कुणी माझं ऐकाल का ? अहो मी तिरंगा बोलतोय ….(भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
  
कुणी माझं ऐकाल का?अहो,मी तिरंगा बोलतोय….(भाग:-१)

Source: Internet


-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
 उस्मानाबाद

सर्वप्रथम हा विषय इथं चर्चेला घेतल्या बद्दल अडमीन चे अभिनंदन अन ते ही प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतला त्याबद्दल विशेष आभार,

अहो काका.. अहो मी तुम्हालाच बोलतोय, ओ काकी , अरे दादा,... अहो ऐका ना कुणी तरी प्लिज थोडातरी वेळ द्या ना मला.. अहो मी तिरंगा बोलतोय.. तिरंगा..
पण कोणी काहिकेल्या लक्ष द्यायला तयार नाहीत.. ओरडून ओरडून हा जेंव्हा थकून खाली बसतो तेव्हा रस्त्यावरून जाणार एक माणूस थांबतो तो ही एका पक्षाच्या मीटिंगला चाललेला असतो.. गाडीला पक्षाचा भलामोठा झेंडा लावलेला असतो..
गाडीवरचा तो झेंडा बघितल्यावर तिरंग्याला राग येतो पण बोलत नाही..
तिरंगा उठतो व दोघांचा संवाद चालू होतो..

माणूस - अरे तू इथं काय करतोय ?

तिरंगा - काय म्हणजे ? एक प्रश्न जास्त सतावत होता म्हणून यावं लागलं रस्त्यावर,  डायरेक्ट ऑफिस च्या टेबलावरून आलो बघ इथं.
तू कुठं निघाला आहेस एवढया गडबडीत ? अन हा कसला झेंडा लागलास रे ? अन याच्यावर कसलं तरी चित्र पण दिसतंय ना ?

माणूस - होय, तो आमच्या पक्षाचा झेंडा आहे , अन गाडीवरचा झेंडा काय घेऊन बसलायस मी माझ्या घरावर पण एक झेंडा लावलाय मोठा..अरे आमची शान आहे ती..

तिरंगा - शान ?

माणूस - हो शान आहे आम्हा सगळ्यांची आम्ही सगळे त्याच्याखाली एकत्र येतो व त्याच्या जोरावरच सत्ता, पैसा मिळवत असतो.
काय पण होवो झेंड्यासाठी आम्ही आमच्या मित्रांची, नातेवाईक लोकांची पण गय करत नाही.. समजलं ?

तिरंगा - अरे व्वा.. मग माझ्यासाठी तुम्ही काय करता ?

माणूस - तुझ्यासाठी म्हणजे ? काय वेगळं आहे का अजून?
अरे जानेवारी व ऑगस्ट मध्ये तुला आम्ही फडकवत असतोच कि दर वर्षी
अजून काय करायचं सांग बरं तुझ्यासाठी ?

तिरंगा - तुझ्या गाडीवर लावलेला हा झेंडा कोणी बनवला ?

माणूस - कोणी म्हणजे ? आमच्या पक्षाने बनवला आहे तो,

तिरंगा - मग मला कोणी तयार केलं सांग ?

माणूस - त्या वेळेस केलं कोणीतरी देश स्वतंत्र होण्याच्या टायमाला..

तिरंगा - का तयार केलं मला ?

माणूस - आपल्या देशात एकोपा टिकून राहावा सर्व जाती जमातींनी एकत्र नांदावे, कोणत्याही धर्मानं वर्चस्व न दाखवता या तिरंग्या खाली एकत्र यावं म्हणून हा तिरंगा तयार केला.

तिरंगा - हे माहिती असून देखील तुम्ही लोक मला जवळ बाळगत नाही.

माणूस - तुला आम्ही मान देतोय ना बास झालं ना तेवढं आणखी कशाला उठाठेव करतोय, अपेक्षा करतोय.

( बोलत बोलत तिरंगा त्या माणसाच्या गाडीला लावलेल्या झेंड्याला हात लावण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात.. )

माणूस - लांब हो बर अगोदर त्या झेंड्याला हात लावू नकोस, खराब होईल तो..
( हे ऐकून तिरंग्याला आता राग अनावर होत नाही )

तिरंगा - अरे एवढी काळजी घेता या झेंड्याची पण कधी जानेवारी व ऑगस्ट मध्ये झेंडा फडकल्या नंतर काही ठिकाणी रस्त्यावर, उकिरड्यावर माझी प्रतिकृती आढळत असते तेव्हा ती का उचलून व्यवस्थित ठेवत नाही, तेव्हा का मला साफ करत नाही तुम्ही मला ?

