवडीच्या व्यक्ती सोबत राहणे ह्याने सुरुवात झाली. त्यानंतर करिअर घडवतांना सुध्दा सहजीवन हे सुरु झाले. लग्नाच्या अगोदरपर्यंत सोबत राहणे हे कॉमन झाले होते. 

आता मुळ मद्दा हा की सहजीवन म्हणजे लैंगिक संबंध असलेच पाहीजे हे जरुरी नाही. ह्यात समाजाला एक तरुण व एक तरुणी ह्यांच्या लग्नाशिवायच्या सहजीवनाला  हरकत होती. आता हा विरोध मावळला असला तरी ग्रामीण भागात ह्यावर अजुनही समाज मान्यता नाही.

लग्नाच्या बंधनात जोडप्याला ज्या एकदुसऱ्याकडुन अपेक्षा असतात त्याची पुर्तता झाली नाही की त्याचे रुपांतर भांडणात, संशयात, रागात, द्वेषात होते व घटस्फोट कडे वाटचाल होते.  मग कायद्याच्या व समाजाच्या नियमांमुळे दोघांचे आयुष्य उध्वस्त होते. 

सहजिवनात कुठलिही बंधने नसतात. एक दुसऱ्यासोबत राहतांना गुणदोष कळतात. एकदुसऱ्याला गमावन्याच्या भितीने संबंध टीकवुन ठेवण्याचे दोन्हीकडुन प्रयत्न होतात. एकदुसऱ्याला ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाही. एवढे होऊनही पटले नाही तर शांतपणे आपआपला प्रवास वेगवेगळ्या वाटेने करता येतो. 
आता ही कल्पना फक्त तरुणांपुरती न राहता वयस्करांपर्यंत पोहचली आहे. शहरात एकाकी निवृतीचे जीवन जगण्यापेक्षा हॅपी लिव्ह इन रिलेशनशिप चा ट्रेंड सुरु झाला आहे. 

एक अजुन नविन प्रथा समाजात मुळ धरुन राहीली आहे ती म्हणजे सिंगल मदर कींवा सिंगल फादर !! सरोगेटींग कींवा दत्तक ह्या मार्गाने सहजीवनाचा नविन प्रवास सुरु झालाय. ह्यात बॉलिवुड मधले नावाजलेले सेलिब्रेटी असल्यामुळे ही कल्पना लोकांना मान्य होऊन राहीली आहे. 

सहजीवन हे सोपे असले तरी ह्यात लाँग टर्म मैत्रीची कमीटमेंट राहीली नाही तर झटपट धरसोड प्रकाराने मानसिक आरोग्य बिघडु शकते...  विचार करा व तुमचे विचार मांडा ...
*==============================*
संगीता देशमुख,वसमत
       आजची पिढी ही स्वतंत्र विचाराची आहे. आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणारी आहे. थोरामोठ्यांचा मान म्हणून त्यांच्या मताचा आदर करणारी ही पिढी नाही. लव्ह मॅरेज करूनही काही महिन्यातच पतीपत्नीमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात. यात दोघांपैकी एकही जण तडजोड करायला तयार नसतो. ही  प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. त्यानंतरच्याही जीवनात प्रत्येकाला कोणीना कोणीतरी भावनिक,मानसिक,शारीरिक गरज भागवणारा/भागवणारी हवीच असते. परंतु त्यातही समोरच्याचे बंधन नको असते. यामुळे आज  लिव्ह इन रिलेशनशिप  ही संस्कृती जोमाने रुजतांना दिसून येते. या संस्कृतीची जेवढी गरज तरुणांना आहे तशी मध्यमवयीन स्त्रीपुरुषाना देखील आहे. ऐन उमेदीच्या काळात लाइफ पार्टनरचा मृत्यू होणं,त्यात लेकरे शिक्षणानिमित्त दूर असणं,यातून येणारा एकटेपणा घालवण्यासाठीही मध्यमवयीन स्त्रीपुरुषाना लिव्ह इन रिलेशनशिप ही संस्कृती मदतच करते. काळाची गरज ओळखून लिव्ह इन रिलेशनशिपला आता कायद्यानेही मान्यता दिली आहे. त्यात निर्माण होणाऱ्या समस्या त्यासाठी सामाजिक व्यवस्थेला बाधा न पोहोचू देता,त्या जोडप्यांच्याही जीवनात अपत्य जबाबदारीच्या,हक्काच्या समस्या निर्माण होऊ नयेत,यासाठी कायद्याने काही अटी व नियमही करून ठेवले आहेत.  आज काहीजणांना हे घातक किंवा बाधक असे वाटत असले तरी स्वतंत्र विचाराच्या पिढीसाठी,घटस्फोट होऊन त्यापासून होणाऱ्या मानसिक,शारीरिक,आर्थिक,शारीरिक,सामाजिक हानीवर हा एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी  लिव्ह इन रिलेशनशिप ही संस्कृती काही अंशी का होईना आजच्या पिढीच्या मानसिकतेचा विचार  करता हा बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे.
*==============================*
निखिल खोडे, पनवेल
                  लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे पाच्यात्य देशामध्ये कॉमन आहेत. बदलत्या वेळेनुसार आपल्या कडे मेट्रो सिटी मध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये ही आता ट्रेण्ड बनत आहे. विवाह पूर्वी मित्र मैत्रीण एकच घरात सोबत राहणे, विचारांची देवाणघेवाण, एकमेकांचे गुणदोष समजुन घेणे. महानगरामध्ये शिकायला, नोकरी करायला इतर कामा निमित्त मोठ्या शहरामध्ये येणारे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणारे लोक या रिलेशन मध्ये राहणे पसंद करतात. कॉलेज मध्ये, कामाच्या ठिकाणी ओळखी झालेले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

आजही आपल्या कडे ग्रामीण आणि बऱ्याचशा नागरी भागात लिव्ह इन रिलेशनशिप ला सामाजिक मान्यता मिळालेली नाही. अनेक सुजाण लोकांना वाटतात की हे आपल्या संस्कृती विरोधात आहे. काही संघटना या संबंधाचा तीव्र विरोध करतात. शासन मान्यता मिळालेली असली तरी परिस्थिती अजूनही बदलेली नाही. 

जुन्या पिढीची लोक लग्नाशिवाय सहजीवनाची कल्पना स्वीकारत नसली तरी लिव्ह इन रिलेशनशिप आपल्या समाजाचा भाग होणार आहे हे खरे आहे. नात्या बरोबर चांगल्या- वाईट परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असायला हवी. एखाद्या व्यक्ती बद्दल, कुटुंबा बद्दल, आपले वेगळे विचार असतात लग्न केल्यानंतर आपण कुठेतरी चुकतोय का? याची जाणीव व्हायला लागते हा प्रश्न स्त्रियांचाच नाही तर पुरुषांना सुद्धा पडतो. त्यानंतर रोजच्या जीवनात भांडण, वादविवाद निर्माण होतात. या सगळ्यात मानसिक त्रास किती होतो याचा विचार न करणे योग्य. यावरच तोडगा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप..
*===========================*
किरण पवार,औरंगाबाद.

              लिव्ह इन रिलेशनशिप नक्कीच एकच प्रकारे सकारात्मक संस्कृतीतील बदल मानता येईल. पण मुळात याची गरज आत्ताच्या नव्या पिढीला का पढावी? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा ठरतो. साहजिकचं याची गरज खेड्यातल्या जीवणाशी फारपणे संबंधीत नाही. कारण तिथे सहसा अशी गोष्ट म्हणजे, एक प्रकारे पापच मानलं जात. लिव्ह इन रिलेशनशिप आपल्या भारतात मेट्रोपोलिटन सिटीझ मधे सुरू झालं; याची कारण मला वाटतं काही खालीलप्रकारे असावीत.
1) सध्याच्या पिढीतली संयम नावाची गोष्ट संपली, नात टिकवायला हे महत्वाच असतं.
2) मोबाईल प्रत्येकाकडे झाल्यापासून गैरसमज वाढीस लागले, प्रत्येक गोष्ट संशयी वृत्तीने पाहिली जाते.
3) आपल्याला आज थोडी तडजोड करून घ्यायला नको असते.
4) परफेक्ट मेड फॉर इच ऑदर असतं का खरचं कुणी? नसतं ते लग्नानंतर नात ऊलगडून बनतं. पण इथे लिव्ह इन रिलेशनशिप नक्की काय शोधतं? याचा विचारही व्हावा.
5) आपल्यातला अहंकार, वर्चस्व गाजविण्याची हौस.
*==============================*
रुपाली आगलावे, सांगोला.