माणूस - हे बघ शेवटचं सांगतो तुला नीट लक्षात ठेव..
आजकाल तिरंगा हा फक्त राष्ट्रीय कार्यक्रम, शासकीय कार्यालये, आशा ठराविक ठिकाणी उरला आहे, अनेक पक्ष व संघटना यांनी आपापल्या स्वार्थासाठी, त्यात राजकिय, सामाजिक, आर्थिक असे सगळे स्वार्थ आले.. या साठी आपला वेगळा झेंडा तयार केला आहे. त्यात वेगवेगळी चित्र व रंग भरून तिरंगा बेरंग करून टाकला आहे, यांचे झेंडे फक्त एका विशिष्ट धर्माचे, प्रदेशाचे, जातीचे, विचारसरणी चे प्रतिनिधित्व करतात व सत्ता मिळवण्याच्या कामी येतात म्हणून तुला टाळलं जातं..
( तिरंग्याच्या डोळ्यात अश्रू वाहत असतात )

माणूस - अन एक सांगू तिरंगा...आजकाल लोकांना एकत्र करायला, लोकांचा गैरफायदा घ्यायला, लोकांना भडकवायला, लोकांना एका अस्मितेशी बांधून ठेवायला तिरंग्या पेक्षाही हा विशिष्ट आकाराचा, विशिष्ट रंगाचा झेंडाच कामी येतो..
तुझ्यातला जो केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे तो आम्ही आज विसरून गेलो आहे, पांढरा रंग जो शांतीचे प्रतीक आहे तो रंग राहू दे समाज अशांत कसा राहील हे काम आज राजकीय लोकांकडून होतं आहे, अन हिरवा रंग जो समृद्धी चे प्रतीक आहे ही समृद्धी आम्ही आता आमच्या पक्षापुरती ठेवतो. अन ते अशोक चक्र जे प्रगती व अखंड विकासाचं प्रतीक आहे ते आम्ही आता आमच्या विकासासाठी वापरतो भले त्यातून दुसऱ्याचे, एकंदरीत समाजाचं नुकसान होऊ दे आम्हाला फरक पडत नाही
अरे आम्ही तुला घेण्याऐवजी तुझ्यातले रंग वाटून घेतले..
त्यामुळं आता प्रत्येक रंग ठराविक लोकांचा आहे तिरंगा पण आता ठराविक लोकांचा आहे
( तिरंगा खेदाने बसून सगळं ऐकत असतो )

तिरंगा - ऐकून घे नीट आता तू पण एकदाचं, येणाऱ्या पिढ्याना तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत, देशाची अखंडता, एकात्मता तुमच्या हातात असताना चार पैशासाठी हे धंदे बंद करा,  नाही तर लोक झेंडा घेण्यापेक्षा त्याचा दांडा हातात घेतील अन तुम्हाला बडवून काढतील तेव्हा माझी आठवण या देशातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला येईल..
( एवढं बोलून तिरंगा काही न बोलता निघून गेला )



 
Source: Internet

-पवन खरात,
 अंबाजोगाई

रंग प्रत्येक जातीचा ,
आज प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेला आहे,
पण माणुसकीच्या रंगानेच ,
माझा तिरंगा हा रंगलेला आहे ।

सैनिक माझ्या देशाचे ,
तिरंगाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत आहेत ।
आपण मात्र भगवा , हिरवा , निळा ,
यातच भीडत आहेत ।

अरे सोड तो रंगीत झेंडा,
घे तिरंगा हाती ।
कुठली जात,कुठला धर्म,
लिहलं आहे का तुझ्या माथी ?

जात तुझी आणि माझी ,
फक्त माणसाची आहे ।
धर्म तुझा आणि माझा,
फक्त माणुसकीच आहे ।

गर्व आहे मला ,
मी भारतीय असल्याचा ,
अभिमान आहे मला,
फक्त आणि फक्त या तिरंगी झेंड्याचा ।