लिव्ह इन रेलशनशिप - एक सांस्कृतिक बदल जरी वाटत असला तरी तो कितपत मान्य होतंय यावर जरा शंकाच वाटत्तेत...  यामध्ये जरी स्वतंत्र जगणाऱ्या आजच्या तरुण तरुणींना आपला हक्क वाटत असेल किंवा विवाहानंतर येणाऱ्या अडचणींमधून जरी काही अंशी सुटका मिळत असेल तरी ती आपली संस्कृती, जी पूर्वापार चालत आलेली आहे त्यामध्ये बाधा तरी निर्माण करत नाही न... यामधून भारताची वेगळीच संस्कृती निर्माण होतीय मान्य आहे... आणि ती काळाची गरजही आहे... पण ती एक चांगली संस्कृती म्हणून उदयास येईल का? .. कारण भारत म्हणजे विविधतेतील एकता म्हणून ओळखला जाणारा देश ... त्याच ते अस्तित्व टिकुन राहील का?...  आज आपण अमेरिकेसारख्या देशाकडे जर बघितलं तर त्याने आपली संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसून येतो म आपण आपली संस्कृती कितपत बदलायची?  माफ करा जर माझं काही चुकलं असेल तर... पण माझ्या मनात उभे राहिलेले प्रश्न मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
*==============================*
अंजली, रत्नागिरी.

समाज हा परिवर्तनशील असतो. हे सर्वानाच  माहिती आहे . पण हे परिवर्तन समाजातील प्रत्येक घटकात गोष्टीत  मात्र दिसून येत नाही.  ज्ञानात विज्ञानात आपल्या समाजाने खूप भरारी घेतली आहे. नवनवीन शोध संशोधन त्यानुसार समाजात बदल हि झपाट्याने दिसून येतात.  पूर्वी कंदमुळे खायचे नंतर अन्न शिजवून खावू लागले  आतातर  फास्टफूड असते. पूर्वी चामड्याचे वस्त्र असायचे नंतर कपड्याचा शोध लागला आता तर कपड्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध झालेले दिसतात.  हे झाले समाजातील गरजांमधील बदल जे समाजाने काळानुसार स्वीकारले.  काही सांस्कृतिक परंपरांचा पण आपण आढावा घेऊ. साजरे केले जाणारे सणवार पूर्वी एखाद्या गावामध्ये एका ठिकाणी सार्वजनिक उत्सव किंवा सणवार साजरे केले जायचे आणि या उत्सवाची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली. आता प्रत्येक गल्लीचा वेगळा उत्सव असतो आणि अश्या  नवीन उत्सवांची परंपरा सुरु होत असते. टाळ मृदुंग ऐवजी डीजे स्पीकर आले.   आपल्या समाजात विज्ञानाने तर इतक्या झपाट्याने प्रगती केली कि असाध्य अश्या अनेक रोग विकारांवर उपाय आज आपल्याकडे आहेत. पण हाच आपला समाज आजही समजू शकत नाही कि स्त्रीची मासिक पाळी हि शारीरिक एक क्रिया असून ते “विटाळ” नाही. अश्या आपल्या समाजातील अनेक संस्कारातील एक संस्कार म्हणजे “विवाह”. जे होणे अत्यंत गरजेचे असते. विवाह केले तरच  “स्त्री-पुरुष” या  नात्याला आपल्या समाजात मान्यता मिळते. आदर मिळतो. मान सन्मान मिळतो. हा विवाह होण्यासाठी त्या मुलामुलीची समंती- पसंती  असो नसो पण विवाह केला जातो. त्यांचे विचार त्यांची आवड त्यांचे मत या कोणत्याही गोष्टीबद्दल विचारशील चर्चा न करता हुंडा- लग्नाचा खर्च- मानपान- जात- गुण या गोष्टींवर अधिकतम चर्चा केली जाते. अजूनही याच परंपरा संस्काराचा गाढा समाज अधिकतम ओढताना दिसतो.  पण याच समाजातील काहीजण स्त्री पुरुष आपले विचार-मते-आवड-निवड- गरज यांना प्राधान्य देऊन एकत्र येतात. त्यांना एकत्र राहण्यासाठी  विवाह नामक लेबलची गरज वाटत नाही. विवाहातील पतीपत्नीचे नाते असो किवा लिव्ह इन मधील नातेसंबंध असो.  दोन्ही प्रकारातील नात्यामध्ये तितकेच गुण दोष आहेत. विवाहासाठी हि आपल्याकडे कायदे आहेत व लिव्ह इन साठी हि कायदे आहेत. कायद्याने दोन्ही प्रकारातील नात्यांना  मान्यता दिली आहे. पण आज हि लिव्ह इन म्हटले कि भुवया उंच होतात. आपल्या बॉलीवूडमध्येही लिव्ह इन रिलेटेड अनेक फिल्म्स आल्या सलाम नमस्ते, शुद्ध देसी रोमान्स वैगरे पण या फिल्म्स मधून लिव्ह इन म्हणजे फ़क़्त शारीरिक ओढी साठी एकत्र आलेले नाते... लिव्ह इन म्हणजे मुल बाळ नको असलेले नाते... लिव्ह इन म्हणजे मंगळसूत्र नको... लिव्ह इन म्हणजे जबाबदारी नको... लिव्ह इन म्हणजे इतर नाते संबंध नको... लिव्ह म्हणजे किती अहंकारी  एवढेच चित्र उभे केले आणि अश्या फिल्म्सचा  शेवट “विवाहाने” म्हणजे  Happy Ending असा होतो.  यामुळे लिव्ह इन आपल्या संस्कृतीचा भाग होऊच शकत नाही. लिव्ह इन म्हणजे पाश्च्यात संस्कृती जे संस्कारवादी समाजाला स्वीकारता येत नाही पण पाश्चात्य शिक्षण- तंत्रज्ञान मात्र सहज स्वीकारता येत. 