Source: Internet


-जयंत जाधव,
 लातूर
मला आजही आठवत आहे २६ जानेवारी २००४ ची राञ.मी व माझे काही मिञ प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपला की आम्ही एक मोहिम हाती घ्यायचो. रस्त्यावर पडलेले,अस्ता-व्यस्थ प्लास्टिक वा कागदी ध्वज-तिरंगा जमा करुन त्यांना व्यवस्थित जागी ठेवायचे.आम्हांला खूप आनंद  व्हायचा.आम्ही ठरलेल्या कार्याला निघालो,मी एकटा मागे राहिलो.तेवढयात एक आवाज आला."अहो ऐकलं का...जरा माझ्या अंगावरील हे चिखलाचे डाग स्वच्छ कराल का ? मी तिरंगा बोलतोय." मी पण जास्त वेळ न घालवता तिरंगा उचलून स्वच्छ केला.तिरंगाने स्मित हास्य करुन म्हणाला दुपारी पासून येथे रोडवर पडून होतो किती जण आले-गेले पण शेवटी तुला माझी किव आली व मला उचलले.मला तुझा अभिमान वाटत आहे.नाही तर देशप्रेम हे वर्षातील २६ जानेवारी व १५ आॕगस्ट ह्या दोनच दिवस उफाळून येते.तुला माझ्या विषयी काय माहिती आहे ? मी म्हटले जास्त नाही खूप थोडे.तो म्हणाला चल आज मी तुला माझा जीवन प्रवास सांगतो आणी तिरंगा याने त्याची गोष्ट सांगू लागला.
भारताचे स्वातंत्र्य जसे समोर दिसून आले त्या दिवशी २२ जुलै माझा जन्मदिवस म्हणा की मला आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण जगासमोर आणले.सर्वांनी टाळ्यांचा गडगडाने माझे स्वागत केले.तेव्हा माझा पेहराव रेशमी व सुती खादी हा होता.स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या वीरांच्या रक्ताचा रंग माझ्यात आहे.स्वातंत्र्य आपली प्राणांची आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला.चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरू झाला होती .घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व पं.जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली.त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांनी मला सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली अनमोल भेट असेल.सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते.माझ्या निर्मात्यांनी मला खूप वेगवेगळ्या विचारांनी घडवले,माझ्यातील रंगांपासून शिकण्यासारखे खूप काही आहे. केशरी रंग साहस-बलिदानाचे, पांढरा सत्य ,शांतीचे तसेच  हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र  हे माणसाने २४ तास सतत प्रगती करावी ह्याच  प्रतीक आहे. प्रगतीचे रुप कसे  तर निळ्या अनंत आकाश व सागरासारखी.हे अपेक्षित आहे मला प्रत्येक भारतीय कडून.पण अचानक तिरंगा रडू लागला आणी सांगू लागला  मला आज दुःख वाटत आहे की माझा सन्मान जनता विसरत चालली आहे.आजच्या दिवसाकडे एक पिकनीक व करमणूकीचा दिवस करुन टाकला आहे.मला भिती वाटते येणारी पिढीला माझ्या फक्त कथा सांगाव्या लागतील का? मला देखील खूप वाईट वाटले व धीर देत मी तिरंगाला म्हणालो सर्वच वाईट नसतात.येणाऱ्या पिढीला आम्ही तुमचा सन्मान निश्चित करायला लावू.
शेवटी एकच,"विजयी विश्वतिरंगा प्यारा झेंडा उचा रहे हमारा!"

Source: Internet


- संदीप बोऱ्हाडे

  आपल्याकडे देशप्रेम हे 15 ऑगष्ट स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारी गणतंत्रदिनी ओसंडून वाहत असते. अगदी बरेचजण आवर्जून आपले प्रोफाइल फोटो तिरंगा ठेवतात. देशाभिमान असणे चांगलेच आहे. परंतु ते फक्त एकाच दिवसापुरते असणे कितपत योग्य आहे??

   यादिवशी संपूर्ण देशातील वातावरण हे देशप्रेमाने भरून गेलेले असते. गाडीवर तिरंगा विराजमान झालेला असतो. तर शालेय मुलांच्या हाताहातातून तिरंगा डोलत असतो आणि दुसऱ्यादिवशी हि देशभक्ती कुठे गायब होते ते समजत नाही

   रस्त्याच्या कडेला, कचराकुंडीत जिकडे - तिकडे हा तिरंगा विखुरलेला असतो. कचरा झालेला असतो तिरंगा ,जो काल माझ्या देशाची शान आणि माझा अभिमान होता.

     आजकाल स्वतंत्र किंवा
गणतंत्र दिवस म्हणजे एक सण झाला आहे … साजरा करा आणि नंतर विसरून जा
पण नागरिकांनी आपली कर्तव्ये हि लक्षात ठेवली पाहिजेत
कृपया ती विसरू नका
एक दिवस फेसबुक व्हाट्स अप वर झेंड्याचा फोटो अपलोड करून देशाचे भले होणार नाही
देशासाठी काहीतरी करून दाखवा ,,, चांगले नागरिक बना …. आपण स्वतः सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही हे लक्षात घ्या.