भारतामध्ये जाहीररीत्या पाहिलं लिव्ह इन मध्ये एकत्र राहणारे जोडपे “अमृता-इमरोज”. चाळीस पन्नास वर्षे समाज काय म्हणेल याची पर्वा न करता एकमेकांची साथ शेवट पर्यंत देणार नात. ज्यांना आपल्या नात्याला  विवाह करून  पतीपत्नी नावच लेबल लावण्याची गरज वाटली नाही. जेव्हा अमृता यांना त्यांच्या नात्याविषयी विचारले जायचे तेव्हा त्या ठाम पणे म्हणत कि, " ज्या जोडप्याना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते , त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मन पूर्णपणे जाणतो आहोत ; मग समाजाची लुडबुड हवीच कशाला... " इमरोज शब्दात सांगायचं तर " मर्द ने औरत के साथ अभी तक सोना‌ ही सीखा है, जागना नहीं, इसलिए मर्द और औरत का रिश्ता उलझनों का शिकार रहता है "

 विवाह या संस्कारातील आधुनिक बदल म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येऊ शकेल पण त्याबदलास स्वीकारण्याची मानसिकता समाजात दिसून येत नाही. दोन्ही मध्ये हि चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहे. दोन्ही मध्येही तडजोड आहेच. जबाबदारी असते. या लेखातील पहिले वाक्य “ समाज परिवर्तनशील असतो, पण..... ठराविक गोष्टीमध्येच” असे म्हणता येऊ शकेल.
*==============================*

अनिल गोडबोले,सोलापूर

नवीन जीवनपद्धती नुसार नवीन काही बदल येतातच. लिव्ह इन रिलेशनशिप हा शब्द सरळ सरळ सांगतो की "नात्यांच्या आत मध्ये जगा". मग ते नात रक्ताचं असो की जोडलेलं असो.

लग्नामध्ये विधी करून एकत्र राहणारे स्त्री पुरुष आहेत की मग लग्न विधीची आवश्यकता आहे का?... तर अजिबात नाही. मनातून नात येण गरजेचं आहे नाहीतर घटस्फोट झालेच नसते. 

फक्त स्त्री व पुरुषच असतात का ? लिव्ह इन मध्ये.. स्त्री - स्त्री, पुरुष-पुरुष, एकत्र रूमवर राहणारे, हॉस्टेल वर एकमेकांची काळजी घेणारे हे देखील सहजीवनात राहणारे.

मुद्धा सहजीवनाचा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण मुद्धा सुरू होतो लैंगिक संबंध आणि त्या मधून जन्मला येणारी बालक व त्यांची जबाबदारी.... असा आहे.