     देशातल्या ६०% नेत्यांच्या नावावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत तरीही आपण प्रत्येक निवडणूकीत त्यांनाच निवडूण देतो, हजारो / करोडो खटले कित्येक वर्षांपासून न्यायालयात बाकी आहेत पण आजही त्यांचा निकाल लागत नाहीये. स्त्रियांवर आजही इथे अन्याय आणि बलात्कारा सारखे घृण अत्याचार केले जातात आणि त्यानंतरही तो गुन्हेगार छाती फुगवूण समाजात बिनधास्त वावरतो....
आणि काय म्हणे तर देश स्वतंत्र्य झालाय,
आरे हाड.....!
मी याला कधीच स्वातंत्र्य म्हणणार नाही...!
आता तरी जागे व्हा...!
आजून किती दिवस असे आंधळे, बहिरे आणि मुके बनून रहाणार आहात ? आता देशाला पुन्हा एका भगतसिंगची गरज आहे, चंद्रशेखर आझादजीं सारख्या व्यक्तीमत्त्वाची गरज आहे...

  जो भारतीय माझ्यासाठी स्वत:चा जीव ही द्यायला तयार असायचा .तोच भारतीय आज मला विसरलेला दिसतोय."15 ऑगस्ट " आणि "26 जानेवारी" हे दोन दिवस सोडले तर तुम्ही वर्षभर मला अडगळीत टाकताना
किंवा अपमानीत करताना दिसताय.

   भारतीयानो ; राष्ट्रगीत ; राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रीय स्मारके यासारख्या गोष्टी निर्जीव असल्या तरीही ....त्या समाज हितासाठी देशहितासाठी बरच काही देऊन जातात.  देशप्रेम हे एका दिवसापुरतेच मर्यादित नसावे
ते कायमचेच मनात असावे.



Source: Internet


-समीर सारगर
 नेर परसोपंत
 जि. यवतमाळ

राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा हा आपल्या देशाच केवळ एक राष्ट्रीय प्रतीक नसून या  देशाचं गौरव आणि प्रतिष्ठा देखील आहे. म्हणून त्या ध्वजाला देशातील महत्वपूर्ण इमारती वर फड़कवल्या जाते उदा. राष्ट्रपती भवन, संसद, भवन, सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय ,सचिवालय ,आयुक्त कार्यालये ईत्यादी.  
 ध्वज संहिते नुसार राष्ट्रीय ध्वज हा स्वतंत्र दीनी आणि प्रजासत्ताक दिनी तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंती दिनी फड़कवन्यात यावा असा नियम होता. परंतु जानेवारी 2002 च्या भारतीय ध्वज संहिते मध्ये काही संशोधन करून स्वांतत्र्याच्या बऱ्याच वर्षा नंतर भारतीय नागरिकांना आपल्या घरावर, कार्यलय,फैक्टरी, ईत्यादी खाजगी संस्थान येथे केवळ राष्ट्रीय दिवसच नाही तर इतर दिवशी देखील कोणत्याही प्रतिबंधा शिवाय ध्वज फड़कवन्यची अनुमती मिळाली म्हणजे भारतीय नागरिक आता कुठेही ,केव्हाही तिरंगा फड़कवु शकतो परंतु त्याला ध्वज संहिते चे कड़क पालन करावे लागेल तेही तिरंग्याच्या सन्मानार्थ कोणतीही कमी न पडू देता.

आपल्या देशात तिरंगा हा एकतेच, राष्ट्रभक्तिच प्रतीक आहे.  तिरंग्या कड़े बघूनच आपल्या शरीरात देशप्रेम आणि रष्ट्रवाद जागृत होतो.

या देशातील 135 करोड़  देशवासी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सनाच्या दिवशी या तिरंग्यच्य छत्रछाए खाली येऊन या देशाप्रति तसेच ज्या शूरवीर क्रान्तिकारानी या देशाला आपल्या रक्ताने  मिळून दिलेल्या स्वातंत्र्या प्रती आपली कृतज्ञता ,आपली निष्ठा व आपला सन्मान व्यक्त करत असतात.  

ध्वजसंहिते नुसार ध्वजा बाबत कड़क नियम देखील आहे. व त्याचे पालन करणे समस्त देशवासियाचे कर्तव्य आहे.

केंद्र शासनाने  मागील दोन वर्षापासून प्लास्टिक तिरंग्यावर बंदी आणली तसेच  केवळ कागद व कापडाचेच  ध्वज असावे अशे निर्देश निर्गमित केले आहे. तसेच  कोणीही प्लास्टिकचे तिरंगे विकु वा खरेदी करु नए अशा प्रकारचे शासन निर्णय असताना देखील या प्लास्टिक तिरंग्याचा सर्रास खरेदी- विक्री  होताना दिसत आहे, राष्ट्रीय दिन साजरा झाल्यावर हे प्लास्टिकचे ध्वज रस्त्यावर इतरत्र नाली व गटारात पडलेले  असताना निदर्शनास येतात. ही सर्व भारतिया करिता अत्यंत लाजिरवानी व शरमेची बाब आहे.
त्या तिरंग्याचा सन्मान आपन असा करणार?
झाली आपली देशभक्ति? केवळ 10 तास असणाऱ्या आपल्या या(दिखाऊ) देशभक्तिने या तिरंग्याचा किती मान ठेवला ? आपली  एक दिवसाची देशभक्ति हवेत विरुन गेली ? राष्ट्रीय सन हि  केवळ औपचारिकता म्हणून जोपासणाऱ्याना क़ाय कळणार तिरंग्याचे आणि  स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे महत्व.

स्वातंत्र्य हे फुकट मिळालेल्याना तिरंग्याचा सन्मान क़ाय ठाऊक?

हल्ली मा.सर्वोच्च न्यायल्याने चित्रपटगृहा मध्ये राष्ट्रगानच्या वेळी उभे राहण्याची सख्ती थांबविली, म्हणजे  52 सेकंदच्या या राष्ट्रगीत गायनाला आता  प्रेक्षकाना उभे राहण्याची गरज नाही. काही बुद्धिभ्रष्टानि या करिता न्यायालयात या संदर्भात याचिका दायर केली होती म्हणे!

135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातल्या लोकांजवळ राष्टगाणाच्या वेळी त्या तिरंगयाचा संन्मानार्थ 52 सेकंड उभे राहण्याचा वेळ नाही ? हि या देशाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल!    स्वताला  बुद्धिजीवी म्हणवून घेणारे यविरुद्ध  न्यायालयात धाव घेतात आणि म्हणतात हा आमच्या privasy वर आघात आहे?  आमच्यावर राष्ट्रगान गाण्या करिता  कोणी सख्ती करु शकत नाही? म्हणजे 52 सेकंडाचे राष्ट्रगीत म्हणने  हे देखील त्यांना सख्ती वाटत आहे.

तेलंगाना राज्यात जलिकुट्टा नामक एक गाँव  आहे, या गांवा मध्ये रोज राष्ट्रध्वज उभारुन राष्ट्रगीत म्हटल्या जाते याची सुरुवात तेथे पोलिस निरीक्षक असलेल्या एका व्यक्तिने केली सुरुवातीला कमी लोक जमले कालांतराने लोक जमत गेले आणि अलीकडे दररोज मोठ्यसंख्येने  राष्ट्रध्वज व देशाच्या सन्मानार्थ  राष्ट्रगीत गायल्या जाते.  याला म्हणतात तिरंगयाचा सन्मान करणे आणि  आपली देशभक्ति प्रकट करणे. यासाठी तेथील लोंकाना कोणी सख्ती वैगरे केली नाही, ना याबद्दल तेथील नागरिकांना विनंती वा विनवनी केली. अहो याकरिता देशप्रेम,  आत्मीयता ,निष्ठा  आणि रष्ट्रवाद बद्दलचे संस्कार महत्वाचे असतात आणि त्ये जलिकुट्टी च्या नागरिकां कडून दिसुन आले. आणि  इथे मात्र कोणाला चित्रपट गृहा मध्ये 52 सेकंड उभे राहिल्याने त्यांची privasy धोक्यात येते. सरकारने आम्हला देशभक्ति शिकवू नये अशे बालिश उत्तरे काही महाभाग अफ़ज़ल प्रेमी समर्थक गैंग देतात.
किमान एक भारतीय नागरिक  म्हणून, देशाच्या तिरंग्या प्रति  राष्ट्रभाव आणि कृतज्ञता दर्शविन्या करिता   राष्ट्रगान गायला लावले  किंवा येणाऱ्या पीढ़ी करिता राष्ट्रप्रेम व  देशभक्तिपर संस्कार देशातील जनमानसात रुजविन्या करिता एखादे पाऊल सरकार जर उचलत असेल तर यावर राजकारन  करुण देशातील जनतेवर देशभक्ति लादल्या जात आहे म्हणून ओरड़ सुरु होते.!  भारत तेरे टुकड़े होंगे म्हणाऱ्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना आज खऱ्या अर्थाने देशभक्तिची परिभाषा शिकविने अत्यंत गरजेचे  होऊन बसले आहे.