दोन व्यक्तींनी एकत्र येऊन शरीर संबंध ठेवावेत की नाहीत याचा सर्वस्वी अधिकार त्या व्यक्तीचा आहे. पण हे मान्य होत नाही हा विषय आहे.

समलिंगी संबंध ठेवणारे, एकत्र राहू शकणारे स्त्री पुरुष, आपला जोडीदार नसलेले स्त्री पुरुष, संमतीने किंवा गरजे पोटी एकत्र राहणारे सर्वजण या मध्ये शरीर संबंध हा मुद्धा आला की अजूनही सांस्कृतिक लोकांच्या भावना दुखावतात.

या पलीकडे, एकत्र राहताना येणारी " मालकी हक्काची भावना" इथे येत नाही. मनाला हुरहूर असू शकते की ही व्यक्ती कधी पर्यंत सोबत राहील, किंवा सोबत राहण्याची शाश्वती आहे की नाही(तशी ती लग्नानंतर देखील असते). 

असो... तर आता विवाह संस्था फार काही काळ काम करू शकत नाही. विवाहाच्या नादात 40 वयापर्यंत अविवाहित राहणारे देखील आहेत व बाल विवाह देखील आहेत. जर विवाह संस्था जाती धर्म मध्ये किंवा स्टेट्स व देवाणघेवाण मधून बाहेर येत नाही तोंपर्यंत "लिव्ह इन रिलेशनशिप" प्रमाण वाढत जाणार.. आणि हा सांस्कृतिक बदल आपण मान्य केला किंवा नाही केला तरी तो होत राहणारच.
*==============================*

प्रियांका, रत्नागिरी.

लिव्ह इन रिलेशनशिप हा आजच्या काळातला कळीचा मुद्दा बनला आहे. मुळात ही पाश्चिमात्यसंस्कृतीची देणगी म्हणून याला होणारा विरोध जास्त..ज्या सोसायट्या मध्ये लिव इन कपल्स राहतात हमखास ऐकू येणारा संवाद म्हणजे "काय ही थेर".शोभत हे" "लाजा कशा वाटत नाही यांना"..परंतु मित्रहो आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द भारताचे मूलनिवासी आदिवासी समाजामध्ये मात्र विवाहपूर्व सहजीवनाला सुरुवातीपासून मान्यता होती. किंबहुना युवागृहे किंवा घोटुल याद्वारे जोडीदार निवड, लैंगिक शिक्षण अशा विषयांना चालना दिली जात असे. कालांतराने सुशिक्षित व सुसंस्कृत होण्याच्या स्पर्धेत आपल्याच समाजाने या प्रथेला कालबाह्य ठरवले.
मुळात प्रत्येक प्रौढ व्यक्तीला स्वतःचा जोडीदार निवडून त्याच्यासोबत सहजीवन व्यतीत पूर्ण अधिकार आहे. हे सहजीवन समाजमान्य होण्यासाठी विवाहविधी सुरू झाला . 
मुळात लिव इन रिलेशनशिप म्हणजे लैंगिक स्वैराचार चे माध्यम अशी मानसिकता बनली आहे म्हणून याला विरोध जास्त! पण जेव्हा दोन व्यक्ती परस्पर संमतीने सहजीवन ला सुरुवात करतात तेव्हा केवळ लैंगिक इच्छापूर्ती एवढाच हेतू न राहता बौद्धिक, भावनिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर आपण अनुरूप आहोत का याची पडताळणी करणे गरजेचे असते. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नेमके हेच असते. आपण ज्याला आयुष्याचा जोडदार म्हणून निवडत आहोत व्यक्ती आपल्याला पटणारी,रचणारी आहे का याचे उत्तर मिळते. पण शेवटी आयुष्य म्हटले की तडजोड आलीच...ती इथेही आहे बरं का! अगदी दैनंदिन व्यवहारा पासून ते निर्णय चुकला तर होणारा भावनिक आघात, ठोस कायद्याचा अभाव, सामाजिक अमान्यता आणि त्यातून येणारी असुरक्षितताही आहेच.त्यामुळे या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेल्या जोडप्यांना विवाह करायचा की आजन्म विवाहशिवाय सहजीवन व्यतीत याचा निर्णय घायचा अधिकार असायला हवा ना?
*==============================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************