आपल्याला खरच जर  येणाऱ्या भावी पीढ़ी मध्ये देशाच्या तिरंग्याप्रति, त्याच्या  राष्ट्रगाना प्रति  अभिमान आणि सन्मान  प्रस्थापित करायचा असेल तर बालवायतच  त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे संस्कार  रुजविने गरजेचे आहे.
कारण प्रत्येक गोष्टी करिता कायदा महत्वाचा नसून त्या सोबत इच्छाशक्ति आणि आत्मीयता निर्माण करणे महत्वाचे आहे.  


कमीत कमी राष्ट्रीय दिनी 52 सेकंड वेळ  काढून मनापासून त्या  तिरंग्याला वंदन करणे, आपली आत्मीयता दाखवीने  हेच त्याच्या  प्रति निष्ठा, समर्पण  आणि  मोठा सन्मान आहे.


Source: Internet


-नामदेव दत्तात्रय जाधव
 शाहूवाडी
 जि. कोल्हापूर

 जय हिंद   ,भारतीयानो. मी आपला सर्वाचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय.आज तुमच्याशी बोलण्याच कारण की,भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी जवळ  आला आहे. त्या दिवसापूरत सर्वांचं राष्ट्रप्रेम जागं होईल.पण तुम्ही वर्षभर माझा, व आपला सर्वांचा हा उत्सव राष्ट्र हिताच्या कृती द्वारे वर्षभर साजरा करायला हवा. हल्ली अश्या काही घटना देशभर घडत आहेत ,ज्यामुळे मला देशाबद्दल खूप काळजी वाटते. हा तोच देश आहे ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगदी कोवळ्या वयात भगतसिंह शहीद झाले.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आयुष्भर खस्ता खाल्या ,महात्मा गांधी,सरदार वललभभाई पटेल यांनी लढा उभारला.तेंव्हा आपण स्वतंत्र झालो.याचा सर्वांनी एकवेळ जरूर विचार करावा. आताची ही वेळ मी अमुक जातीचा ,तमुक धर्माचा असे म्हणत बसण्याची निश्चितच नाही, आपला धर्म, जात, प्रांत हा एकच तो म्हणजे भारतीय. आणि तेव्हाच तुम्ही मला अभिमानाने फडकविल्याचा आनंद होईल. ही अशा आपल्याकडून करून इथेच थांबतो. आपला सर्वांचा प्राणप्रिय  तिरंगा. जय हिंद.
*



Source: Internet

-राजश्री
मुंबई

मी तिरंगा बोलतोय..

तिरंगा typing...

  या आधीही बऱ्याचवेळा बोललो आहे पण जाणवेल असा बदल दिसला नाही म्हटलं यावेळी तुमच्या आवडीच्या माध्यमातून संवाद साधावा..तसही गेल्या चार वर्षात ठिकठिकाणी परराष्ट्र धोरण विकासासाठी जात असल्याने डिजिटल आणि technosavy होतो आहे मी ...
   आपला ६८ वा प्रजासत्ताक दिन अवघ्या तीन दिवसांवर आला आहे , यावेळी मी भारतातच आहे तसेच आपले मित्र राष्ट्र समारंभासाठी असणार नाहीत आपणच आपले ' प्रिय देशवासी ' ( घाबरु नका... तिरंगा च बोलतोय 😆 ) म्हणून म्हटलं बोलूया आज , देशातील बाब देशातच राहील..
   भीमा कोरेगाव , युवक दिन , संक्रांत - किंक्रांत , माघी गणेशोत्सव हे सगळं झालं आहे आणि खात्री आहे तुम्ही फोटोज् पोस्ट , लाईक , कमेंट सगळे सोपस्कार पूर्ण करून एव्हाना विसरून रिपब्लिक डे च्या सेलिब्रेशन साठी सज्ज असाल.. म्हणजे सेल मधून तिरंगी शर्टस , वारेमाप खरेदी , झालंच तर फिरायला जावं लागेल... ( लाँग वीकेंड ना.. एफबी ला पोस्ट करावच लागतं काहीतरी नाहीतर कळणार कस तुमचं सगळं कस्स मस्त्त मज्जेत सुरू आहे . )
    यावेळी काहीतरी वेगळं करूया ? दर वेळी तुम्ही सकाळी लवकर उठून मला सलामी देता , परेड बघता , यावेळी मला बोलायचय तुमच्यासोबत , पुन्हा एकदा आणि ऐकावं लागेल तुम्हाला..
   देश म्हणजे वाटतो काय तुम्हाला ? तुम्हाला जन्मापासून मिळालेली जहागिरी ? देव बाप्पाने दिलेलं वतन , की सासुरवाडीवरून मिळालेली भेट ?  शरम नाही वाटत उठसूट कुठल्यातरी बिंडोक गोष्टीवरून हातात तलवारी घ्यायला ? किंवा बसल्या जागी कुठल्याही मूर्ख गोष्टीला समर्थन करायला ? या देशात जन्म मिळाला म्हणून वाटली आहे कधी कृतज्ञता ? मनापासून म्हटलं कधी की हा माझा देश आहे मी जतन करेल याच ? खरच देश माझा वाटला असता न तुम्हाला तर अस नसता वागलात तुम्ही , दंगलीत कोट्यवधींच नुकसान करता , हा धर्म तो जात , याच्या सवलती त्याची दुःख वरून गजहब करता पण प्रश्न सोडवत नाही . कारण मुळात तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाहीत . ज्याला उत्तर हवी आहेत तो स्वतःपासून सुरुवात करतो , याच्या त्याच्याकडे बोट दाखवत नाही किंवा हे बघ मी केली सुरवात ( आणि वर्षानुवर्षे तिथेच आहे ) अशा गमजा करत नाही .    तो स्वतःपासून सुरुवात करतो , रामायणातील खारीची गोष्ट ऐकता आणि विसरून जाता , स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढलेला माझा चिमुकला शिरीषकुमार ऐकता आणि विसरून जाता... खरतर तुम्हा सगळ्यांना आजार झाला आहे , ' *प्रभावित होऊन विसरून जाण्याचा*'  बघावं तिथे सभा होतात , भाषणे होतात बाहेर येताना बाहेर येताना घोळके प्रभावित असतात , मी उचंबळून येतो... मनात म्हणतो , ' हि पोर करणार काहीतरी... आशेने बघत असतो त्यांच्याकडे... ' पण घरी जाईपर्यंत विसरून जाता आणि पुन्हा गर्दीतील डोकी बनता..
 चांगली पुस्तके वाचता , नाटके बघता , कुठे कुठे प्रेरणा घेत हिंडता पण घरी येई पर्यंत पुन्हा ये रे माझ्या मागल्या... अस का होत आहे ठाऊक ?
कारण मुळातच या इम्पोर्टेड प्रेरणा आणि विचारांना काहीही अर्थ नसतो त्या संदर्भ साहित्य असल्यासारख्या वापरायच्या असतात , आणि आपले प्रश्न आपल्या वेगळ्या मार्गाने सोडवायचे असतात.. त्यासाठी स्वतःच्या विचारात खोलवर गाडून घ्यावं लागतं , झगडावं लागतं , इकडून प्रेरणा , तिकडून माती , तिसरीकडून पाणी , चवथ्याची जमीन या चार खांद्यावर त्या अंकुराची फक्त तिरडी निघते . जन्म नाही तोच अकाली मृत्यू कारण स्वंतत्र अस्तित्वाचा अभाव ..
आणि हो हे बंधुभाव , समता , स्त्री ही देवीचे रूप वगैरे नाटक तर आता बंदच करा... मान्य करा की जमत नाहीये हे तुम्हाला , सगळी भावंडं ना तुम्ही मग इकडचं पाणी तिकडे गेलं की तोंडचं पाणी का पळत तुमच्या ? याचाच अर्थ प्रत्येकाचा जीव तगण महत्वाचं आहे , बरोबर ? म्हणून ही असली सोंग आणण्यापेक्षा आपापली काम नीट करा . इकडे नोकरीला दांड्या द्यायच्या , टेबला खालून पैसे घायचे आणि कुठंतरी जाऊन चादरी वाटून यायच्या ही थेर बंद करा आता . तुम्ही स्वाभिमान मोडून खाल्ली आहेच किमान ज्यांचा अजून विक्रीला नाही त्यांना फुकट मिळण्याची नसती व्यसन लावू नका , कळू देत ना किंमत .. तुम्हाला स्वातंत्र्य फुकट मिळाल्याने किंमत नाहीये तसच त्यांनाही कळणार नाही तुमचा वेळ , तुमचे श्रम तुमचे भावना .. त्यापेक्षा रोजगार निर्मिती करा.. माणसं उद्योगाला लावा ..
मराठी माणसाला धंदा जमत नाही म्हणून केकाटण बंद करा , अंबानी टाटा बिर्ला यांच्यावर जळण बंद करा , त्यांच्या कष्टावर मोठे झाले आहेत ते तुमच्यासारखे सरकार , परिस्थितीला दोष देत नाही बसले , त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली , अस्तित्वात आणली तेव्हा तुमच्यापैकी कित्येकांच्या घरी चुली पेटल्या.. लाख मरो पण लाखांचा पोशिंदा टिको .. माहीत आहे ना ही म्हण ?  तुम्ही निरुड्योगी , आळशी आहात म्हणून त्यांनी तुम्हाला पोसाव ही मानसिकता बदला ... पुढची पिढी पण तेच शिकते आहे तुमच्याकडे पाहून..
स्वतः ला अभिमान सुख मिळावे म्हणून चांगल्या चुंगल्यांना कुबड्या देऊ नका , बाबा आमटे आहेत ना ठाऊक ? बोटे नसलेल्यांकडून स्वाभिमान गिरवून घेतला त्यांनी आणि तुम्ही काय करताय ? जरा खरचटलं की चालले मानवतेची मलमपट्टी करायला , आणि जरा कुणी विरोध केला की हीच मानवता मग घाव घालयालही मागे पुढे बघत नाही..
शिक्षकाने उत्कृष्ट शिकवा , अधिकाऱ्यांनी कार्यक्षम व्हा , राजकारण्यांनी विकास करा ( खरोखर चा , लुटुपुटू चां नाही ) , डॉक्टरने रुग्ण तपासा.. मग वेगळ्या समाज सेवेची गरज पडणार नाही . आज होतंय काय , जो तो चाललाय वंचितांचे अश्रू पुसायला , बघावं तो कुठल्यातरी समाजसेवी संस्थेसोबत जोडलेला , तरी समाज अजून खोलात जातो आहे , असे का ? कारण माणूस स्वतःची परिस्थिती बदलावी म्हणून स्वतः झटत नाहीये ... अखेरच्या घटका मोजणाऱ्याला व्हेंटिलेटर वर ठेवल्यासारखे आहे हे , सपोर्ट काढला की गेलाच प्राण ..  
प्रत्येकालाच निबीड अरण्यात काहीतरी करायचं आहे , अशाने शहरात माणसं उरतील की नाही अशी शंका येते आहे आता मला..
इथे राहून प्रशासन प्रभावी बनवा , काही वर्ष शिकण्यासाठी द्या...
स्वतः शिक्षण पूर्ण न करणारे ( शिक्षणाचे वय असून ) काही लोक असतात , ते इतर मुलांना शिक्षणासाठी मदत करतात ( आश्चर्य वाटत मला ) ही जुजबी मदत का ? थोडा वेळ घ्या ना स्वतः साठी कष्ट , उत्तम तयार व्हा मुशीतून बाहेर आलेल्या शंभर नंबरी सोन्यासारखे मग करा समाजसेवा ..
कळतंय का ?? सगळंच चुकीचं आहे अस नाही पण ज्या तऱ्हेने तुमचे प्रयत्न आहे तसे परिणाम नाहीत हे मात्र खरे..
  आणि मी मात्र पुन्हा एकदा माझ्या तेजस्वी पुत्रांची वाट बघतोय , सुभाषबाबू , सरदार पटेल , राजा राम मोहन रॉय , इंदिरा , सरोजिनी , राणी लक्ष्मीबाई , नेहरू - गांधी ( आजकाल वावड आहे तुम्हाला यांचे .. पण आधी जाणून घ्या मग विरोध करा त्यांना )  
 बघ येतंय का लक्षात नाहीतर आहेच १ मे , १५ ऑगस्ट ... बोलेल पुन्हा.. कारण तुम्ही काय ७०-८० वर्षे कसेही वागून निघून जाणार , मला मात्र स्वतः च अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.  जे तुमच्यासारख्यांवर अवलंबून आहे..
  या प्रजासत्ताकाला फक्त म्हणायचं म्हणून , जय हिंद म्हणणार असाल तर राहू द्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************